ताज्या घडामोडी

सावधान! पाळीव प्राण्यांचा अतिलाड ठरू शकतो जीवघेणा; अहमदाबादमधील पोलीस उपनिरीक्षकाचा रेबीजने दुर्दैवी अंत

​बुलढाणा प्रतिनिधि:
प्राणीमात्रांवर प्रेम करणं ही मानवी संस्कृती असली, तरी सुरक्षेच्या बाबतीत झालेली एक छोटीशी चूक आयुष्याची अखेर कशी करू शकते, याचा थरकाप उडवणारा वस्तुपाठ अहमदाबादमधील पोलीस सब-इन्स्पेक्टर वनराज मंझरिया यांच्या निधनाने समोर आला आहे.

ही केवळ एक बातमी नसून, ‘लाड’ आणि ‘भ्रम’ यांमधील पुसट रेषेवर दिलेला धोक्याचा इशारा आहे.
​एका कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याला आपल्या पाळीव जर्मन शेफर्ड कुत्र्याचा छंद होता. मात्र, मागील आठवड्यात त्याच लाडक्या कुत्र्याशी खेळताना त्याच्या नखाचा एक ओरखडा लागला आणि होत्याचे नव्हते झाले. कुत्र्याचे रेबीज लसीकरण नियमित झाले आहे, या एकाच भ्रमात राहून वनराज यांनी त्या जखमेकडे दुर्लक्ष केले. त्यांना वाटले की केवळ नखच लागले आहे, दात तर लागलेला नाही; पण नियतीला काही वेगळेच मान्य होते. त्या एका नखातून रेबीजच्या विषाणूंनी त्यांच्या शरीरात प्रवेश केला. जेव्हा त्रास सुरू झाला, तेव्हा अहमदाबादमधील महागड्या रुग्णालयात त्यांना पाच दिवस मृत्यूशी झुंज द्यावी लागली. तज्ज्ञ डॉक्टरांचे प्रयत्न आणि अवाढव्य खर्चही निष्फळ ठरला, कारण रेबीजच्या विषाणूंनी त्यांच्या मेंदूवर पूर्ण ताबा मिळवून शरीरातील एकामागून एक अवयव निकामी करण्यास सुरुवात केली होती.
​शेवटच्या घटका मोजतानाची त्यांची अवस्था पाहून पाषाणहृदयी माणसाचेही डोळे पाणावतील अशी होती. रेबीजमुळे माणूस वेडापिसा होतो, हे विज्ञानाचे सत्य मंझरिया यांच्या रूपात समोर आले; त्यांना चक्क बांधून ठेवण्याची वेळ आली होती. अखेर एका हसत्या-खेळत्या अधिकाऱ्याचा असा दुःखद अंत झाला. ही घटना समाजाच्या डोळ्यात जळजळीत अंजन घालणारी आहे. कुत्रा, मांजर किंवा उंदीर यांसारख्या प्राण्यांचे केस, त्यांची लाळ मानवी पोटात गेल्यास किंवा त्यांच्या नखांचा साधा स्पर्श जरी झाला, तरी रेबीजची लस घेणे हे केवळ कर्तव्य नसून ती काळाची गरज आहे. “प्राणीमात्रांवर प्रेम जरूर करा, पण सावध राहूनच,” हीच कळकळीची हाक आज या निमित्ताने घुमत आहे, जेणेकरून कोणत्याही कुटुंबावर पुन्हा असा काळाचा घाला पडणार नाही.

Share
Show More

Related Articles

Back to top button