बुलढाणा प्रतिनिधी                                                                                                                                                                                                                                       छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या नात्यावरून बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी केलेले विधान सध्या संपूर्ण महाराष्ट्रात वादाच्या केंद्रस्थानी आले आहे. कोणत्याही ऐतिहासिक पुराव्याशिवाय आणि ठोस संदर्भाशिवाय केलेल्या या वक्तव्यामुळे शिवप्रेमी आणि इतिहास अभ्यासकांमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली आहे. या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना शास्त्री यांनी केलेली सारवासारव म्हणजे केवळ शब्दांची फिरवाफिरव असून, त्यातून ऐतिहासिक तथ्यांचा स्वीकार करण्याऐवजी स्वतःची चूक लपवण्याचा प्रयत्न दिसून येत असल्याची टीका होत आहे.
​शास्त्री यांचे असे म्हणणे आहे की, त्यांचे वक्तव्य चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आले म्हणजे जे ते बोलले ते बरोबर आहे अशा याचा अर्थ होतो आणि ते आपल्या विधानावर आजही ठाम आहेत. “माझे म्हणणे बरोबरच आहे, पण कोणाचे मन दुखावले असेल तर मी माफी मागतो,” ही त्यांची भूमिका अत्यंत संदिग्ध आणि दुटप्पी आहे. वास्तव पाहता, समर्थ रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा गुरु-शिष्य असा कोणताही संबंध असल्याचे पुरावे इतिहासात उपलब्ध नाहीत. संसारात अपयशी ठरलेल्या किंवा जबाबदारीतून पळ काढणाऱ्या व्यक्तीकडे स्वराज्य देतील का? स्वराज्याच्या निर्मात्याबद्दल आणि त्यांच्या गुरुपदाबद्दल भाष्य करणे हे पूर्णतः चुकीचे आहे. शास्त्री यांनी आपली चूक मान्य करून, “रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज यांचा असा कोणताही संबंध नाही आणि तसा कोणताही पुरावा नाही, माझे विधान चुकले आहे,” अशा स्पष्ट शब्दांत माफी मागायला हवी, अशी मागणी आता जोर धरत आहे.
​अनेकांनी धीरेंद्र शास्त्री यांच्या या प्रवृत्तीची तुलना ‘अनाजी पंतांच्या’ मानसिकतेशी केली आहे. स्वराज्याच्या काळातही ज्या पद्धतीने काही शक्तींनी महाराजांची उंची कमी करण्याचा प्रयत्न केला, तसाच प्रकार आज आधुनिक काळात खोटा इतिहास पसरवून केला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य कोणत्याही एका जातीपुरते किंवा विशिष्ट धर्मापुरते मर्यादित नव्हते. त्यांचे ‘स्वराज्य’ हे अठरापगड जाती-धर्माच्या लोकांसाठी होते. महाराजांच्या सैन्यात आणि प्रशासनात अनेक मुस्लिम निष्ठावान मावळे उच्च पदांवर होते. महाराजांनी जातीवादाला कधीही थारा दिला नाही; उलट स्वराज्यात राहणारा प्रत्येक जण हा ‘मावळा’ आहे, हीच ओळख त्यांनी जतन केली.
​आज काही लोक स्वतःच्या फायद्यासाठी आणि विशिष्ट अजेंडा राबवण्यासाठी इतिहासाचे विकृतीकरण करत आहेत. अशा लोकांमुळे समाजात गैरसमज पसरत असून तरुण पिढीसमोर चुकीची माहिती जात आहे. शिवरायांनी कधीही धर्मांधतेला थारा दिला नाही, परंतु आज त्यांच्याच नावाचा वापर करून स्वतःची पोळी भाजण्याचा प्रयत्न काही मंडळी करत आहेत. ही बाब सामाजिक शांततेसाठी अत्यंत घातक आहे.
​थोडक्यात सांगायचे तर, यातील हा धीरेंद्र शास्त्री आहे धीरेंद्र शास्त्री यांनी इतिहासाचा कोणताही सखोल अभ्यास न करता केलेले हे विधान पूर्णपणे निराधार आहे. महाराष्ट्राची जनता खोट्या इतिहासाला कधीही थारा देणार नाही. महापुरुषांचा चुकीचा इतिहास सांगून स्वतःचे महत्त्व वाढवू पाहणाऱ्या प्रवृत्तींचा सर्वस्तरातून निषेध होत आहे. धीरेंद्र शास्त्री यांनी आपली ऐतिहासिक चूक मान्य करून, पुराव्यांचा अभाव असल्याचे स्वीकारून जाहीर माफी मागावी, हीच भावना आज प्रत्येक शिवप्रेमीच्या मनात आहे. कारण शिवरायांचे स्वराज्य हे सत्यावर आणि न्यायावर आधारलेले होते, तिथे खोट्या प्रचाराला जागा नाही.

Share