
महाराष्ट्राच्या राजकारणात ‘गुंगी गुडिया’ शब्दावरून अभूतपूर्व वाद; काँग्रेसच्या आक्रमक टिकेनंतर राज्यभर राडा, राष्ट्रवादीकडून जोरदार पलटवार!
बीड/विश्वमंथन
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एका अत्यंत वादग्रस्त शब्दप्रयोगाने संपूर्ण राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. ‘गुंगी गुडिया’ या शब्दावरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अक्षरशः रणकंदन माजले असून, वादाची ही आग आता विकोपाला गेली आहे.
सोमवारी बीडमध्ये घडलेल्या एका पत्रकार परिषदेतील प्रसंगाचा दाखला देत महाराष्ट्र काँग्रेसनं थेट सुनेत्रा पवार यांच्यावर अतिशय तिखट शब्दांत टीकास्त्र सोडलं. बीडमधील बिघडलेली कायदा व सुव्यवस्था या गंभीर विषयावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यापूर्वीच, धनंजय मुंडे यांनी अशा प्रकारे ती पत्रकार परिषद गुंडाळली आणि तिथून काढता पाय घेतला. कायदा सुव्यवस्थेचा हा ज्वलंत प्रश्न असताना आणि सुरेश-सुरेश असा आवाज दुमदुजत असताना घडलेल्या या प्रकारानंतर काँग्रेसनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक अत्यंत आक्रमक पोस्ट शेअर केली.
काँग्रेसने आपल्या अधिकृत हँडलवरून विचारले की, सुनेत्रा पवार अजून किती दिवस गुंगी गुडिया बनवून राहतील? त्या अनेक महत्त्वाच्या विषयांवर अजिबात बोलत नाहीत. अजित दादा पवारांचा झालेला संशयास्पद अपघात, त्या अपघाताची उच्चस्तरीय चौकशी का होत नाही? या अपघातामध्ये अद्यापपर्यंत गुन्हा का दाखल करण्यात आला नाही? या अतिशय महत्त्वाच्या प्रश्नांवर त्या साधं मूग गिळून गप्प का बसल्या आहेत? यासोबतच, त्यांना राज्याचे महत्त्वाचे अर्थखाते अद्यापपर्यंत का मिळाले नाही? यावरही त्या चकार शब्द काढायला तयार नाहीत. भारतीय जनता पक्ष त्यांच्या पक्षाच्या आणि त्यांच्याच पक्षातील लोकांच्या अधिकारांवर मोठ्या प्रमाणावर गदा आणत असताना, तेव्हाही त्या या अन्यायाविरुद्ध काहीएक बोलत नाहीत. सार्वजनिक जीवनात आणि चक्क उपमुख्यमंत्री पदाच्या अतिशय महत्त्वाच्या खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीने अशा प्रकारे मूग गिळून बसणे हे अत्यंत अशोभनीय आहे, असा घणाघाती आरोप काँग्रेसने केला.
काँग्रेसच्या या जळजळीत टिकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी थेट मुंबईतील काँग्रेस कार्यालयावर हल्लाबोल केला. जोरदार घोषणाबाजी करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनादरम्यान ठाण्यात हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतिमेला काळ फासण्यात आले, तर काँग्रेस कार्यालयाच्या फलकावर काळी शाई फेकण्यात आली. पुण्यातही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे पोलीस आणि संतप्त आंदोलकांमध्ये झटापट उडाली.
या संपूर्ण प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त करत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी म्हटले की, काँग्रेस पक्ष आता सर्वसामान्य लोकांच्या विचारांपासून आणि महिलांच्या सन्मानापासून खूप दूर गेला आहे. अशा प्रकारची हीन पातळीवरील विधाने काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून किंवा त्यांच्या अधिकृत हँडलवरून येत असावीत. आजचा काँग्रेस पक्ष चांगल्या आणि विचारी लोकांच्या हातात राहिलेला नाही, हेच या ट्विटवरून स्पष्टपणे दिसून येते. ज्या पक्षाचा विचार कमजोर आहे आणि ज्यांनी मनातून आधीच मानसिक पराभव स्वीकारला आहे, अशी उद्धट लोक आज काँग्रेस चालवत आहेत, असा पलटवार राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आला.
काँग्रेसच्या आरोपांना थेट निमित्त ठरवलेले धनंजय मुंडे यांनी थेट इंदिरा गांधी आणि सुनेत्रा पवारांची तुलना करत काँग्रेसला जोरदार प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, स्वर्गीय इंदिराजींनी देशाच्या पंतप्रधान म्हणून ज्या पद्धतीने अत्यंत कणखर काम केले, त्याच्यापेक्षाही कितीतरी चांगला अनुभव येणाऱ्या काळात या महाराष्ट्रात आमच्या नेत्या, या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी या ठिकाणी करून दाखवणार आहेत. आमच्या वहिनी साहेबांबद्दलचा हा द्वेष काँग्रेसच्या त्या पेजवरून उघडपणे बाहेर पडल्याचे मुंडे म्हणाले. राज्यभरात राष्ट्रवादीचे तीव्र आंदोलन आणि निषेध झाल्यानंतरही काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीला उघडपणे आव्हान दिले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी म्हटले की, आम्ही सुनेत्रा ताईंना टिकेच्या माध्यमातून कुठेही गुंगी गुडिया म्हटले असेल, तर त्यांनी स्वतःला दुर्गा सिद्ध करून दाखवावे. आणि जर त्यांना स्वतःला दुर्गा सिद्ध करायचे असेल तर त्यासाठी त्यांनी काही निस्र्प व निकष पूर्ण करावेत. त्यांनी ताबडतोब राज्याचे गृह खाते स्वतःच्या पक्षाकडे आणावे आणि अजित दादांच्या अपघाताचा शोध लावल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, अशी घोषणा त्यांनी करावी. तसेच, अजित दादांनी लाडक्या बहिणींचे जे १५०० रुपयांचे अनुदान वाढवून २१०० ते अडीच हजार रुपये करणार असल्याचे सांगितले होते, ते ताबडतोब पूर्ण करून दाखवावे, असे खुले आव्हान काँग्रेसने दिले.
हा ‘गुंगी गुडिया’ हा शब्द देशाच्या राजकारणात सर्वप्रथम १९६६ साली चर्चेत आला होता. त्यावेळी पंतप्रधान पदाच्या अगदी सुरुवातीच्या काळात ज्येष्ठ समाजवादी नेते राममनोहर लोहिया यांनी इंदिरा गांधींना उद्देशून हाच शब्द वापरला होता. त्यावेळी इंदिरा गांधी संसदेत फारशा बोलत नसत आणि पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या प्रभावाखाली वावरत असतात, असा विरोधकांचा मुख्य आरोप होता. काँग्रेसच्या याच जुन्या इतिहासाची आठवण आता राष्ट्रवादीचे नेते काँग्रेसला करून देत आहेत.
राष्ट्रवादीच्या नेत्यांनी स्पष्ट केले की, अशा खालच्या पातळीवरील टिकेचा तीव्र शब्दांत धिकार करण्याची खरी गरज आहे. कारण त्या काळामध्ये इंदिरा गांधींना सुद्धा गुंगी गुडिया म्हटले गेले होते, आणि त्यानंतर त्यांनी पुढे काय कर्तृत्व करून दाखवले, हे संपूर्ण देशाला माहीत आहे. फक्त जास्त बोलणे म्हणजे काहीतरी फार मोठे पराक्रम गाजवणे असा जर त्या पक्षाचा गोड गैरसमज असेल, तर तो पूर्णपणे चुकीचा आहे. या गोष्टीचा संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आमचे सर्व कार्यकर्ते तीव्र शब्दांत धिकार करत आहेत.
काँग्रेसच्या या टिकेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजकारणाच्या या घसरत्या पातळीबद्दल तीव्र चिंता आणि संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, राजकारण आता अतिशय खालच्या स्तरावर उतरले आहे. मूळामध्ये या लोकांना जनतेकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही, साधी कोणी विचारपूसही करत नाही, त्यामुळे फक्त बातम्यांमध्ये आणि प्रसिद्धीत राहण्याकरिता अशा प्रकारच्या हीन दर्जाच्या गोष्टी चालल्या आहेत. ‘बदनाम हुए तो क्या हुए, नाम तो हुआ’ अशा स्वार्थी वृत्तीने यांची कुचकामी कारवाई सुरू आहे. महाराष्ट्राच्या समृद्ध राजकीय संस्कृतीत इतक्या खालच्या थराला जाणारे राजकारण आपल्याला पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. सुनेत्रा पवारांवर केलेली ही अतिशय हीन टीका म्हणजे थेट राज्यातील सर्व लाडक्या बहिणींचा अपमान आहे, असे परखड मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. काँग्रेसने असे शब्द वापरताना मनाची नाही तर कमीतकमी जनाची तरी लाज बाळगली पाहिजे. राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा ताईंबद्दल असे अपशब्द काढणे म्हणजे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचा अवमान आहे, आणि लाडक्या बहिणी काय करू शकतात हे त्यांनी २०२४ च्या निवडणुकीत दाखवून दिले आहे, अशी आठवणही मुख्यमंत्र्यांनी करून दिली.
दरम्यान, आपल्या काकींबद्दल सुरू असलेल्या या संपूर्ण राजकीय वादामध्ये रोहित पवारांनी त्यांची तुलना थेट अजित दादांच्या आक्रमक कार्यशैलीशी करत काँग्रेसला सांघून घेण्याचा आणि समजावण्याचा प्रयत्न केला. अनेक लोकांना अजित दादांच्या धडाडीच्या आणि आक्रमक कामाची सवय झालेली आहे. दादा नेहमी अत्यंत आक्रमक पद्धतीने आपली भूमिका मांडायचे, रोखठोक बोलायचे. जर कुठेही अन्याय झाला, मग समोर कितीही मोठा नेता असो, दादा कधीही गप्प बसत नसत किंवा समोरच्याला गप्प केल्याशिवाय सोडत नसत. तीच तीच आक्रमक अपेक्षा तुम्ही आता सुनेत्रा काकींकडून ठेवणार असाल, तर ती कधीही पूर्ण होऊ शकणार नाही, कारण दादांची ती पोकळी कोणीही भरून काढू शकणार नाही, असे रोहित पवार म्हणाले.
दुसरीकडे, ठाकरे गटाच्या शिवसेनेने सुनेत्रा पवारांना काही मोलाचे सल्ले आणि टिप्स दिल्यात. अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्या दबावाला न जुमानता स्वतःचे खणखणीत मत हिमतीने मांडले पाहिजे. स्वर्गीय अजित पवारांच्या पत्नी असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राने त्यांचा कायम मानसन्मान ठेवलाच पाहिजे आणि पुढेही ठेवेन, पण तो मान टिकवून ठेवण्यासाठी वहिनींचा करारा बाणा असलाच पाहिजे, असे शिवसेनेने म्हटले.
दिवसभर चाललेल्या या हाय-व्होल्टेज ड्राम्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी संध्याकाळी पुन्हा एकदा तिसरी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी जुन्या इतिहासाची आठवण करून देत विरोधकांना पुन्हा काही तिखट टोले लगावले. जेव्हा इंदिरा गांधींना गुंगी गुडिया म्हटले गेले होते, त्यावेळी आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गुंडागर्दी केली नव्हती, विरोधकांच्या कार्यालयांवर कोणतेही हल्ले केले नव्हते. उलटपक्षी, इंदिरा गांधींनी त्या गुंगी गुडिया नसून खऱ्या अर्थाने दुर्गा आहेत, हे देशाला शब्दांतून नाही तर आपल्या कणखर कृतीतून पटवून दाखवले. त्यामुळे ‘गुंगी गुडिया’ या काँग्रेसच्या टिकेला योग्य वेळी आणि योग्य त्या माध्यमातून चोख उत्तर देणार असल्याचे खुद्द सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले आहे. मी योग्य वेळ आल्यावर नक्कीच उत्तर देईन, असे त्या म्हणाल्या.
या संपूर्ण राजकीय गोंधळात आणि संघर्षात सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे, आतापर्यंत नेहमी आणीबाणीवरून काँग्रेसला धारेवर धरणारे महायुतीचे नेतेच आज काँग्रेसला इंदिरा गांधींच्या कणखरपणाची उदाहरणे देताना दिसत आहेत. आता ज्या-ज्या गंभीर मुद्द्यांवर बोलण्याचे थेट आव्हान काँग्रेसकडून दिले गेले आहे, त्यावर सुनेत्रा पवार शब्दांनी प्रत्युत्तर देणार की थेट इंदिरा गांधींप्रमाणे आपल्या कृतीतूनच विरोधकांना चोख उत्तर देणार, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे लागले आहेत.










