क्राईम

बीडमध्ये थरार: अंबाजोगाईत तरुणाची निर्घृण हत्या

अंबाजोगाईत रक्ताचा सडा; किरकोळ वादातून तरुणाचा खून

बीडमध्ये गुन्हेगारांचा उच्छाद! आंबेजोगाईत भरचौकात तरुणाची निर्घृण हत्या; कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह

​बीड/
बीड जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी अक्षरशः उच्छाद मांडला असून, याचाच एक अत्यंत भयंकर आणि काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. बीडच्या आंबेजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथे शनिवारी मध्यरात्री किरकोळ वादातून एका २१ वर्षीय तरुणाची धारदार चाकूंनी सपासप वार करून अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. या जीवघेण्या हल्ल्यामध्ये मृत तरुणाचा एक मित्र देखील गंभीर जखमी झाला असून, या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. ज्ञानेश्वर वाकडे असे या दुर्दैवी तरुणाचे नाव असून, तो मूळचा आंबेजोगाई तालुक्यातील पट्टी वडगाव येथील रहिवासी होता. ज्ञानेश्वर गेल्या वर्षभरापासून लातूर जवळील राष्ट्रीय महामार्गावरील एका हॉटेलमध्ये कूक म्हणून काम करत होता. काही दिवसांपूर्वीच तो आपली सुट्टी घालवण्यासाठी आपल्या गावी आला होता, परंतु शनिवारी रात्री त्याच्यासोबत जे घडले, त्याने वाकडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शनिवारी रात्री ११:३० च्या सुमारास ज्ञानेश्वर आपल्या दोन मित्रांसह मोटरसायकलवरून आंबेजोगाईहून घाटनांदूरकडे जात होता. घाटनांदूर येथील साठे चौकात पोहोचल्यावर तिथे आधीच उपस्थित असलेल्या काही युवकांसोबत ज्ञानेश्वर आणि त्याच्या मित्रांचा कोणत्यातरी किरकोळ कारणावरून जोरदार वाद झाला. हा वाद काही क्षणातच इतका विकोपाला गेला की, समोरच्या संशयित गुंडांनी थेट धारदार चाकू बाहेर काढले आणि काही समजण्याच्या आतच आरोपींनी ज्ञानेश्वरवर चाकूने सपासप वार करायला सुरुवात केली. अचानक झालेल्या या भीषण हल्ल्यामुळे साठे चौकात एकच गोंधळ निर्माण झाला. ज्ञानेश्वरवर झालेले वार इतके गंभीर आणि जीवघेणे होते की, तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि जागीच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या हल्ल्यादरम्यान ज्ञानेश्वरसोबत असलेल्या दोन मित्रांपैकी एकाने प्रसंगावधान राखत तिथून पळ काढला आणि स्वतःचा जीव वाचवला, मात्र दुसरा मित्र या हल्ल्यात गंभीर जखमी झाला असून त्याला तातळीने आंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

​या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच आंबेजोगाई ग्रामीण पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून ज्ञानेश्वरचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. बीड जिल्ह्यात सध्या किरकोळ कारणावरून थेट जीव घेण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल गेली आहे, हे पाहून सर्वसामान्य नागरिक घाबरले आहेत. या घटनेमुळे घाटनांदूर आणि परिसरामध्ये तीव्र संतापाची लाट निर्माण झाली आहे. केवळ एका किरकोळ वादावरून भरचौकात चाकूने वार करून एखाद्या व्यक्तीची हत्या करणे ही अतिशय गंभीर बाब आहे. बीड जिल्ह्यामध्ये गुन्हेगारांना पोलिसांचा अजिबात धाक उरलेला नाही का, असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत. आंबेजोगाई ग्रामीण पोलीस सध्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून या हत्या प्रकरणामध्ये गुन्हा नोंदवण्याचे काम करत आहेत, त्याचबरोबर आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी आता पथके सुद्धा रवाना केली आहेत. मात्र, सुट्टीसाठी घरी आलेल्या एका तरुण मुलाचा अशा पद्धतीने दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

बीड जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीचे मूळ कारण आता चव्हाट्यावर येत असून, कायद्याचा धाक राहिला नसल्याचे दिसून येत आहे. गुन्हेगारांना पोलिसांचा दरारा का वाटत नाही, याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या व्यवस्थेत असलेले दोष. समाजात गुन्हेगारी वाढते आहे कारण कायद्याची अंमलबजावणी पाहिजे तितकी कडक आणि वेळेवर होताना दिसत नाही. जेव्हा एखाद्या गुन्ह्यामध्ये कडक शिक्षा मिळत नाही, तेव्हा गुन्हेगारांचे धाडस वाढत जाते. आजच्या घडीला गुन्हेगारीला खतपाणी मिळण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे राजकारणाचे गुन्हेगारीकरण. दुर्दैवाने राजकारणामध्ये जास्त नेते हे गुन्हेगार वृत्तीचे किंवा गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत, त्यामुळे कायदे सक्त होताना दिसत नाहीत. जेव्हा कायदे बनवणारेच किंवा त्यांना संरक्षण देणारे लोक गुन्हेगारी प्रवृत्तीचे असतात, तेव्हा कायद्याची धार बोथट होते. गुन्हेगारांना राजकीय वरदहस्त असल्याने पोलीस कारवाई करताना अनेकदा दबावाखाली काम करतात किंवा त्यांना पाहिजे तशी कारवाई करता येत नाही. जोपर्यंत राजकारणातून गुन्हेगारी हद्दपार होत नाही आणि कायद्याचा धाक पुन्हा निर्माण होत नाही, तोपर्यंत बीडसारख्या जिल्ह्यांमध्ये अशा घटना घडतच राहणार आहेत. सामान्य माणसाला सुरक्षित वाटेल असे वातावरण निर्माण करणे ही राज्यकर्त्यांची आणि प्रशासनाची जबाबदारी आहे. मात्र, राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे कायदे केवळ कागदावरच राहिले आहेत का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. ज्ञानेश्वरसारख्या तरुण मुलाचा बळी गेल्यानंतर तरी प्रशासनाला जाग येईल का, आणि राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप थांबून गुन्हेगारांवर कठोर कारवाई होईल का, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. बीडमधील ही गुन्हेगारी कधी संपणार आणि सामान्य नागरिकांना भीतीमुक्त जगता येईल का, याचे उत्तर काळच देईल. आरोपींना लवकरात लवकर गजाआड करून त्यांना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. कायद्याची अंमलबजावणी करताना कोणताही भेदभाव न करता, गुन्हेगार कोणत्या पक्षाचा आहे किंवा त्याचा कोणाशी संबंध आहे, हे न पाहता पोलिसांनी कडक कारवाई केली तरच गुन्हेगारीवर आळा बसू शकेल. बीड जिल्ह्याची ओळख गुन्हेगारीचा जिल्हा म्हणून न होता, शांतता आणि सुव्यवस्थेचा जिल्हा म्हणून व्हावी, अशी प्रत्येक नागरिकाची इच्छा आहे. या प्रत्येक घटनेचे अपडेट आम्ही आमच्या बातमीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत, कारण बातमी म्हणजे केवळ माहिती नसून ते समाजाचे आरसा आहे. आपण सर्वांनी मिळून गुन्हेगारीविरुद्ध आवाज उठवला पाहिजे, तरच अशा घटनांना वेळीच रोखता येईल.

Share
Show More

Related Articles

Back to top button