
पुण्यात संतापाचा लाव्हा फुटला! १२ वर्षांच्या चिमुकलीवर नराधमाचा अत्याचार; विश्रांतवाडी पोलीस ठाण्याबाहेर नागरिकांचा ठिय्या, खाकीच्या कारभारावर गंभीर आरोप
पुणे/विश्वमंथन
पुणे शहरातून एक अत्यंत हादरवून टाकणारी आणि संतापजनक घटना समोर आली आहे. पुण्यातील विश्रांतवाडी परिसरातील कामगार नगर भागात एका १२ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराची अत्यंत निंदनीय घटना घडली आहे. या घटनेमुळे संतप्त झालेला सर्वसामान्य नागरिकांचा लढा आणि महिलांचा रोष अखेर अनावर झाला असून, न्याय मागण्यासाठी शेकडो नागरिक थेट विश्रांतवाडी पोलीस ठाण्याबाहेर रस्त्यांवर उतरले आहेत. या गंभीर प्रकरणात पोलिसांनी सुरुवातीला दाखवलेला हलगर्जीपणा आणि दबावाचे राजकारण चव्हाट्यावर आल्याने खाकी वर्दीच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
https://vishwamanthan.com/buldhana-illegal-abortion-khamgaon-doctor-case/
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेली ही घटना अत्यंत मन हेलावून टाकणारी आहे. गणेशोत्सवाच्या काळात, म्हणजेच साधारण १२ तारखेच्या सुमारास या १२ वर्षांच्या अबोध बालकीवर नराधमाने तब्बल तीन वेळा अमानुष अत्याचार केला. इतकेच नव्हे तर, प्रत्येक वेळी अत्याचार केल्यानंतर आरोपीने त्या चिमुकलीला गप्प बसण्यासाठी भाग पाडले आणि तुझ्या आई-वडिलांना जिवे मारून टाकू अशी भयानक धमकी दिली. या सततच्या शारीरिक आणि मानसिक त्रासामुळे त्या निष्पाप लेकराची प्रकृती खालावत गेली. अखेरीस त्रासाचे प्रमाण असह्य झाल्यावर त्या मुलीने घडलेला सर्व प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितला. पोटच्या पोरीवर आलेले हे मोठे संकट ऐकून आई-वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली.
पीडित मुलीच्या अंगातून रक्तस्त्राव होत असताना अत्यंत बिकट परिस्थितीत तिचे आई-वडील न्याय मागण्यासाठी २२ तारखेला थेट विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात पोहोचले. मात्र, या संवेदनशील प्रकरणातही पोलिसांनी अत्यंत संतापजनक आणि असंवेदनशील भूमिका घेतल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. लेकराची प्रकृती आणि अंगावरील जखमा स्पष्ट सांगत असतानाही पोलिसांनी या गंभीर प्रकरणाचे गांभीर्य ओळखले नाही. बलात्कारासारखा अत्यंत गंभीर गुन्हा दाखल करण्याऐवजी पोलिसांनी केवळ साध्या ‘छेडछाडीचा’ गुन्हा नोंदवून प्रकरणाची बोळवण करण्याचा प्रयत्न केला. एवढेच नव्हे तर न्याय मागण्यासाठी आलेल्या त्या गरीब कुटुंबाला आणि महिलांना धक्काबुक्की करून पिटाळून लावण्यात आले, ज्यामुळे पोलीस यंत्रणेच्या भूमिकेबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या संपूर्ण प्रकरणात पीडित मुलीची प्रकृती सतत बिघडत चालल्याने तिला उपचारासाठी तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे ससूनमधील डॉक्टर बोरुटे आणि डॉक्टर शेटे यांनी जेव्हा त्या लेकराची कसून तपासणी केली, तेव्हा तिच्यासोबत अतिशय अमानुष आणि अनैसर्गिक कृत्य झाल्याचे उघडकीस आले. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले की, जोपर्यंत पोलिसांची एमएलसी (MLC) प्रक्रिया पूर्ण होत नाही, तोपर्यंत योग्य उपचार करणे कठीण आहे. या सर्व घडामोडीनंतर कुठे पोलीस यंत्रणेला जाग आली, परंतु तरीही पोलिसांनी तातडीने कठोर कारवाई टाळत प्रकरण दाबण्याचाच प्रयत्न केला असा आरोप पीडित कुटुंबाने व स्थानिक नागरिकांच्या वतीने करण्यात आला आहे.
या प्रकरणात वाढता रोष पाहता आणि न्याय मिळत नाही हे लक्षात आल्यानंतर, कामगार नगरमधील शेकडो महिला आणि नागरिक रस्त्यावर उतरले. या सर्व महिला कोणत्याच मोठ्या राजकारणी किंवा श्रीमंत घराण्यातील नाहीत, तर हातावर पोट असणाऱ्या, घरोघरी जाऊन भाजी विकणाऱ्या, महानगरपालिकेत कचरा उचलणाऱ्या, झाडू मारणाऱ्या आणि स्वच्छता करणाऱ्या सामान्य कष्टकरी महिला आहेत. आपल्या परिसरातील एका लहान बहिणीवर किंवा लेकीवर झालेल्या या अत्याचाराविरुद्ध या महिलांनी पोलीस ठाण्यासमोरच ठिय्या मांडला. संध्याकाळपासून सुरू झालेल्या या आंदोलनामुळे विश्रांतवाडी परिसरातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आणि रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.
या आंदोलनादरम्यान नेत्या सुषमा अंधारे देखील घटनास्थळी तातडीने पोहोचल्या आणि त्यांनी पोलिसांच्या कारभाराचा पर्दाफाश केला. आपल्या हातात दोन वेगवेगळ्या एफआयआर (FIR) दाखवत त्यांनी पोलिसांच्या कागदी घोड्यांचा आणि भोंगळ कारभाराचा समाचार घेतला. पोलिसांनी सुरुवातीला केवळ छेडछाडीचा गुन्हा दाखल करून आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला, असा थेट आरोप त्यांनी केला. एवढेच नाही तर, या प्रकरणात अमोल पासंगे नावाच्या व्यक्तीने मध्यस्थी करून दोन लाखांची आर्थिक तडजोड आणि प्रकरण मॅनेज करण्याचा प्रयत्न केला, असा गंभीर आरोपही समोर आला. या गुन्ह्यात केवळ मुख्य नराधमच नव्हे, तर ज्या महिलेने पीडित मुलीचे हात बांधले आणि तोंडात बोळा कोंबला, त्या महिलेला तसेच या तडजोडीत सामील असलेल्यांना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी संतप्त मागणी यावेळी करण्यात आली.
स्थानिक नागरिकांचा आणि महिलांचा हा उद्रेक पाहिल्यानंतर पोलीस अधिकारी अखेरीस जागे झाले. पोलिसांनी या प्रकरणात पोक्सो (POCSO) कायद्यान्वये आणि वैद्यकीय अहवालानुसार पुरवणी जबाब नोंदवून गुन्ह्यात कलमवाढ केली असल्याचे स्पष्ट केले. मुख्य आरोपीला तात्काळ बेड्या ठोकण्यात आल्या असून तो सध्या येरवडा कारागृहात असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच या प्रकरणाचा तपास वेगाने पूर्ण करून खटला जलदगती (फास्ट ट्रॅक) न्यायालयात चालवला जाईल आणि आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी पोलीस दल कटिबद्ध आहे, असे आश्वासन पोलिसांच्या वतीने देण्यात आले.
परंतु, या घटनेमुळे परिसरातील इतर गंभीर समस्या देखील ऐरणीवर आल्या आहेत. कामगार नगर परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध देशी दारूचे गुत्ते, गावठी दारूच्या भट्ट्या, तसेच चरस आणि गांजा विकणारे अंमली पदार्थांचे तस्कर खुलेआम राजरोसपणे व्यवसाय करत असल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे. हे व्यसनाधीन लोक आणि नशेत चूर असणारे तरुण अशा प्रकारची विकृत कृत्ये करत असून, पोलिसांच्या आशीर्वादामुळेच हे अवैध धंदे सुरू आहेत, असा रोखडोक सवाल महिलांनी उपस्थित केला. जोपर्यंत या भागातील अवैध धंदे आणि दारूचे अड्डे पूर्णपणे उद्ध्वस्त होत नाहीत आणि दोषींवर कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत हा लढा असाच सुरू राहील, असा स्पष्ट इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे. एका १२ वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या या अमानुष अत्याचाराने पुण्यात पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आणला असून संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत आहे.










