
मुंबईच्या बोरिवलीत खळबळ! प्रसिद्ध ‘राधाकृष्ण हॉटेल’मधील डोशात निघाला मृत उंदीर; ग्राहकाच्या दाव्याने अन्न सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
मुबई/विश्वमंथन
मुंबईच्या बोरिवली पश्चिम परिसरातून एक अत्यंत संतापजनक आणि मन अस्वस्थ करणारी बातमी समोर आली आहे. बोरिवली स्टेशन जवळ असलेल्या एलटी रोडवरील लोकप्रिय ‘राधाकृष्ण हॉटेल’मध्ये जेवणात मृत उंदीर आढळल्याचा गंभीर आरोप एका ग्राहकाने केला आहे. या प्रकारामुळे अन्नाची स्वच्छता आणि सुरक्षितता धोक्यात आल्याचे पुन्हा एकदा उघड झाले असून खवय्यांमध्ये आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे.
काय आहे नेमकी घटना?
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, अमित त्रिवेदी हे आपल्या दोन भावांसह आणि लहान मुलासोबत बोरिवली पश्चिम येथील एलटी रोडवरील ‘राधाकृष्ण हॉटेल’मध्ये दक्षिण भारतीय पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी गेले होते. हॉटेलमध्ये बसून त्यांनी ‘मिसूर मसाला डोसा’ची ऑर्डर दिली. काही वेळातच गरम गरम डोसा त्यांच्या टेबलवर आला. त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी तो डोसा खाण्यास सुरुवात केली. डोशाचे काही घास पोटात गेल्यानंतर, ताटातील डोशात काहीतरी अस्वच्छ आणि विचित्र वस्तू असल्याचा संशय आला. जवळून निरखून पाहिले असता, त्या डोशामध्ये एक छोटा मृत उंदीर स्पष्टपणे दिसून आला.
हा भयंकर प्रकार डोळ्यांसमोर पाहताच अमित त्रिवेदी यांच्या पायाखालची जमीनच सरकली. ताटात चक्क मृत उंदीर निघाल्याचे पाहून त्यांना व त्यांच्या सहकाऱ्यांना तीव्र धक्का बसला. अन्नात झालेली ही भयानक अस्वच्छता पाहून त्यांना जागेवरच उलट्या सुरू झाल्या. एका नामांकित हॉटेलमध्ये ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ खेळला जात असल्याचा हा प्रकार अत्यंत लाजीरवाणा आहे.
हॉटेलमधील अस्वच्छता आणि प्रशासनाचे दुर्लक्ष
या धक्कादायक घटनेमुळे संबंधित हॉटेलमधील अन्नाची गुणवत्ता, स्वयंपाकघरची अस्वच्छता आणि आरोग्याचे नियम यावर अत्यंत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. एरवी आपण हॉटेलमध्ये जाऊन आवडीने जेवतो, मात्र तिथे आपल्या ताटात काय वाढले जात आहे, याची खात्री कोण देणार? असा संतप्त सवाल या निमित्ताने सर्वसामान्य नागरिकांमधून विचारला जात आहे. हॉटेल चालकांचा पैसा कमावण्याच्या नादात ग्राहकांच्या जीवाशी कसा खेळ चालला आहे, हे या घटनेवरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
तात्काळ पोलिसांत धाव आणि प्रशासनाची भूमिका
हॉटेलमधील हा प्रकार उघडकीस आल्यानंतर अमित त्रिवेदी यांनी कोणताही वेळ न घालवता थेट बोरिवली पोलिसांशी संपर्क साधला आणि घडलेल्या प्रकाराची सविस्तर माहिती दिली. पोलिसांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेत कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे.https://vishwamanthan.com/सध्या राज्यामध्ये अन्न आणि औषध प्रशासन (FDA) कडून हॉटेल व्यवसायावर आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर कडक कारवाईची मोहीम सुरू आहे. एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली अन्न सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल्सचे परवाने रद्द करण्याची मोठी कारवाई राज्यभर सुरू आहे. बोरिवलीच्या या राधाकृष्ण हॉटेलमध्ये हा प्रकार उघडकीस आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
पुढील कठोर कारवाईची प्रतीक्षा
एकिकडे एफडीए अन्न सुरक्षेसाठी कठोर पावले उचलत असताना, दुसरीकडे प्रत्यक्षात काही हॉटेल्समध्ये मात्र ग्राहकांच्या आरोग्याशी असा खेळ सुरूच असल्याचे यावरून स्पष्ट होते. आता या गंभीर प्रकरणात अन्न आणि औषध प्रशासन (FDA) तसेच महापालिका प्रशासन नेमकी काय आणि कशी कारवाई करते, याकडे संपूर्ण मुंबईकरांचे लक्ष लागून राहिले आहे. ग्राहकांच्या जीवाशी खेळणाऱ्या अशा बेजबाबदार हॉटेल चालकांवर कायदेशीर पातळीवर कठोर दंडात्मक व फौजदारी कारवाई होणे गरजेचे आहे, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे.
https://vishwamanthan.com/gondhal-movie-oscar-nomination-santosh-davkhar/










