
बुलढाणा: गर्भलिंग निदान व अवैध गर्भपाताच्या रॅकेटचा पर्दाफाश; खामगावमधील डॉक्टरवर गंभीर आरोप
बुलढाणा/विश्वमंथन
केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्याच मतदारसंघातून एक अत्यंत संतापजनक आणि काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. बुलढाणा जिल्ह्यात पैशांच्या लोभापोटी डॉक्टरकीला कलंक लावणाऱ्या एका नराधम डॉक्टरचा राक्षसी अवतार उघडकीस आला आहे. गर्भलिंग निदान करून त्यानंतर बेकायदेशीरपणे गर्भपात करण्याचे मोठे रॅकेट या भागात सक्रिय असल्याचे समोर आल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. लहान मुलींना पोटातच संपवण्याचा हा किळसवाणा प्रकार उघडकीस आल्यानंतर सर्वसामान्यांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, हा संपूर्ण धक्कादायक प्रकार एका सोनोग्राफी सेंटरवर काम करणाऱ्या प्रामाणिक कंपाउंडरच्या धैर्यानं चव्हाट्यावर आला आहे. या नराधम डॉक्टरांच्या कृत्याला कंटाळून आणि या अन्यायाविरुद्ध आवाज उठवत संबंधित कंपाउंडरने पुरावे गोळा केले. त्यानंतर आरोग्यमंत्र्यांसह जिल्हा शल्यचिकित्सक आणि संबंधित आरोग्य यंत्रणेकडे पुराव्यासह लेखी तक्रार देऊन याप्रकरणी तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या गंभीर तक्रारीची दखल घेत वैद्यकीय अधीक्षकांनी तत्काळ कारवाई करत या प्रकरणाच्या चौकशीसाठी तीन सदस्यांची विशेष समिती नेमली आहे. चौकशी समितीने संबंधित व्यक्तीचा जबाब नोंदवून घेतला असून, या प्रकरणाशी संबंधित सर्व व्हिडिओ आणि पुरावे पेनड्राईव्हमध्ये आपल्या ताब्यात घेतले आहेत. आता ही चौकशी समिती या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत असून, वरिष्ठांनाही यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. चौकशीमध्ये जे दोषी आढळतील, त्यांच्यावर कठोर कारवाईचा बडगा उगारला जाईल, असा बळावलेला सूर प्रशासनाकडून लावला जात आहे.
या संपूर्ण प्रकरणाच्या केंद्रस्थानी खामगाव येथील डॉक्टर राजेश अरबट यांचे नाव समोर आले आहे. याप्रकरणी प्रसारमाध्यमांनी आणि प्रशासनाने संबंधित डॉक्टरशी संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न केला, परंतु ते माध्यमांसमोर किंवा उपलब्ध होऊ शकले नाहीत. मात्र, या रॅकेटमध्ये केवळ एकच डॉक्टर नसून खामगाव आणि परिसरातील अनेक डॉक्टर या काळ्या कारनाम्यात सामील असल्याचा संशय बळावला आहे.
सोनोग्राफी सेंटरवर काम करणाऱ्या पीडित कंपाउंडरने मीडियाशी बोलताना या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. त्याने सांगितले की, हे डॉक्टर राजेश अरबट खामगाव येथील असून, जिल्ह्यातील इतरही अनेक डॉक्टर पेशंटना त्यांच्याकडे पाठवत असत. रुग्णांना पोटात मुलगा आहे की मुलगी हे तपासण्यासाठी या सेंटरवर पाठवले जायचे. यासाठी तब्बल तीस ते चाळीस हजार रुपयांपर्यंतची भरभक्कम फी उकळली जात असे. विशेष म्हणजे, हे बेकायदेशीर काम करण्यासाठी संबंधित डॉक्टर आपल्यावर मोठा दबाव टाकत असत आणि जबरदस्तीने हे कृत्य करून घेत होते, असा खळबजनक दावा या कंपाउंडरने केला आहे. हा गैरप्रकार आजचा नसून गेल्या बारा वर्षांपासून अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने सुरू असल्याचा गौप्यस्फोटही त्याने केला आहे.
आपल्या हाताकडून हे चुकीचे आणि पाप ठरवणारे काम घडत असल्यामुळे मनाला खूप त्रास होत होता. आपण या गोष्टीला अनेकदा विरोधही केला होता, असे कंपाउंडरने सांगितले. लहान-लहान निष्पाप जीवांचा बळी जात आहे आणि लोक पैशांच्या बळावर हे अनैतिक कृत्य करून घेत आहेत, हे चुकीचे असल्याचे आपण डॉक्टरांना दोन-तीन वेळा समजावण्याचा प्रयत्न केला होता. आपल्या हातातून हे चुकीचे वर्तन घडत आहे, असेही त्यांना बोललो होतो. परंतु, त्यावर ते डॉक्टर अत्यंत उद्धटपणे उत्तर देत असत. तुला तुझ्या पगाराशी मतलब आहे, बाकीच्या गोष्टींशी काहीही घेणेदेणे नाही, असे म्हणून ते नेहमी टाळाटाळ करायचे. एवढेच नव्हे तर, तुला पाहिजे तेवढे पैसे आणि पगार मिळतोय ना, मग जास्त बोलू नकोस, असा दम भरत ते आपल्याला सतत धमक्या देत असत, अशी आपबिती या कर्मचाऱ्याने मांडली आहे.
या प्रकारामुळे आता बुलढाणा जिल्ह्यातील नागरिक हादरून गेले आहेत. हजारो लेकींना या गर्भलिंग निदानाच्या माध्यमातून गंभीर गुन्हेगारी कृत्य करून गर्भातच संपवण्यात आले असावे, अशी दाट शक्यता आता पुरावे पाहिल्यानंतर निर्माण झाली आहे. पोटात लेकी असल्याचं कळताच त्यांना अत्यंत क्रूरपणे कुस्करून टाकण्याचा हा प्रकार अत्यंत संतापजनक आहे. कायद्याच्या दृष्टीने गर्भलिंग निदान करणे आणि त्यानंतर गर्भपात करणे हा अत्यंत गंभीर व अजामीनपात्र गुन्हा आहे. असे असतानाही कायद्याची कोणतीही भीती न बाळगता हे रॅकेट राजरोसपणे सुरू होते.
सध्या या प्रकरणाची व्याप्ती बरीच मोठी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चौकशी समितीने याप्रकरणी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. ज्या-ज्या डॉक्टरांची नावे या प्रकरणात समोर येत आहेत किंवा ज्यांचा सहभाग असू शकतो, त्यांना चौकशीसाठी बोलावले जात आहे. त्यांचे जबाब नोंदवून घेतले जात असून, त्यांच्याकडे यासंदर्भात स्पष्टीकरण मागितले जात आहे. तुम्ही केलेल्या कृत्याबाबत तुमच्याकडे काय पुरावे आहेत आणि तुमच्यावर जे आरोप झाले आहेत, त्यावर तुमचे नेमके काय उत्तर आहे, याची विचारणा केली जात आहे. सर्वांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर आणि योग्य ती चौकशी केल्यानंतर यावर अंतिम निष्कर्ष काढून संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
एका बाजूला देशात आणि राज्यात महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी शासनाकडून विविध कायदे केले जातात, जनजागृती मोहिमा राबवल्या जातात. परंतु, ज्यांच्यावर लोकांच्या आरोग्याची आणि जीवाची जबाबदारी आहे, तेच डॉक्टर जर पैशांच्या लोभापोटी अशा राक्षसी वृत्तीने वागू लागले, तर सर्वसामान्य नागरिकांनी दाद मागची कोणाकडे, असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण वैद्यकीय क्षेत्राला कारेचे फास लागले असून, दोषी असणाऱ्या कोणत्याही डॉक्टरला पाठीशी घातले जाऊ नये आणि त्यांच्यावर सदोष वधाचा तसेच कठोर कायद्यानुसार गुन्हा दाखल करून कठोर शिक्षा केली जावी, अशी संतप्त मागणी आता सर्व स्तरातून जोर धरत आहे. या प्रकरणातील पुढील चौकशीत अजून कोणते मोठे चेहरे समोर येतात आणि पोलीस प्रशासन यावर काय कायदेशीर कारवाई करते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.










