
बुलढाणा: जयस्तंभ चौकातील जीवघेणा नालीमुळे ठरतोय मृत्यूचा सापळा; प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात नागरिकांमध्ये संताप
बुलढाणा/विश्वमंथन
शहरातील जयस्तंभ चौकापासून अवघ्या काही अंतरावर, शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या अत्यंत जवळ आणि ‘महेश इलेक्ट्रिक’ या दुकाना जवळ असलेल्या मुख्य वाहतुकीच्या रस्त्यावर सध्या एका महाविशाल आणि धोकादायक नालीने अत्यंत गंभीर रूप धारण केले आहे. हा रस्ता शहराचा मुख्य वर्दळीचा प्राण प्रश्न असून, येथून हजारो नागरिक, शालेय विद्यार्थी, महिला आणि वाहनधारक जीव मुठीत धरून ये-जा करतात. अत्यंत संतापजनक, दुर्देवी आणि लज्जास्पद बाब म्हणजे, या रस्त्याच्या अगदी समोर पोलीस स्टेशन आणि नगरपालिका कार्यालय दिमाखात उभे असतानाही, प्रशासनाचे या भीषण समस्येकडे पूर्णपणे आणि जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाले आहे. डोळ्यादेखत ही नाली उघडी असताना, वाहने खड्ड्यात कोसळून अपघात होत असतानाही प्रशासन सत्तेच्या आणि भ्रष्टाचाराच्या झोपेत निद्रिस्त असल्यामुळे संतप्त नागरिकांमधून नगरपालिकेविरोधात प्रचंड रोष उसळला आहे.
या मुख्य रस्त्यावरील जीवघेण्या नालीमुळे अपघातांचे सत्र दिवसेंदिवस अधिकच धोकादायक बनले आहे. भर दिवसा एका चारचाकी (फोर व्हीलर) गाडीचा पुढचा भाग अचानक या नालीत कोसळून मोठा आणि भीषण अपघात झाला. नालीचा अंदाज न आल्यामुळे गाडीचे मोठे नुसकान झाले आणि चालकाला नाहक शारीरिक, मानसिक व आर्थिक मनस्ताप सहन करावा लागला. हा प्रकार ताजा असतानाच, रात्रीच्या निर्भिड अंधारात याच नालीत पुन्हा एका दुसऱ्या चारचाकी (फोर व्हीलर) गाडीचा अत्यंत भयानक अपघात घडला. रात्रीच्या वेळी रस्त्यावर कोणतीही योग्य प्रकाशयोजना किंवा स्ट्रीट लाईट नसणे आणि नालीभवती सुरक्षेची कोणतीही चिन्हे, बॅरिकेड्स किंवा रिफ्लेक्टर्स नसणे, यामुळे ती वाहन थेट नालीत जोरात जाऊन आदळली. या दोन्ही थरारक दुर्घटनांमध्ये सुदैवाने जीवितहानी टळली असली, तरी गाड्यांचे नुकसान होऊन प्रवाशांचा जीव टांगणीला लागला होता. मुख्य रस्त्यावर पडलेला हि नाली म्हणजे थेट नागरिकांच्या आयुष्याशी खेळणारा एक उघडा मृत्यूचा सापळा ठरत आहे.
भारतीय कायदे, मोटार वाहन कायदा आणि रस्ते सुरक्षा नियमांनुसार, जेव्हा कोणत्याही सार्वजनिक व वर्दळीच्या रस्त्यावर असा जीवघेणा खड्डा(नाली ) पडतो किंवा रस्ता खराब होतो, तेव्हा त्या ठिकाणी तात्काळ दुरुस्ती करणे, तातडीने डांबरीकरण करणे किंवा तोपर्यंत प्रवाशांच्या सुरक्षेसाठी लोखंडी बॅरिकेड्स, धोक्याची सूचना देणारे फलक आणि रात्रीच्या वेळी झळकणारे फलक लावणे, हे संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेचे म्हणजेच नगरपालिकेचे प्रथम, कायदेशीर आणि बंधनकारक कर्तव्य असते. मात्र, बुलढाणा नगरपालिकेने या सर्व कायदेशीर नियमांना आणि सुरक्षा मानदंडांना अक्षरशः केराची टोपली दाखवली आहे. घटनास्थळावर नगरपालिकेने कोणतीही सुरक्षा साधने किंवा प्रतिबंधक उपाययोजना केलेली नाही. प्रशासनाच्या या अत्यंत गंभीर आणि आपराधिक हलगर्जीपणामुळे कधीही कोणतीही मोठी प्राणघातक दुर्घटना घडू शकते. देशाच्या संविधानाने प्रत्येक नागरिकाला जगण्याचा आणि सुरक्षिततेचा अधिकार दिला असून, प्रशासनाच्या या नकोशा अनास्थेमुळे त्या मूलभूत अधिकारावरच अक्षरशः घाला घातला जात आहे. मानवी जीव हा अत्यंत अमूल्य असून त्याचे रक्षण करणे ही प्रशासनाची सर्वोच्च कायदेशीर आणि नैतिक जबाबदारी आहे, परंतु प्रत्यक्ष कृतीत याकडे पूर्ण डोळेझाक केली जात आहे.
या परिसरातील त्रस्त रहिवासी, व्यापारी आणि या मार्गावरून रोज प्रवास करणारे हजारो नागरिक आता प्रशासनाच्या विरोधात अत्यंत आक्रमक झाले आहेत. नागरिकांचा संतप्त सवाल आहे की, “समोरच पोलीस स्टेशन आणि नगरपालिका कार्यालय असताना, आणि वारंवार गाड्या या नालीत जाऊन जीवघेणे अपघात होत असतानाही येथील सुस्तावलेल्या अधिकाऱ्यांना हे दिसत नाही का? एखाद्या निष्पाप नागरिकाचा जीव गेल्यावरच हे झोपेचे सोंग घेतलेले प्रशासन खडबडून जागे होणार का?” रस्त्यावरील या जीवघेण्या नालीमुळे आणि प्रशासकीय दिरंगाईमुळे भविष्यात एखाદી प्राणघातक दुर्घटना घडली, तर त्याची संपूर्ण कायदेशीर आणि नैतिक जबाबदारी कोणाची असा कळीचा आणि संतप्त सवाल संपूर्ण शहरातून उपस्थित केला जात आहे.
नगरपालिका प्रशासनाने आता कुठलीही कागदी घोडे न नाचवता तातडीने या गंभीर प्रकरणाची दखल घ्यावी, संबंधित पाहणी करून त्याचे तात्काळ सिमेंटीकरण किंवा डांबरीकरण करावे आणि रस्ता पूर्ववत वाहतुकीसाठी सुरक्षित करावा. जोपर्यंत रस्ता पूर्णपणे दुरुस्त होत नाही, तोपर्यंत अपघात रोखण्यासाठी घटनास्थळी तातडीने कायदेशीर सुरक्षितता उपाययोजना म्हणून मजबूत बॅरिकेड्स व धोक्याचे फलक लावणे बंधनकारक आहे. प्रशासनाने जर यावर त्वरित आणि कठोर कार्यवाही केली नाही, तर तीव्र कायदेशीर मार्गाने उच्च स्तरावर दाद मागितली जाईल आणि समस्त सर्वसामान्य नागरिकांना, वाहनधारकांना सोबत घेऊन नगरपालिकेच्या विरोधात तीव्र स्वरूपाचे उग्र जनआंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट आणि आक्रमक इशारा संतप्त नागरिकांसह वाहनधारकांकडून देण्यात आला आहे.










