
नेपाळमध्ये महाप्रलय: तिबेटमधील भूकंपाने आणला विनाशाचा महापूर, एक हजाराहून अधिक नागरिक बेपत्ता; कैलास मानसरोवर यात्रेकरूंचाही समावेश!
नेपाळ/विश्वमंथन
नेपाळमधून अत्यंत हादरवून टाकणारी आणि चिंताजनक बातमी समोर येत आहे. नेपाळमध्ये आलेल्या भीषण महाप्रलयाने सर्वत्र विध्वंस केला असून, या नैसर्गिक आपत्तीत एक हजाराहून अधिक लोक बेपत्ता झाले आहेत. यामध्ये शंभराहून अधिक भारतीय नागरिकांचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. तिबेटमध्ये सकाळी ८ वाजून ३७ मिनिटांनी झालेल्या भूकंपाचे रूपांतर या मोठ्या महाप्रलयात झाले आहे. या भूकंपाची तीव्रता ४ रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली असून, त्यानंतर तिथे मोठ्या प्रमाणावर हिमस्खलन झाले. काही तज्ज्ञ अधिकाऱ्यांच्या मते, तिबेटमधील ग्लेशियर लेक (ग्लेशियर तलाव) अचानक फुटल्यामुळे बर्फ आणि खडकांचा प्रचंड ढग थेट नदीत कोसळला आणि त्यामुळे हा भयंकर महापूर आला. या अचानक आलेल्या पुरामुळे तिबेटमधून पाण्याचा एक प्रचंड लोट वेगाने नेपाळच्या दिशेने धडकला, ज्यामुळे नेपाळमध्ये अक्षरशः हाहाकार उडाला आहे.
या भीषण दुर्घटनेची व्याप्ती इतकी मोठी आहे की, तिबेटमधील पाच मजली इमिग्रेशन सेंटर या महाकाय पाण्याच्या प्रवाहात अवघ्या काही सेकंदांत पूर्णपणे नाहीसे झाले. पुराची सुरुवात याच भागातून झाली होती. विशेष म्हणजे, याच इमिग्रेशन सेंटरमधून नागरिक कैलास मानसरोवराच्या पवित्र यात्रेसाठी जातात. मानसरोवर यात्रेसाठी गेलेले तब्बल ४०० नागरिक या पुरात बेपत्ता झाले आहेत. यामध्ये ९३ नेपाळी नागरिक असून उर्वरित बहुतांश नागरिक भारतीय असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. भूकंप झाल्यापासून अवघ्या काही मिनिटांत हे महत्त्वाचे इमिग्रेशन सेंटर पाण्याच्या वेगवान प्रवाहात धुऊन निघाले. या महाप्रलयाचा फटका केवळ नागरिकांनाच बसला नाही, तर नेपाळमधील अनेक गावे, लोकांची राहती घरे, रस्ते, महामार्ग आणि मोठे पूल पाण्याच्या प्रवाहात पालापाचोळ्यासारखे वाहून गेले.
पाण्याचा वेग इतका भयंकर आणि प्रलयकारी होता की, डोंगरावरून खाली येणाऱ्या पाण्याच्या प्रचंड लोंढ्यात अनेक घरं आणि गाड्यांचे अक्षरशः तुकडे झाले. काही वाहनं आणि घरं पाण्याच्या जोरदार प्रवाहात सेकंदभरात दिसेनाशी झाली. एवढेच नाही तर, पाण्याच्या या महाकाय लोंढ्यामुळे नेपाळमधील एक महत्त्वाचा हायड्रोइलेक्ट्रिक प्रोजेक्ट पूर्णपणे वाहून गेला आहे. या प्रकल्पाच्या जवळ काम करणारे काही कर्मचारी आणि तिथे असणाऱ्या मशीन्स व साहित्य देखील या पाण्याच्या प्रवाहात गाडल्या गेल्या. तिबेट आणि नेपाळच्या सीमेवर सुरक्षेसाठी आणि देखरेखीसाठी असणाऱ्या चौक्यांवरचे काही जवान आणि पोलीस कर्मचारी देखील पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरीतून वाहणाऱ्या पाण्याच्या लाटा तब्बल ५० मीटरपेक्षा अधिक उंच उसळत होत्या आणि पाण्यासोबत अत्यंत वजनी आणि प्रचंड मोठे दगडही अक्षरशः फुटबॉलसारखे वाहत आले.
या अचानक आलेल्या संकटापासून जीव वाचवण्यासाठी लोकांकडे पळून जाण्याशिवाय कोणताही पर्याय उरला नव्हता. लोक आपला जीव वाचवण्यासाठी सैरभैर होऊन मिळेल त्या दिशेने पळत सुटले होते. अनेकांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी डोंगराच्या उंच भागांवर किंवा घरांच्या छतांवर आणि सुरक्षित ठिकाणी आसरा घेतला. या पुराच्या पाण्यातून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी भरधाव वेगाने वाहन चालवून पळून जाणाऱ्या एका ट्रक चालकाचा थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे, ज्यावरून या पुराच्या भयानकतेचा अंदाज येतो. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन भारताचे आणि नेपाळचे प्रशासन सक्रिय झाले असून, हवाई दलाच्या हेलिकॉप्टरच्या मदतीने काही स्थानिकांना आणि छतावर अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितपणे रेस्क्यू करण्यात आले आहे. मात्र, या बचाव कार्यामध्येही मोठी अडचण निर्माण झाली आहे, कारण ज्या हेलिपॅडवर हेलिकॉप्टर उतरणार होते, ते हेलिपॅडच पुराच्या पाण्याखाली गेल्यामुळे बचाव कार्यात मोठे अडथळे येत आहेत.
या महाप्रलयामुळे नेपाळमधील संपूर्ण वीज पुरवठा यंत्रणा कोलमडली असून वीज पुरवठ्यावरही याचा अत्यंत विपरीत परिणाम झाला आहे. नेपाळमधील या महापुराचा थेट आणि मोठा धोका आता भारतामधील बिहार राज्याला देखील बसण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. नेपाळमधील भोटे कोशी आणि त्रिशू नदीतील पुराचे पाणी वेगाने वाहून खाली गंडक नदीमध्ये येऊन मिळते. त्यामुळे बिहार सरकारने आधीच सतर्क होऊन हाय अलर्ट जारी केला आहे. नदीकाठच्या परिसरातील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहेत. या संपूर्ण घटनेमुळे नेपाळपासून ते भारताच्या सीमेपर्यंत एकच खळबळ उडाली असून, बेपत्ता झालेल्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत, परंतु निसर्गाच्या या प्रकोपामुळे मदतकार्यात प्रचंड अडचणी येत आहेत. संपूर्ण परिसर शोकमग्न आणि दहशतीच्या वातावरणात वावरत आहे.










