
जीडीपी वाढलाय तर परदेशात फिरायला का जाऊ नका आणि सोने का खरेदी करू नका? राज ठाकरेंचा केंद्र सरकारला थेट सवाल
मुंबई/विश्वमंथन
देशाच्या आर्थिक स्थिती आणि विकासाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यांमधील वक्तवयांचा आणि देशाच्या जीडीपी वाढीच्या दाव्यांचा समाचार घेत राज ठाकरेंनी अत्यंत परखड शब्दांत सरकारला घरचा अहेर दिला आहे.
पंतप्रधान मोदींच्या परदेशातील भाषणांचा संदर्भ देत राज ठाकरे म्हणाले की, पंतप्रधान परदेशात जाऊन भारतीयांना परदेशात जाऊ नका आणि सोने खरेदी करू नका असे आवाहन करतात. एकीकडे भारत सरकारकडून देशाचा जीडीपी दर ७.८ टक्के असून तो अमेरिका आणि चीनपेक्षाही जास्त असल्याचा दावा केला जातो, तर दुसरीकडे नागरिकांना परदेशात जाण्यापासून आणि सोने खरेदी करण्यापासून का रोखले जाते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
या संपूर्ण आर्थिक स्थितीचे विश्लेषण करताना त्यांनी एका साध्या संसारी कुटुंबाचे उदाहरण दिले. एखाद्या घरामध्ये जेव्हा पैशांची चणचण निर्माण होते, तेव्हाच तिथे काटकसर सुरू होते. जर भारताचा जीडीपी ग्रोथ दर अमेरिका आणि चायनापेक्षाही जास्त आहे, तर मग या देशातल्या लोकांनी परदेशात फिरायला का जाऊ नये आणि सोने का खरेदी करू नये, असा सवाल त्यांनी सरकारला विचारला.
देशाची कागदोपत्री आकडेवारी आणि प्रत्यक्षातले वास्तव यात जमीन-अस्मानाचा फरक असल्याचे सांगत राज ठाकरेंनी आपल्या भूमिकेचा शेवट केला. देशाच्या या सर्व परिस्थितीचे मूळ कारण स्पष्ट करताना त्यांनी ठणकावून सांगितले की, या सगळ्यामागे देशाची आर्थिक परिस्थिती प्रत्यक्ष इनवर्ड आणि ग्राउंड लेवल वर ढासळलेली असणे हेच एकमेव कारण आहे.









