
‘साप बी मरायला पाहिजे आणि लाठीसुद्धा तुटायला नको!’ – मराठ्यांच्या अचूक ‘गनिमी काव्यापुढे’ सरकार आणि पोलीस हतबल; मराठ्यांना नेमके रोखणार तरी कसे?
विशेष प्रतिनिधी/विश्वमंथन
मराठा समाजाच्या हक्काच्या आणि प्रलंबित मागण्यांसाठी मुंबईमधील ऐतिहासिक आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसण्याच्या तयारीत असलेले मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांच्या संघर्षात आता एक अत्यंत नाट्यमय आणि धोरणात्मक वळण आलेले आहे. मुंबई पोलिसांनी या आंदोलनाला अत्यंत कठोर भूमिका घेत सलग दुसरींदा परवानगी नाकारली असली, तरी मराठा समाजाने या दडपशाहीवर मात करण्यासाठी असा अचूक आणि भेदक डावपेच आखला आहे, ज्याने सरकार आणि प्रशासनाच्या पायाखालची जमीन सरकवली आहे. ‘साप सुद्धा मरायला पाहिजे आणि लाठीसुद्धा तुटायला नको’ याच अस्सल मराठी मुत्सद्देगिरीच्या आणि मराठ्यांच्या ऐतिहासिक ‘गनिमी काव्याच्या’ धर्तीवर आंदोलकांनी प्रशासनाला आणि सरकारला अक्षरशः जेरीस आणले आहे!
गेल्या १८ दिवसांपासून अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण अत्यंत खडतर परिस्थितीत सुरू आहे. प्रशासनाने आणि पोलिसांनी आंदोलनाची धार संपवण्यासाठी मुंबईत येण्यास मज्जाव केला आणि परवानगीचा मार्ग पूर्णपणे बंद केला. मात्र, जरांगे पाटलांनी आपली रणनीती बदलत आज सकाळी बरोबर ११ वाजता केवळ १० मोजक्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन मुंबईच्या दिशेने प्रवास सुरू करण्याची घोषणा केली आहे. या छोट्याशा ताफ्यात दोन रुग्णवाहिका आणि दोन वैयक्तिक गाड्यांचा समावेश असणार आहे. पोलिसांच्या परवानगीच्या कायदेशीर फेऱ्यात थेट न अडकता, अत्यंत शांतपणे आणि धोरणात्मकरीत्या वाटचाल करत ‘साप मरावा पण लाठीलाही धक्का लागू नये’ या युक्तीप्रमाणे प्रशासनाच्या हाताला कसलीही संधी न देता मराठ्यांनी हा प्रवास प्रत्यक्षात घडवून आणण्याचे ठरवले आहे. आज त्यांचा मुक्काम बीडमधील पाटोदा येथे असणार असून, अत्यंत शिस्तीत पण आक्रमक निर्धाराने हा लढा पुढे नेला जात आहे.
सरकार आणि पोलीस यंत्रणेसमोर मोठे कोडे: मराठ्यांना नेमके रोखणार कसे?
पोलिसांनी आझाद मैदानावर उपोषणाची परवानगी नाकारली असली, तरी मराठा समाजाने आखलेल्या या गनिमी काव्यामुळे सरकार आणि पोलीस यंत्रणा कमालीची संकटात सापडली आहे. प्रशासनासमोर आता सर्वात मोठा प्रश्न उभा राहिला आहे तो म्हणजे, “या आंदोलकांना नेमके रोखायचे कसे?”
१. जर पोलिसांनी जरांगे पाटलांच्या या मोजक्या चार वाहनांच्या काफिल्ल्याला रस्त्यात अडवले, तर संपूर्ण राज्यभर तीव्र संताप उसळेल आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न अधिक बिकट होईल.
२. जर त्यांना रोखले नाही, तर ते कायद्याच्या चौकटीत राहून मुंबईत दाखल होतील.
३. सर्वात मोठी अडचण ही आहे की, जरांगे पाटलांनी जरी मोजक्या लोकांना सोबत नेण्याचे सांगितले असले, तरी राज्यभरातून लाखो तरुण आधीच ‘गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी’ आणि ‘लालबागच्या राजाचे आशीर्वाद घेण्यासाठी’ स्वतःच्या वाहनांनी मुंबईच्या दिशेने निघण्याच्या तयारीत आहेत.
तरुणांनी अत्यंत स्पष्ट शब्दांत बजावले आहे कि, “आम्ही मुंबईत गणपती फिरण्याच्या बहाण्याने दाखल होणार आहोत. मुंबई काही कोणाच्या बापाची नाही, ती आमचीही आहे!” पोलिसांच्या नियमांचा थेट भंग न करता, गणपती दर्शनानिमित्त मुंबईत दाखल होऊन दादांचा एक आदेश मिळताच अवघ्या पाच ते दहा मिनिटांत आझाद मैदानावर धडक मारणे, हाच तो मराठ्यांचा अचूक गनिमी कावा आहे.
पावसाच्या धारा कोसळत असतानाही मराठा आंदोलकांचा उत्साह आणि रोष तिपटीने वाढला आहे. “गेल्या १८ दिवसांपासून मनोज दादा उपोषण करत आहेत, त्यांच्या प्रकृतीची साधी विचारपूस करण्याचे सौजन्य सरकार दाखवत नाही. मात्र, मोजक्या उद्योजकांचे हजारो कोटींचे कर्ज एका सेकंदात माफ केले जाते, मग कोट्यवधी मराठा समाजावर हा अन्याय का?” असा संतप्त सवाल विचारत तरुणांनी सरकारवर तोफ डागली आहे.
पोलिसांनी कितीही रोखण्याचा प्रयत्न केला आणि परवानगीची दारे बंद केली, तरी मराठा समाज आता पूर्णपणे ‘अलर्ट मोड’ वर आहे. प्रत्येकाकडे स्वतःची वाहने आहेत. कोणाला चार तास लागतील तर कोणाला आठ तास, पण पाटलांचा एक आदेश मिळताच गनिमी काव्याची ही रणनीती प्रत्यक्षात उतरणार आणि राज्यभरातून मराठा बांधव क्षणात मुंबईच्या दिशेने झेपावतील यात कोणतीही शंका नाही. ‘साप मारायचा आणि लाठी सुद्धा तुटू द्यायची नाही’ या मराठ्यांच्या मुत्सद्देगिरीपुढे आता पोलीस आणि प्रशासनाची सर्व सूत्रे हलू लागली असून, आज सकाळी ११ वाजता सुरू होणाऱ्या ऐतिहासिक प्रवासाला सरकार कसे रोखणार आणि यावर प्रशासन काय भूमिका घेणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे!









