
बुलढाणा जिल्ह्यात शिरसोडी येथे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांचा एल्गार; भवानी मंदिराजवळील पुलासाठी आमरण उपोषण सुरू!
बुलढाणा (प्रतिनिधी)/विश्वमंथन
विकासाच्या मोठमोठ्या बाता मारणाऱ्या आणि जनतेच्या हिताचे दावे करणाऱ्या शासन-प्रशासनाचा खरा चेहरा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शिरसोडी येथे ग्रामस्थांनी मूलभूत आणि अत्यंत महत्त्वाच्या अशा पुलाच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेत बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. आज शिरसोडी येथे सर्व ग्रामस्थांच्या वतीने भवानी मंदिराजवळील नाल्यावर पूल व्हावा, ही अशी सर्व ग्रामस्थांची तीव्र इच्छा असून त्यासाठी त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे. गेल्या अनेक दशकांपासून शिरसोडी गावातील नागरिक या नाल्यातून ये-जा करतात, परंतु पावसाळ्यात आणि अडीअडचणीतून जीव मुठीत धरून वाट काढत असतानाही शासनाचे या नाल्यावरील पुलाकडे संपूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे.
गावातील नागरिकांचे हे हाल कुणा एका दिवसाचे नसून गेली अनेक दशकं हे सुरू आहे. पावसाळ्यात किंवा इतर वेळी या नाल्याला पूर आल्यानंतर नागरिकांचे अतोनात हाल होतात. लहान मुलांच्या शाळा, वृद्धांचे आजारपण, रुग्णांना उपचारासाठी नेणे आणि शेतमालाची ने-आण करणे या सर्व गोष्टी अत्यंत धोकादायक ठरतात. या गंभीर समस्येबाबत गावकऱ्यांनी आतापर्यंत सर्वतोपरी प्रयत्न करून पाहिले. वारंवार आमदार साहेब असो, खासदार साहेब असो यांच्याकडे ग्रामस्थांनी प्रत्यक्ष जाऊन पुलाची मागणी केली. गावामध्ये सरपंच असो, ग्रामपंचायत सदस्य असो किंवा इतर कोणतेही गावातील नागरिक असो, जेव्हा जेव्हा गावात निवडणुك किंवा प्रचारासाठी मोठे पुढारी आले, तेव्हा तेव्हा त्यांना गावकऱ्यांनी हात जोडून विनवण्या केल्या की, आमच्या या नाल्यावर लवकरात लवकर पूल करून घ्या आणि आमची ही नरकयातनेतून सुटका करा. परंतु, दुर्दैवाचा भाग म्हणजे आजतागायत एकाही आमदार असो किंवा खासदार असो, कुणीही आमची ही अत्यंत जिव्हाळ्याची आणि न्याय्य मागणी पूर्ण केली नाही. जनतेच्या मतांवर राजकारण करणाऱ्या एकाही जनप्रमुखाने या समस्येकडे ढुंकूनही पाहिले नाही, असा तीव्र संताप ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
नेत्यांच्या आणि प्रशासनाच्या या सततच्या दुर्लक्षामुळे आणि पोकळ आश्वासनांमुळे आता ग्रामस्थांचा संयम पूर्णपणे सुटला आहे. लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या बहिरेपणाविरोधात आता गावकऱ्यांनी एल्गार पुकारला असून, न्याय मिळवण्यासाठी आम्हाला आमरण अन्नत्याग उपोषणाचं हत्यार उपसावं लागलं आहे, अशी स्पष्ट भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे. हे आमरण उपोषण अत्यंत शांततापूर्ण आणि लोकतांत्रिक मार्गाने सुरू करण्यात आले असले, तरी त्याचा रोख अत्यंत आक्रमक आहे. हे उपोषण सुरू करण्यापूर्वी प्रशासनाच्या संबंधित सर्व विभागांना याबद्दलची पूर्वकल्पना अधिकृतपणे देण्यात आली आहे. शासनाने या उपोषणाची अत्यंत गंभीर दखल घ्यावी आणि तात्काळ आमच्या पुलाच्या मागण्या मान्य कराव्यात, अशी ठाम मागणी केली जात आहे.
या लढ्यात गावकऱ्यांनी आता एकजूट दाखवली असून, जोपर्यंत या पुलाला प्रत्यक्ष निधी मंजूर होत नाही आणि कामाला सुरुवात होत नाही, तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीत उपोषण मागे घेतले जाणार नाही, असा अत्यंत ठाम निर्णय सर्व ग्रामस्थांनी एकमुखाने घेतला आहे. आता प्रशासन यावर काय ठोस भूमिका घेते आणि लोकप्रतिनिधी याकडे कितपत गांभीर्याने पाहतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.










