तामिळनाडू /विशेष प्रतिनिधी
तमिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे. अभिनेता विजय यांच्या ‘तमिळगा वेत्री कळघम’ (टीव्हीके) पक्षाने पहिल्याच निवडणुकीत १०८ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला आहे. मात्र, बहुमतासाठी आवश्यक असलेला ११८ हा जादूई आकडा गाठण्यासाठी त्यांना अद्याप १० जागांची गरज आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात सत्तास्थापनेसाठी वेगवान हालचाली सुरू झाल्या असून विजय यांच्यासमोर नेमके कोणते पर्याय आहेत, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
​तमिळनाडूच्या राजकीय इतिहासात १९६७ पासून डीएमके आणि एआयएडीएमके या दोनच पक्षांचे वर्चस्व राहिले आहे. मात्र, यावेळी विजय यांच्या रूपाने तिसरा पर्याय समोर आला आहे. सत्तेच्या शर्यतीत टीव्हीके समोर पहिला पर्याय ‘एआयएडीएमके’चा आहे. जर या दोन पक्षांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला, तर त्यांच्याकडे १५५ पेक्षा जास्त जागांचे संख्याबळ होऊ शकते. प्रचारादरम्यान विजय यांनी एआयएडीएमकेवर फारशी टीका न केल्यामुळे ही युती नैसर्गिक ठरू शकते.
​दुसरा महत्त्वाचा पर्याय म्हणजे डीएमकेच्या आघाडीत असलेल्या मित्रपक्षांना आपल्याकडे वळवणे. काँग्रेसकडे ५, सीपीआयकडे २ आणि आयूएमएलकडे २ जागा आहेत. जर या पक्षांनी टीव्हीकेला पाठिंबा दिला आणि पीएमकेसारख्या पक्षांचे पाठबळ मिळाले, तर विजय सहज मुख्यमंत्री होऊ शकतात. विशेष म्हणजे, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि विजय यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध पाहता, सत्तेसाठी नवीन आघाडी उदयास येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
​निवडणुकीच्या रिंगणात विजय यांनी मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन आणि डीएमके सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली होती. त्यामुळे डीएमके आणि टीव्हीके हे दोन टोकाचे शत्रू एकत्र येण्याची शक्यता धुसर आहे. भाजपला या निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नसले तरी, लहान पक्षांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.
​सध्या तमिळनाडूत निर्माण झालेली परिस्थिती महाराष्ट्रातील २०१९ च्या सत्तासंघर्षाची आठवण करून देणारी आहे. ज्याप्रमाणे महाराष्ट्रात अनपेक्षित आघाड्या झाल्या होत्या, तसाच काहीसा प्रकार तमिळनाडूतही घडू शकतो. फोडाफोडीचे राजकारण टाळून विजय आपला पहिलाच गड कसा राखतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. राज्यपाल आता सर्वात मोठा पक्ष म्हणून टीव्हीकेला निमंत्रण देतात की इतर आघाड्यांच्या हालचाली यशस्वी होतात, यावर तमिळनाडूचे पुढील राजकारण अवलंबून आहे.

Share