
मनोज जरांगे पाटलांचे मुंबईत धडकणार आंदोलन; १५ सप्टेंबरला अंतरवालीतून निघणार पायी मोर्चा!
विशेष प्रतिनिधी/विश्वमंथन
अंतरवाली सराटी येथून मराठा आरक्षण आणि अन्य मागण्यांसाठी सुरू असलेला लढा आता थेट मुंबईच्या दिशेने कूच करणार आहे. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आगामी १५ सप्टेंबर रोजी अंतरवाली येथून आपला मोर्चा सुरू करण्याची अधिकृत घोषणा केली आहे. हा पायी मोर्चा पाटोदा, श्रीगोंदा, हडपसर, खोपोली आणि रायगड अशा विविध मार्गातून मार्गक्रमण करत थेट महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत पोहोचणार आहे. मुंबईतील आझाद मैदानावर येत्या १९ सप्टेंबरपासून आमरण उपोषण करण्यात येणार असल्याची मोठी घोषणा जरांगे पाटील यांनी केली आहे. या संपूर्ण आंदोलनादरम्यान राज्यभरातून लाखो मराठा बांधव एकत्र येणार असून, शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ही आतापर्यंतची सर्वात मोठी हाक मानली जात आहे.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी पोलीस प्रशासन आणि गृह मंत्रालयाला अत्यंत महत्त्वाची आणि स्पष्ट विनंती केली आहे. आंदोलनाच्या मार्गात किंवा मुंबईत प्रवेश करताना कुठेही पोलिसांचे बॅरिकेट्स किंवा अडथळे उभे करू नयेत, असे आवाहन त्यांनी केले आहे. हे आंदोलन पूर्णपणे शिस्तबद्ध आणि शांततापूर्ण मार्गाने पार पडणार असून, प्रशासनाने यामध्ये कोणताही हस्तक्षेप न करता लोकशाही मार्गाने आंदोलन होऊ द्यावे, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे. प्रशासनाने या आंदोलनाला सहकार्य करून कोणत्याही प्रकारची कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी, असेही त्यांनी सुचवले आहे.
गेल्या अनेक महिन्यापासून मराठा आरक्षणाचा प्रश्न राज्यभर ऐरणीवर आला आहे. सगेसोयरे आणि आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी सरकारकडून वारंवार आश्वासने दिली गेली, परंतु प्रत्यक्षात ठोस कारवाई झाली नसल्याचा संताप मराठा समाजात स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. याच रोषातून आता हा अंतिम टप्प्यातील लढा पुकारण्यात आला आहे. अंतरवाली सराटी ते मुंबई हा प्रवास आणि त्यानंतर मुंबईतील आझाद मैदानावर होणारे आमरण उपोषण हा राज्य शासनापुढील सर्वात मोठा पेच ठरणार आहे. या मोर्चात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून तरुण, महिला, वृद्ध आणि गोरगरीब मराठा बांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. गावोगावकडून या मोर्चाचे जोरदार स्वागत करण्याची तयारी सुरू झाली असून, या आंदोलनाचे पडसाद संपूर्ण राज्यभरात उमटण्यास सुरुवात झाली आहे.
आंदोलनाची व्याप्ती पाहता प्रशासकीय यंत्रणाही खडबडून जागी झाली आहे. मोर्चा ज्या-ज्या मार्गावरून जाणार आहे, तिथे चोख बंदोबस्त ठेवण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र, जरांगे पाटील यांनी स्पष्ट शब्दांत बजावले आहे की, आंदोलकांनी अत्यंत शांतता बाळगावी आणि कोणीही कायद्याचे उल्लंघन करू नये. हा लढा आपल्या हक्कासाठी आणि भावी पिढीच्या भविष्यासाठी असून, तो पूर्णपणे शिस्तीत पार पडला पाहिजे, असा संदेश त्यांनी वारંवार दिला आहे. मराठा समाजाला हक्क मिळेपर्यंत हा संघर्ष थांबणार नाही, असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला असून, मुंबईच्या दिशेने निघणारा हा महामोर्चा आता राजकीय वर्तुळात आणि प्रशासकीय वर्तुळात प्रचंड चर्चेचा विषय ठरत आहे. १५ सप्टेंबरपासून सुरू होणारा हा प्रवास आणि १९ सप्टेंबरला आझाद मैदानावर होणारे आमरण उपोषण यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आता मुंबईकडे लागले आहे.










