
मनोज जरांगे पाटलांचा छगन भुजबळांवर गंभीर आरोप; दुटप्पी वागणूक सोडण्याचे थेट आव्हान!
विशेष प्रतिनिधी/विश्वमंथन
राज्यभरात आरक्षणाचा मुद्दा तापलेला असतानाच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यावर अत्यंत आक्रमक शब्दांत हल्लाबोल केला आहे. छगन भुजबळ यांचे वर्तन पूर्णपणे दुटप्पी असून ते सोयीनुसार आपली भूमिका बदलत असतात, असा घणाघात जरांगे पाटलांनी केला आहे. ओबीसींच्या नावाखाली सुरू असलेले राजकारण आता थांबले पाहिजे, असे स्पष्ट शब्दांत त्यांनी सुनावले.
छगन भुजबळांच्या भूमिकेवर ताशेरे ओढताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, भुजबळ कधी महाविकास आघाडीचे, कधी महायुतीचे तर कधी स्वतःला ओबीसींचे तारणहार म्हणून मिरवतात. त्यांचा नेमका उद्देश काय आणि त्यांची नेमकी भूमिका काय, हे कोणालाही समजत नाही. ६० टक्के ओबीसी कसे आहेत आणि नेमकी परिस्थिती काय, यावर ते केवळ संभ्रम निर्माण करत असल्याचा सवाल जरांगे यांनी उपस्थित केला.
पुढे बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, जर भुजबळांमध्ये खरी हिम्मत असेल, तर त्यांनी वरवरच्या गोष्टी करण्याऐवजी धनगरांना सरळ एसटी प्रवर्गातून आरक्षण दिले पाहिजे. एकदा जाहीरपणे सांगावे की धनगरांना आरक्षणाच्या यादीतून आरक्षण मिळालेच पाहिजे. मात्र, तसे स्पष्ट बोलण्याचे धाडस त्यांच्यात नाही, ते केवळ मोर्चाच्या नावाखाली बनवाबनवी करत आहेत. स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी आणि आपल्या जवळच्या किंवा पुतण्या-पतण्यांना पदे व खासदारकी मिळवून देण्यासाठी ते लोकांना पुढे करून पळ काढतात, अशी टीका त्यांनी केली.
आक्रमक होत जरांगे पाटील म्हणाले की, ही अत्यंत नीच प्रवृत्ती आहे. सारथी संस्था असो, विद्यार्थ्यांचे हॉस्टेल असो किंवा इतर गोष्टी असोत, यावर बोलताना दुसऱ्यांच्या आणि मराठ्यांच्या लेकरांच्या हक्कावर गदा आणण्याचे काम सुरू असते. ओबीसींच्या नावाखाली सर्व महामंडळे आणि इतर गोष्टी खाऊन टाकल्या आहेत, तरीही त्यांचे समाधान होत नाही. महाराष्ट्र सदन प्रकरणापासून ते आजपर्यंतच्या सर्व कारभारावर बोट ठेवत, आता या वयात तरी सोयीस्कर आणि शांतपणे कसे जगता येईल ते पाहावे, असा टोमणा त्यांनी मारला.
या सर्व प्रकारामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली असून, आरक्षणाच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपांची मालिका आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.









