
मनोज जरांगे यांच्या प्रकृतीमुळे मराठा आंदोलक आक्रमक; धुळे-सोलापूर महामार्गावर जोरदार रास्ता रोको, मंत्र्यांनी चर्चेसाठी यावे हीच मागणी!
अंतरवाली सराटी/वडगोदरी/विश्वमंथन
राज्यभरात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला असून, मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांची प्रकृती खालावल्यामुळे संतप्त झालेल्या मराठा आंदोलकांनी थेट धुळे-सोलापूर महामार्ग रोखून धरला आहे. गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणादरम्यान जरांगे यांची प्रकृती चिंताजनक बनल्याने आंदोलक प्रचंड आक्रमक झाले आहेत. जोपर्यंत शासनाचे प्रतिनिधी किंवा मंत्री प्रत्यक्ष येऊन भेटत नाहीत आणि मागण्यांवर तोडगा काढत नाहीत, तोपर्यंत येथून मागे हटणार नाही, अशी ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.
या आंदोलनाचे गांभीर्य लक्षात घेता घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. वडगोदरी येथील धुळे-सोलापूर महामार्गावर आंदोलकांनी अचानक तासाभरापासून रास्ता रोको आंदोलन सुरू केले. अंतरवाली सराटीपासून अवघ्या अर्धा ते एक किलोमीटर अंतरावर असलेल्या या मार्गावर सर्वत्र भगवे झेंडे आणि जोरदार घोषणाबाजी पाहायला मिळत आहे. आंदोलकांच्या आक्रमक पवित्र्यामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून, लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. रस्त्यावरच लाकडे टाकून आणि थेट पंगती भरवून आंदोलकांनी प्रशासनाला सळो की पळो करून सोडले आहे.
परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलीस प्रशासनाकडून आंदोलकांना सतत शांतता राखण्याचे आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी रस्ता मोकळा करण्याचे आवाहन केले जात आहे. परंतु, आंदोलक कोणतीही नरमाईची भूमिका घेण्यास तयार नाहीत. काल प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांच्या पातळीवर शिष्टमंडळ आले होते, मात्र केवळ अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ नको तर मंत्री महोदयांनी स्वतः येऊन जरांगे यांची भेट घ्यावी आणि ठोस चर्चा करावी, अशी मागणी आंदोलकांनी लावून धरली आहे.
आंदोलनादरम्यान संतप्त झालेल्या एका आंदोलकाने थेट शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, गेल्या तीन-चार वर्षांपासून मंत्री, आमदार आणि खासदार येतात आणि आश्वासने देऊन जातात, पण प्रत्यक्षात हातात काहीच पडत नाही. आज आमच्या नेत्याचा जीव धोक्यात असताना शासन काय करत आहे? असा सवाल करत जोपर्यंत उच्चस्तरीय शिष्टमंडळ अंतरवाली सराटीमध्ये येऊन सर्व मागण्या मान्य करत नाही, ततोपर्यंत लाठीचार्ज झाला किंवा अटक झाली तरी चालेल, आम्ही इथून तिळमात्र हलणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे.
वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अंतरवाली सराटीचे सरपंच घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आंदोलकांना शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचे आवाहन केले. पोलिसांच्या पुढाकाराने आणि सरपंचांच्या मध्यस्थीने आंदोलकांना समजवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र आंदोलकांचा रोष पाहता जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत हा तणाव कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मनोज जरांगे यांच्या प्रकृतीची खालावत चाललेली स्थिती आणि आंदोलकांची जिद्द यामुळे प्रशासनाची मोठी कसोटी लागत असून, आता सरकार यावर नेमकी काय भूमिका घेणार आणि कोणता तोडगा काढणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.










