
बनावट शालार्थ आयडी घोटाळा: भाजप नेते संजय गरुड सोलापूरमधून अटकेत; एसआयटीची धडक कारवाई!
विशेष प्रतिनिधी/विश्वमंथन
राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या बनावट शालार्थ आयडी आणि मान्यता घोटाळ्याप्रकरणी एसआयटीने मोठी आणि धडक कारवाई केली आहे. जळगाव जिल्ह्यातील शिक्षण संस्थाचालक आणि भाजपचे पदाधिकारी असलेले संजय गरुड यांना सोलापूरमधून पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले आहे. हा संपूर्ण घोटाळा तब्बल १६० कोटी रुपयांहून अधिक रकमेचा असल्याचा संशय असून, या अटकेमुळे शिक्षण वर्तुळात आणि राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. एसआयटीचे पथक आता आरोपी संजय गरुड यांना नाशिक येथे आणून न्यायालयात हजर करणार असून, दुपारच्या सत्रात त्यांना कोर्टात उभे केले जाईल.
हा संपूर्ण प्रकार अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने कागदपत्रांमध्ये फेरफार करून चालवला जात होता. बनावट शालार्थ आयडी आणि खोटे मान्यता आदेश तयार करून शासनाची मोठी फसवणूक करण्यात आली आहे. नियमांना बगल देऊन शेकडो शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बेकायदेशीरपणे सेवेत सामावून घेण्यात आले आणि त्यांना शासनाकडून आर्थिक लाभ मिळवून देण्यात आला, असा गंभीर आरोप संजय गरुड यांच्यावर ठेवण्यात आला आहे. जळगाव जिल्हा परिषदेचे तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगणीकर यांनी चौकशीदरम्यान दिलेली महत्त्वाची माहिती आणि पुराव्यांच्या आधारेच एसआयटीने गरुड यांच्या आवतीभोवतीचा जास्तीचा पाश आवळला आणि अखेर त्यांना बेड्या ठोकल्या.
या घोटाळ्याची पाळेमुळे बरीच खोलवर रुजलेली असून, मागील काही काळापासून या प्रकरणाचा तपास अत्यंत वेगाने सुरू आहे. याआधी पोलिसांनी या प्रकरणात तपासाची चक्रे फिरवत एकामागून एक अनेक बड्या मोहरक्यांना बेड्या ठोकल्या आहेत. शिक्षण विभागाचे तत्कालीन उपसंचालक भाऊसाहेब चव्हाण यांच्यावरही या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांनी यापूर्वीच अटकपूर्व जामीन मिळवला आहे. तसेच, या प्रकरणातील आणखी एक संशयित नितीन उपासनी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. याशिवाय, धुळे येथून प्रशांत वाडीले याला देखील पोलिसांनी यापूर्वीच अटक केली असून तो देखील सध्या नाशिक पोलिसांच्या रडारवर आहे आणि त्याची कसून चौकशी सुरू आहे. जळगावचे तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगणीकर यांनाही या प्रकरणात आधीच अटक करण्यात आली असून, त्यांची कसून चौकशी केल्यानंतर तपासाचे धागेदोरे थेट संजय गरुड यांच्यापर्यंत येऊन पोहोचले आणि एसआयटीने त्यांच्या मुसक्या आवळल्या.
प्राथमिक माहितीनुसार, हा भ्रष्टाचार कोणताही लहानसहान नसून तब्बल १६० कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचा आहे. शासनाच्या तिजोरीला आणि सर्वसामान्य जनतेच्या पैशांना चुना लावणाऱ्या या गैरव्यवहारामागील खरी सूत्रधारांची पाळेमुळे खणून काढण्यासाठी नाशिकची आर्थिक गुन्हे शाखा आणि विशेष तपास पथक (SIT) अहोरात्र काम करत आहेत. आता संजय गरुड पोलिसांच्या जाळ्यात अडकल्यामुळे या प्रकरणात आणखी कोणकोणत्या बड्या नेत्यांची, अधिकाऱ्यांची आणि संस्थाचालकांची नावे समोर येतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिली आहे. या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रातील खळबळजनक बोगसगिरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, तपासाच्या पुढच्या फेरीत आणखी कोणते मोठे मासे गळाला लागतात, हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.









