बुलढाणा विशेष प्रतिनिधी/
बुलढाणा जिल्ह्याच्या जळगाव जामोद तालुक्यातून समोर आलेल्या एका धक्कादायक घटनेने केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर संपूर्ण देश हादरून गेला आहे. ज्या मुलीच्या मृत्यूचा खोटा दावा करून, सख्या जन्मदात्या वडिलांना आणि भावाला तब्बल १९ दिवस पोलिसांच्या छळाला आणि तुरुंगवासाला सामोरे जावे लागले, जेव्हा ती मुलगी जिवंत होऊन पोलीस ठाण्याच्या दारात उभी राहिली आणि कायद्याच्या रक्षकांचा बुरखा फाडून निघाला. ही घटना ताजी असतानाच आता ३६ वर्षांपूर्वीच्या एका अत्यंत संशयास्पद आणि गूढ प्रकरणाने पुन्हा डोके वर काढले आहे. ११ नोव्हेंबर १९९० रोजी ‘विश्वमंथन’ने प्रसिद्ध केलेली एक बातमी पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. तेव्हाही आजच्यासारखीच परिस्थिती होती. सीता पवार नावाच्या महिलेचा मृतदेह सापडला, पोलिसांनी दबावापोटी घरच्यांकडून तो मृतदेह सीता पवार यांचाच असल्याचा कबुलीजबाब घेतला. पण नियतीचा खेळ बघा, जळगाव जामोदच्या शिवानी कळमेकरसारखीच सीता पवार सुद्धा नंतर जिवंत सापडली. आजही बुलढाण्यातील लोक एकच प्रश्न विचारत आहेत, ३६ वर्षांपूर्वी जर सीता पवार जिवंत सापडल्या होत्या आणि तो मृतदेह कोणाचा होता याचा उलगडा झाला नव्हता, तर आज सापडलेल्या त्या अनोळखी मृतदेहाचे रहस्य प्रशासन उलगडणार की हे प्रकरणही पुन्हा कागदावरच दडपले जाणार?
बुलढाणा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा हा काही पहिलाच प्रसंग नाही. २६ एप्रिल रोजी सुनगाव शिवारात एक अर्धवट जळालेला आणि शीर नसलेला मृतदेह सापडला. या मृतदेहाची ओळख पटवण्याचे कष्ट न घेता, पोलिसांनी केवळ एका संशयावरून तिचे आणि तिच्या चुलत भावाचे प्रेम संबंध होते काही तपास न करता पोलिसांनी हा संशय घेऊन यांनी खून केला असे सिद्ध करून टाकले. आणि हे प्रकरण शिवानी कळमेकर हिच्या हत्येशी जोडले. त्यानंतर तिच्या निष्पाप कुटुंबाचा छळ सुरू झाला. हा तोच जुना पॅटर्न आहे, जो १९९० मध्ये सीता पवार प्रकरणात वापरला गेला होता. त्यावेळी पोलिसांनी स्वतः फोटो काढून आणि पुराव्यांशी छेडछाड करून तो मृतदेह सीता पवार यांचाच असल्याचे जगाला सांगितले होते. मात्र, सत्य काही वेगळेच होते. त्या मृतदेहाचा आणि सीता पवार यांचा काहीही संबंध नव्हता. लोकांमध्ये तेव्हाही अशीच चर्चा होती की, आपल्या तपासातील अपयश लपवण्यासाठी आणि हे प्रकरण ‘सॉल्व्ह’ केल्याचे दाखवण्यासाठी पोलिसांनी त्या गरीब कुटुंबावर दबाव आणून त्यांना बळीचा बकरा बनवले होते. ३६ वर्षे उलटली तरी त्या मृतदेहाची ओळख पटली नाही आणि तो गुन्हा आजही एक अनुत्तरित कोडं बनून राहिला आहे.
केवळ जळगाव जामोद किंवा १९९० चे प्रकरणच नव्हे, तर जिल्ह्यातील अंढेरा आणि किणगाव राजा पोलीस स्टेशनच्या हद्दीतही अशाच प्रकारे तरुणींना जाळून टाकण्याच्या धक्कादायक घटना घडल्या होत्या. त्या दुर्दैवी मुली नेमक्या कोण होत्या, त्यांचा मारेकरी कोण होता, याचा शोध आजही लागलेला नाही. यावरून हेच स्पष्ट होते की, तपासातील कुचराई आणि निष्पाप लोकांना गोवण्याची ही पद्धत जिल्ह्यासाठी नवीन नाही.
आज जळगाव जामोदमध्ये जे घडले आहे, ते पाहून १९९० च्या त्या कटू आठवणी ताज्या झाल्या आहेत. पोलिसांची कार्यपद्धती आणि निष्पापांना बळी देण्याचा त्यांचा अट्टाहास यात तीळमात्र बदल झालेला नाही, हेच यातून अधोरेखित होते. बापूराम कळमेकर आणि त्यांचा मुलगा अजय यांना अशा प्रकारे खोट्या गुन्ह्यात अडकवून त्यांना तुरुंगात डांबण्यात आले. त्यांच्यावर ओढवलेल्या या भीषण संकटाने त्यांचे हसत-खेळत कुटुंब उद्ध्वस्त झाले. २८ मे रोजी पोलीस ठाण्यात एकच खळबळ उडाली जेव्हा मृत घोषित केलेली शिवानी स्वतः जिवंत उभी राहिली. तिने स्पष्ट केले की, तिच्या वडिलांनी आणि भावाने तिची हत्या केलेली नाही, मी जिवंत आहे, माझ्या घरच्यांना सोडून द्या. या घटनेने पोलिसांच्या तपासाची लक्तरे पुन्हा एकदा वेशीवर टांगली आहेत. जुन्या काळात तंत्रज्ञान नव्हते म्हणून पोलिसांनी जे केले, ते आजही डिजिटल युगात सुरूच आहे, हे पाहून सामान्य नागरिक थक्क झाले आहेत. बापूराम आणि अजय यांनी मांडलेली व्यथा हृदय पिळवटून टाकणारी आहे. ९ मे रोजी पोलीस घरी आले आणि ‘तुमची मुलगी बेपत्ता आहे का?’ असे विचारून आम्हाला पोलीस ठाण्यात नेले. तिथे पोलिसांनी त्यांना मृतदेह दाखवून तोच शिवानीचा असल्याचे मान्य करायला भाग पाडले. जेव्हा त्यांनी हत्येची कबुली देण्यास नकार दिला, तेव्हा त्यांना निर्जन जंगलात नेऊन अमानवीय मारहाण करण्यात आली आणि पूर्ण कुटुंब संपवण्याची धमकी दिली गेली. या धाकाने, घाबरलेल्या वडिलांनी हत्येची खोटी कबुली दिली. १९९० मध्ये सीता पवार प्रकरणातील घरच्यांवरही असाच दबाव आणला होता का, हा प्रश्न आता विचारला जात आहे.
या प्रकरणात आतापर्यंत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर आणि जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे नितीन पाटील यांच्यासह सहा पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन झाले आहे. कारवाई जरी झाली असली, तरी तो अर्धवट जळालेला मृतदेह नक्की कोणाचा होता, हा प्रश्न आजही अधांतरीच आहे. १९९० सालच्या त्या प्रकरणाप्रमाणेच आताचे हे प्रकरणही तपासाअभावी धूळ खात पडणार का, अशी भीती निर्माण झाली आहे. सीता पवार बुलढाण्यावरून अवघ्या १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या साखळी गावात जिवंत सापडल्या होत्या. त्या जिवंत सापडल्यामुळे तो मृतदेह कोणाचा होता, याचा तपास कधीच लागला नाही. आज जळगाव जामोदच्या घटनेतही तोच प्रश्न उपस्थित होत आहे. मृतदेहाची ओळख पटवण्याऐवजी केवळ स्वतःचे रेकॉर्ड चांगले दाखवण्यासाठी पोलीस वारंवार बळीचा बकरा का शोधतात? लोकांच्या मनात आता तीव्र संशय निर्माण झाला आहे की, हे प्रकरण एखाद्या मोठ्या व्यक्तीला वाचवण्यासाठी पोलिसांकडूनच जाणीवपूर्वक दाबले जात आहे का? कारण, जेव्हा जेव्हा असे भीषण प्रकरण घडते, तेव्हा पोलीस अत्यंत घाईघाईने एका निष्पाप कुटुंबाला आरोपी ठरवून केस बंद करण्याचा प्रयत्न करतात. जर पोलिसांचे हे धोरण असेच राहिले, तर खऱ्या गुन्हेगारांना कोणी पकडणार? आणि ज्या महिलेची ती क्रूर हत्या झाली, त्या मृत महिलेला न्याय कधी मिळणार?
राज्य पोलीस महासंचालक या प्रकरणाकडे लक्ष ठेवून आहेत, पण प्रश्न असा आहे की, हा तपास फक्त कागदावर होणार की खरोखर त्या मृतदेहाची ओळख पटवून खऱ्या मारेकऱ्यांना शोधणार? १९९० च्या त्या काळातील चुका आणि आजची डिजिटल युगातील परिस्थिती यात काहीच फरक पडलेला नाही. पोलीस प्रशासनाच्या विश्वासार्हतेवर जो ओरखडा ३६ वर्षांपूर्वी उमटला होता, तो आजही ताजा आहे. जळगाव जामोदची ही घटना म्हणजे केवळ एक चुकीचा तपास नसून, कायद्याच्या नावाखाली चाललेला एक मोठा खेळ आहे. निष्पाप कुटुंबाला न्याय मिळाला तरी, या काळात झालेला अन्याय आणि मानवी हक्कांची पायमल्ली ही कायम काळीज सुन्न करणारी गोष्ट आहे. आता तरी प्रशासन खडबडून जागे होईल का आणि त्या मृतदेहाचे रहस्य उलगडून खऱ्या गुन्हेगारांपर्यंत पोहोचेल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. सामान्य जनतेला आता फक्त न्यायाची अपेक्षा आहे, कारण ‘पोलिस’ म्हणून ओळखले जाणारे रक्षक जेव्हा भक्षक बनतात, तेव्हा लोकशाहीचा पायाच डळमळीत होतो. ही बातमी वाचल्यानंतर १९९० ते २०२६ या प्रदीर्घ काळात पोलीस व्यवस्थेत काय बदलले, हेच शोधण्याची वेळ आली आहे. त्या काळात सीता पवार यांच्या नावावर जे घडले, तेच पुन्हा एकदा शिवानी कळमेकर यांच्या बाबतीत घडले आहे. आता प्रश्न हा आहे की, तो अज्ञात मृतदेह कोणाचा आहे? या जळालेल्या मृतदेहाचे रहस्य उलगडणार की हे प्रकरणही ३६ वर्षांपूर्वीच्या सीता पवार केसप्रमाणे कायमचे दडपले जाणार? हा प्रश्न आजही बुलढाण्यातील प्रत्येक सामान्य माणसाच्या मनात घर करून आहे.
“आज बुलढाण्यातील प्रत्येक सामान्य माणसाच्या मनात हाच प्रश्न आहे की, जळगाव जामोद, अंढेरा, किणगाव राजा आणि बुलढाणा भागात वारंवार अशा घटना का घडतात आणि तपास का लागत नाही? तो अनामिक मृतदेह नक्की कोणाचा होता? केवळ आपली ‘केस’ यशस्वी झाल्याची आकडेवारी दाखवण्यासाठी निष्पाप कुटुंबांना उद्ध्वस्त करण्याचा हा खेळ आता तरी थांबणार का? रक्षकच जेव्हा भक्षक बनतात, तेव्हा सामान्य माणसाने न्याय मागायचा तरी कोणाकडे? या अनामिक मृतदेहांचे रहस्य उलगडणार की हा ३६ वर्षांचा ‘खाकी’चा खेळ असाच सुरू राहणार, याचे उत्तर आता जनता प्रशासनाकडे मागत आहे!”
पोलीस जेव्हा सत्याचा शोध घेण्याऐवजी स्वतःची पाठ थोपटून घेण्यात मग्न असतात, तेव्हा असेच भयानक गुन्हे पुन्हा पुन्हा घडत राहतात. नाही आता या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी होणे ही काळाची गरज आहे, जेणेकरून भविष्यात कोणत्याही निष्पाप कुटुंबाला असा नरकयातनांचा त्रास सहन करावा लागणार नाही.

