पुणे/श्रीगोंदा/विश्वमंथन बातमी
महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सध्या खळबळ उडाली असून, सामाजिक कार्यकर्ते विकास लवंडे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काही अज्ञात इसमांनी लवंडे यांना एका निर्जन कोपऱ्यात गाठून त्यांच्यावर शाहीफेक केली आणि त्यांना चक्क बंदूक दाखवून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच आमदार रोहित पवार यांनी घटनास्थळी धाव घेत अत्यंत आक्रमक पवित्रा धारण केला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला असून, सुमारे १२ ते १५ जणांच्या टोळक्याने विकास लवंडे यांना घेरल्याचे स्पष्ट दिसत आहे. रोहित पवार यांनी असा जाहीर आरोप केला आहे की, हा केवळ शाहीफेक करण्याचा प्रकार नसून, या टोळक्याने चक्क बंदूक दाखवून लवंडे यांना धमकावले आहे, ज्यामुळे हा एक पूर्वनियोजित आणि जीवघेणा कट असल्याचे स्पष्ट होते.
​हल्ला करणाऱ्या व्यक्तींनी स्वतःला वारकरी संप्रदायाचे अनुयायी असल्याचे भासवले आहे, ज्यावर रोहित पवार यांनी तीव्र संताप व्यक्त केला. महाराष्ट्र ही संतांची आणि समतेच्या विचारांची भूमी आहे आणि वारकरी संप्रदाय हा नेहमीच संयम, संवाद आणि चर्चेच्या माध्यमातून मार्ग काढणारा मानला जातो. अशा प्रकारे खालच्या थराला जाऊन शिवीगाळ करणे, बेकायदेशीरपणे शस्त्रे घेऊन फिरणे आणि कोणावर तरी हल्ला करणे ही कृत्ये वारकरी परंपरेला आणि महाराष्ट्र धर्माला काळिमा फासणारी आहेत. हे ‘बोंदू’ लोक केवळ प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी आणि त्यांच्या राजकीय आकांकडून बक्षिसे मिळवण्यासाठी अशा प्रकारचे नीच कृत्य करत आहेत, अशी खरमरीत टीका पवार यांनी केली आहे.
​या घटनेनंतर पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवरही मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. रोहित पवार यांनी थेट आरोप केला आहे की, पोलीस प्रशासन केवळ सत्ताधारी पक्षातील नेत्यांच्या आणि श्रीमंतांच्या दबावाखाली लाचार होऊन काम करत आहे. विकास लवंडे यांच्या तक्रारीनुसार गंभीर गुन्हे दाखल करण्याऐवाजी पोलीस अत्यंत साध्या कलमांचा वापर करून आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलीस अधिकारी स्वतःच ‘काय गुन्हा घडला आणि काय नाही’ हे ठरवून भविष्य सांगणाऱ्यांसारखे वागत असल्याची टीका त्यांनी केली. यावेळी पोलिसांच्या पक्षपातीपणाचा पाढा वाचताना रोहित पवार यांनी एक खळबळजनक आठवण करून दिली. ते म्हणाले की, “जेव्हा अजित पवार यांच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी करत आम्ही एफआयआर (FIR) दाखल करण्यासाठी फिरत होतो, तेव्हा महाराष्ट्रातील कोणत्याही पोलीस स्टेशनने आमची तक्रार नोंदवून घेतली नाही. जर एवढ्या मोठ्या नेत्याच्या बाबतीत पोलीस तक्रार नोंदवून घेण्यास नकार देत असतील, तर या राज्यात सामान्य माणसाला न्याय मिळेल ही अपेक्षा करणेच चुकीचे आहे.”
​राज्यातील सध्याच्या गुंडशाहीच्या वातावरणाबद्दल बोलताना रोहित पवार यांनी सत्ताधारी पक्षातील नेत्यांचाही खरपूस समाचार घेतला. त्यांनी म्हटले की, जेव्हा राज्याचे जबाबदार लोकप्रतिनिधीच सार्वजनिक व्यासपीठावरून आई-बहिणीवरून घाणेरड्या शिव्या देतात आणि त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही, तेव्हाच अशा गुंडांचे धाडस वाढते. सत्ताधारी नेत्यांसोबत गुन्हेगारांचे फोटो सोशल मीडियावर मिरवले जात असल्याने या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना “हे आपलेच सरकार आहे” असे वाटू लागले आहे. यामुळेच आज महाराष्ट्रातील सामान्य जनता आणि विचारांसाठी लढणारे कार्यकर्ते असुरक्षित वाटत आहेत.
​शेवटी, या प्रकरणाचा तपास पारदर्शक पद्धतीने करून मुख्य सूत्रधार आणि गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी रोहित पवार यांनी केली आहे. केवळ शाहीफेक म्हणून या गंभीर प्रकरणाकडे न पाहता, जो बेकायदेशीर शस्त्रांचा वापर आणि जीवे मारण्याची उघड धमकी दिली गेली आहे, त्याबद्दल योग्य ती फौजदारी कलमे लावून आरोपींना तात्काळ तुरुंगात धाडावे, अशी त्यांची ठाम मागणी आहे. विकास लवंडे यांच्या पाठीशी संपूर्ण ताकदीनिशी उभे असल्याचे सांगतानाच, त्यांनी असा सज्जड दम भरला की जर पोलिसांनी आपले कर्तव्य चोख बजावले नाही, तर वकिलांच्या सल्ल्याने आणि न्यायालयीन मार्गाने या प्रकरणाचा शेवटपर्यंत पाठपुरावा केला जाईल.

Share