
मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारवर हल्लाबोल; मराठा आरक्षणावरून बावनकुळेंवर गंभीर आरोप, मुंबईत पुन्हा यलगारचा इशारा!
छत्रपती संभाजीनगर/विश्वमंथन
मराठा आरक्षणावरून महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा संघर्ष पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. कुणबी नोंदी आणि प्रमाणपत्र रद्द करण्याच्या मुद्यावरून आक्रमक झालेले मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर आणि विशेषतः भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर अतिशय तीव्र शब्दांत हल्लाबोल केला आहे. मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण शेवटपर्यंत लढणार असून, सरकारची कोणतीही नवी चाल किंवा षडयंत्र यशस्वी होऊ देणार नाही, असा ठणकावून सांगत जरांगे पाटलांनी थेट २९ तारखेच्या आंदोलनाबाबत आणि प्रसंगी मुंबईत पुन्हा एकदा एल्गार पुकारण्याचा इशारा दिला आहे.
रेखा सरोदे यांच्या दाखल्याबाबत आणि कुणबी नोंदी रद्द झाल्याच्या चर्चेवर बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, दाखला आम्ही कधीच रद्द केला नव्हता आणि तसे कोणतेही अधिकृत आदेश दिलेले नव्हते. उगाच आता सरकार आपली चूक मान्य करण्याऐवजी विनाकारण स्पष्टीकरण देण्याच्या भानगडीत पडत आहे. हा प्रकार अतिशय चुकीचा आणि नासका असून, आता त्यावर गोमूत्र शिंपडून काहीही उपयोग होणार नाही, असा घणाघात त्यांनी केला. दोन महिन्यांपूर्वीच ही गोष्ट नेत्यांना सांगितली होती, तरीही मीडिया ट्रायल चालवून गरिबांच्या वेदनांशी खेळले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
या संपूर्ण प्रकरणामागे नेमका कोणाचा हात आहे, असा सवाल करत जरांगे म्हणाले की, बावनकुळेंच्या सांगण्यावरून आणि कोणाच्यातरी दबावामुळे किंवा फोनवरून हे सगळे प्रयोग करण्यात आले. परळीच्या टोळीला खुश करण्यासाठी हा सर्व खेळ रचला गेला का, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणण्याचा किंवा एकनाथ शिंदे यांनी शोधलेल्या नोंदी रद्द करून मराठ्यांच्या नजरेतून त्यांना पाडण्याचा हा डाव आहे का? असा सवाल करत बावनकुळे खूप मोठी चूक करत आहेत आणि त्यांना याची जाणीव नाही, असे जरांगे म्हणाले. एकनाथ शिंदे यांनीही आपल्या कामाची जाणीव ठेवावी आणि मराठ्यांच्या लेकरांचे वाटोळे शिरसाट किंवा बावनकुळे यांच्यासाठी होऊ देऊ नये, असा परखड सल्ला त्यांनी दिला. सत्तेत राहून मराठ्यांच्या विरोधात गेलात तर तुम्ही पूर्णपणे संपून जाल, असा गर्भित व स्पष्ट इशारा त्यांनी सरकारला दिला.
प्रमाणपत्र रद्द करण्याच्या मुद्यावर बोलताना जरांगे यांनी स्पष्ट केले की, एनआयसीवर अपलोड केल्याशिवाय प्रमाणपत्र कसे निघणार? आधी रद्द झाले असे सांगायचे आणि मधल्या काळात नोंदी उडवायच्या, हा निव्वळ खेळ चालला आहे. बावनकुळे यांच्या सांगण्यावरूनच दीडशे-दोनशे वर्षांपूर्वीच्या नोंदीत बदल करून मराठ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला जात आहे. मात्र, जेव्हा हे सगळे पत्र बाहेर आले, तेव्हा मराठा समाज खरबडून जागा झाला. सरकारकडून जाणीवपूर्वक अन्याय केला जात असून मराठ्यांच्या पोरांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचे हे षडयंत्र आहे, असा आरोप त्यांनी केला.
या संपूर्ण प्रकरणामागे एक मोठा राजकीय डाव होता, असे सांगत जरांगे म्हणाले की, या चार नोंदी रद्द करून मराठा समाजात गैरसमज पसरवण्याचा भाजपच्या आयटी सेलचा आणि नेत्यांचा प्लॅन होता. कुणबी नोंदी टिकणार नाहीत आणि जरांगे पाटलांचे आंदोलन धोक्यात आले आहे, असा प्रचार करून मराठ्यांच्या पोरांच्या मनात भीती निर्माण करायची हा त्यांचा हेतू होता. पोरानी ऍडमिशन घेतले, नोकऱ्या मिळवल्या, पण आता आपल्या भविष्याचे काय होणार, अशी भीती दाखवून ५८ लाख नोंदी मागण्यापासून रोखायचे हा यामागील मुख्य उद्देश होता. कारण ५८ लाख नोंदी बाहेर आल्या तर अडीच कोटी मराठा समाज आरक्षणात जाईल आणि पक्के आरक्षण द्यावे लागेल, या भीतीनेच हे सर्व नाटक रचले गेले, असे त्यांनी स्पष्ट केले.
स्वातंत्र्यपूर्व काळात किंवा इंग्रज आणि निजामाच्या राजवटीत जेव्हा शेतीचा सारा किंवा महसूल गोळा केला जात होता, तेव्हा कोण शेती करतो हे पाहण्यासाठी जाती लिहिल्या जात होत्या. त्यावेळी कोणालाही माहीत नव्हते की पुढे जाऊन या नोंदी आरक्षणासाठी उपयोगाला येतील. मात्र आता जेव्हा कागदपत्रे समोर येत आहेत, तेव्हा सरकारला भीती वाटू लागली आहे. मराठा समाजाला गॅझेट देऊन पिढ्यान् पिढ्यांचे कल्याण होऊ नये म्हणून हा सर्व घाट घातला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
कोणत्याही मीडिया ट्रायलला किंवा बदनामीच्या षडयंत्राला आपण बळी पडणार नाही, असा पुनरुच्चार करत जरांगे म्हणाले की, मराठ्यांनी आता प्रचंड एकजूट दाखवली आहे. आरक्षण मिळाले नाही तरी चालेल, पण मी माझ्या मराठा लेकरांशी कधीही गद्दारी करणार नाही आणि त्यांचे रक्त विकणार नाही. समाजाचे हित कशात आहे हे मला चांगले ठाऊक आहे आणि जर माझ्यामुळे समाजाचे काही वाईट होणार असेल, तर मी एका दिवसात हे काम सोडायला तयार आहे. मात्र मराठ्यांचे वाटोळं मी माझ्या डोळ्यांनी बघू शकत नाही, असे ते अत्यंत भावूक होत म्हणाले.
सध्या मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात एकच वादळ उठले असून प्रत्येकाची एकच मागणी आहे की आता थेट मुंबईतच गेले पाहिजे, असे जरांगे यांनी स्पष्ट केले. येत्या २९ तारखेचे आंदोलन अतिशय शांततेत पार पडेल, परंतु लोकांचा रोष पाहता मुंबईचा निर्णय देखील घेतला जाऊ शकतो. मराठा समाजाला विश्वासात घेऊनच पुढील अंतिम निर्णय घेतला जाईल, असे सांगत त्यांनी सरकारला कोणत्याही क्षणी कठोर पावले उचलण्याचा इशारा दिला आहे. जर सरकारने मराठा समाजाच्या विरोधात जाणे बंद केले नाही आणि सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर मात्र मराठा समाज शांत बसणार नाही आणि पुन्हा एकदा मुंबईत मोठा एल्गार पाहायला मिळेल, असे स्पष्ट संकेत मनोज जरांगे पाटील यांनी दिले आहेत.









