यांच्या सौजन्याने

नागपूर:
देशभरात चर्चेत असलेले बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री ऊर्फ बागेश्वर बाबा यांच्या ‘दिव्य शक्ती’ला अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्याम मानव यांनी पुन्हा एकदा जाहीर आव्हान दिले आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी जाहीर केलेले ३० लाखांचे बक्षीस आता वाढवून ८० लाख रुपये करण्यात आले आहे. “जर बागेश्वर बाबांनी आमचे आव्हान स्वीकारले आणि स्वतःची शक्ती सिद्ध केली, तर त्यांना हे ८० लाखांचे पारितोषिक दिले जाईल,” असे श्याम मानव यांनी स्पष्ट केले आहे.
जानेवारी २०२३ मध्ये नागपूर येथे बागेश्वर बाबांचा दरबार भरला होता. त्यावेळेस अंधश्रद्धा निर्मूलन समितीने त्यांना जाहीर आव्हान दिले होते. श्याम मानव यांच्या दाव्यानुसार, त्या काळात बाबांनी आव्हान स्वीकारण्याऐवजी दोन दिवस आधीच नागपूरमधून पळ काढला होता. नुकत्याच समोर आलेल्या काही व्हिडिओंमध्ये बागेश्वर बाबांनी या आव्हानावर भाष्य करताना आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचे दिसून आले आहे. ज्यांना काही खाज असेल त्यांनी माझ्या दरबारात यावे ते स्वतः कोणाकडे जाणार नसून नागपुरात दोन दिवस दरबार लावणार आहे. यावर बोलताना श्याम मानव म्हणाले की, “स्वतःला शास्त्री आणि रामकथा वाचक म्हणवून घेणाऱ्या व्यक्तीने ‘खुजली’ सारख्या शब्दांचा प्रयोग करणे ही त्यांची संस्कृती दर्शवते. अशा शब्दांतून कोणाचेही मार्गदर्शन होऊ शकत नाही.”
बागेश्वर बाबा आपल्या दरबारामध्ये येणाऱ्या भक्तांचे नाव, पत्ता, त्यांच्या वडिलांचे नाव, मोबाईल नंबर आणि आडनाव कोणताही आधार न घेता अचूक सांगत असल्याचा दावा करतात. तसेच, भक्ताच्या घरात कोणती वस्तू कुठे ठेवली आहे, हे देखील ते ओळखतात, असे त्यांचे म्हणणे आहे. यालाच समितीने आव्हान दिले आहे.
​श्याम मानव यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, “आम्ही बाबांसमोर ऐनवेळी १० अनोळखी व्यक्ती उभ्या करू. बाबांनी आपल्या दिव्य शक्तीचा वापर करून त्या १० लोकांचे नाव, पत्ता, वडिलांचे नाव, आडनाव आणि जन्मतारीख आधार कार्ड नुसार मोबाईल नंबर एका कागदावर लिहून द्यावा. जर त्यांनी हे अचूक करून दाखवले, तर आम्ही त्यांना ८० लाख रुपये देऊ.
आजवर अनेक भोंदू बाबांचा पर्दाफाश केल्याचा दावा अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केला आहे. हा बागेश्वर बाबा भोंदू बाबा आहे आसे शाम मानव म्हणाले. श्याम मानव यांच्या मते, जोपर्यंत समाजात अंधश्रद्धा आहे आणि समिती कार्यरत आहे, तोपर्यंत हे आव्हान कायम राहील. दिव्य शक्तीचा दावा करणाऱ्यांनी तो विज्ञानाच्या कसोटीवर सिद्ध करावा, असे समितीचे म्हणणे आहे.
​सध्या हे ८० लाखांचे आव्हान सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चेत असून, बागेश्वर बाबा आता यावर काय प्रतिक्रिया देतात किंवा हे आव्हान स्वीकारतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सामान्य माणसाने कोणत्याही चमत्कारावर डोळे झाकून विश्वास ठेवू नये, असे आवाहनही या निमित्ताने करण्यात येत आहे.

Share