परभणी: विशेष प्रतिनिधी
प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू कडू यांनी घेतलेल्या राजकीय निर्णयाने सध्या संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या निर्णयाचे पडसाद आता स्थानिक पातळीवर उमटू लागले असून परभणीचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने यांनी बच्चू कडू यांच्यावर अत्यंत बोचरी आणि घणाघाती टीका करत आपला तीव्र संताप व्यक्त केला आहे. बोधने यांनी मांडलेली भूमिका ही केवळ एका जिल्हाप्रमुखाची नसून, ती तळागाळातील हजारो कार्यकर्त्यांच्या मनातील खदखद असल्याचे स्पष्ट होत आहे.
शिवलिंग बोधने यांनी आपल्या प्रतिक्रियेची सुरुवातच अत्यंत भावनिक आणि आक्रमक मुद्द्याने केली. ते म्हणाले की, बच्चू कडू यांना आमदारकी मिळाली किंवा ते विधानसभेत गेले याचा आम्हाला आनंदच आहे, मात्र हा आनंद साजरा करताना त्यांनी ज्या कार्यकर्त्यांच्या जिवावर हे यश मिळवले, त्यांनाच वाऱ्यावर सोडले याचे दुःख मोठे आहे. ज्या कार्यकर्त्यांनी गेल्या १०-१२ वर्षांपासून आपले संपूर्ण आयुष्य, आपले अस्तित्व पणाला लावून प्रहार संघटना उभी केली, त्या कार्यकर्त्याला या सुखाच्या क्षणी सहभागी करून घेण्याऐवजी बाजूला सारण्याचे काम नेत्याने केले आहे. मुंबईत बसून, कोणालाही विश्वासात न घेता घेतलेला हा निर्णय कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला आहे.
या संतापजनक भूमिकेमागे कार्यकर्त्यांचे मोठे बलिदान असल्याचे बोधने यांनी आवर्जून नमूद केले. त्यांनी सांगितले की, जेव्हा जेव्हा आंदोलनाची हाक दिली जायची, तेव्हा राज्यातील कानाकोपऱ्यातून शेतकरी, कष्टकरी आणि गरीब घरातील तरुण धावून यायचा. अंगावर पोलिसांच्या केसेस घेतल्या, लाठ्याकाठ्या खाल्ल्या आणि स्वतःच्या संसाराची राखरांगोळी करून पक्षाचे काम केले. अनेक कार्यकर्त्यांनी तर आंदोलनाला जाण्यासाठी, गाड्या भाड्याने करण्यासाठी आपल्या घरातील कापूस आणि सोयाबीन विकले. आई-वडिलांच्या कष्टाचे पैसे त्यांनी संघटनेसाठी खर्च केले. आज त्याच कार्यकर्त्यांच्या बलिदानाचा विसर पडला असून, एका आमदारकीसाठी त्यांचे कष्ट मातीत घालण्याचे काम सुरू आहे. ‘कार्यकर्त्यांच्या कष्टाच्या कबरी खोदून जर तुम्ही आमदारकी भोगणार असाल, तर त्या गरिबांची हाय तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाही’, अशा जळजळीत शब्दांत बोधने यांनी बच्चू कडू यांना सुनावले आहे.

बोधने यांनी या प्रक्रियेतील कायदेशीर आणि नैतिक मुद्द्यांकडेही लक्ष वेधले. प्रहार जनशक्ती पक्ष हा एक नोंदणीकृत राजकीय पक्ष असून तो कोण्या एका व्यक्तीची खाजगी मालमत्ता नाही. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार एखादा पक्ष विलीन करायचा असेल किंवा दुसऱ्या पक्षात जायचे असेल, तर त्यासाठी पक्षाचे अधिवेशन बोलावावे लागते, ठराव मंजूर करावा लागतो आणि कार्यकर्त्यांची संमती घ्यावी लागते. मात्र, कडू यांनी लोकशाहीच्या सर्व नियमांना धाब्यावर बसवून, रातोरात स्वतःचा निर्णय जाहीर केला. एकाही जिल्हाप्रमुखाला किंवा पदाधिकाऱ्याला फोन करून साधी कल्पनाही दिली गेली नाही. हा प्रकार म्हणजे कार्यकर्त्यांना दुसऱ्याच्या दावणीला बांधण्यासारखा आहे, असा आरोप त्यांनी केला.
’आम्ही लाचार नाही’ असे ठणकावून सांगताना बोधने म्हणाले की, आम्ही स्वाभिमानी कार्यकर्ते आहोत. उद्या जर आम्हाला कोणी सांगत असेल की ‘जय प्रहार’ म्हणू नका किंवा दुसऱ्या कोणाला तरी आपला ‘गॉडफादर’ माना, तर ते आम्हाला कदापि मान्य नाही. जर बच्चू कडू यांना असे वाटत होते की हे कार्यकर्ते आता ओझे झाले आहेत, तर त्यांनी सन्मानाने पक्ष बंद करायला हवा होता किंवा अधिकृतपणे चर्चा करायला हवी होती. मात्र, कार्यकर्त्यांचा वापर केवळ आंदोलनापुरता करून घेऊन त्यांना राजकीयदृष्ट्या संपवण्याचा हा प्रयत्न निषेधार्ह आहे.
बच्चू कडू यांनी यापूर्वीच्या राजकीय बंडाच्या वेळी दिलेल्या ‘दिव्यांग मंत्रालय’ स्थापनेच्या कारणाचाही बोधने यांनी समाचार घेतला. तेव्हा आम्हाला वाटले की ते गरिबांच्या कल्याणासाठी गेले आहेत, पण आताचा त्यांचा निर्णय हा केवळ सत्तेच्या मोहातून घेतल्याचे स्पष्ट दिसत आहे. ज्या स्वाभिमानासाठी प्रहार ओळखला जायचा, त्या स्वाभिमानाचाच आज बळी दिला गेला आहे. ज्या सत्तेमुळे कार्यकर्त्यांच्या मान-सन्मानाला धक्का लागत असेल, अशा सत्तेची आम्हाला गरज नाही आणि अशा सत्तेला आम्ही लाथ मारतो, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
शेवटी, प्रहारच्या पुढील प्रवासाबाबत बोलताना शिवलिंग बोधने यांनी स्पष्ट केले की, आता कार्यकर्त्यांची फरफट थांबवण्याची वेळ आली आहे. कोअर कमिटी आता गावोगावी जाईल, प्रत्येक तालुक्यात आणि जिल्ह्यात जाऊन बैठका घेईल. जिल्हा शाखाप्रमुख आणि सामान्य कार्यकर्त्यांशी चर्चा करून जो सामूहिक निर्णय होईल, तोच आम्हाला मान्य असेल. आम्ही कोणाच्याही वैयक्तिक हितासाठी आता बळी जाणार नाही. बच्चू कडू यांनी घेतलेल्या एकतर्फी निर्णयामुळे आता कार्यकर्ता रस्त्यावर उतरून आपल्या अस्तित्वाची लढाई लढण्यास सज्ज झाला आहे, असा इशारा देऊन बोधने यांनी पूर्णविराम घेतला. या प्रखुर भूमिकेमुळे प्रहार जनशक्ती पक्षाचे भवितव्य आता काय असणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

