उद्धव ठाकरेंसोबत दगाबाजी? खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या शिंदे गट प्रवेशाच्या चर्चेने राजकारण तापले!

विशेष प्रतिनिधी, मुंबई :
महाराष्ट्राच्या राजकारणात आजवर अनेक धक्कादायक कोलांट्या उड्या आणि राजकीय भूकंप उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहेत. परंतु, ज्या एका निर्णयाने संपूर्ण राज्याला सुन्न केले आहे आणि निष्ठावंत शिवसैनिकांच्या अंगावर संतापाचे शहारे आणले आहेत, ती मोठी बातमी आता समोर आली आहे. धाराशिवचे खासदार आणि ज्यांना कालपर्यंत शिवसेनेचा ढाण्या वाघ, निष्ठावंत मावळा समजले जात होते, त्या ओमराजे निंबाळकर यांनी अचानक उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात जाण्याचा अत्यंत धक्कादायक निर्णय घेतला आहे. ज्या मातोश्रीने त्यांना पोटच्या मुलासारखी माया दिली, ज्या उद्धव ठाकरेंनी त्यांना राजकीय अंधारातून बाहेर काढून शून्यातून विश्व निर्माण करून दिले, त्याच पाठीवर आता राजकीय स्वार्थाचा आणि सत्तेचा खंजीर खुपसला गेल्याची तीव्र भावना संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिकांमधून व्यक्त होत आहे. ऐन संकटाच्या काळात पक्षाला आणि आपल्या उद्धव ठाकरे यांना वाऱ्यावर सोडून जाण्याच्या या कृत्यामुळे जनमानसात तीव्र संतापाची लाट उसळली असून, कालपर्यंत ‘हिरो’ असणारे राजे आज थेट ‘झिरो’ ठरले आहेत की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
​या संपूर्ण राजकीय भूकंपाची इनसाईड स्टोरी आता हळूहळू चव्हाट्यावर येऊ लागली आहे. अत्यंत विश्वासू सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सर्व प्रकार अत्यंत गुप्तपणे आणि नियोजनबद्ध रीतीने पार पाडण्यात आला. एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या ‘ऑपरेशन टायगर’ अंतर्गत आमदार प्रताप सरनाईक आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मध्यस्थीने हा मोठा डाव साधला गेला. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी अत्यंत गुप्तपणे प्रथम पुण्यातून हालचाली केल्या आणि तिथून थेट दिल्ली गाठली. दिल्लीला जाण्यासाठी विशेष चार्टर्ड विमानाचे उड्डाण करण्यात आले होते, अशीच चर्चा लोकांमध्ये असून अशी लाजीरवाणी माहिती आता उघड झाली आहे. दोन दिवसांपूर्वीच निष्ठेच्या आणि ईमानाची भाषा करणाऱ्या राजेंनी एका रात्रीत आपला शब्द आणि निष्ठा हवेत कशी विरघळवून टाकली, हाच प्रश्न आता सामान्य जनतेला पडला आहे. या संशयास्पद घडामोडींवर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन मोठा गौप्यस्फोट केला आहे. कोर्टातील प्रलंबित प्रकरणे आणि विविध तपास यंत्रणांच्या चौकशांचा मोठा दबाव आणून ओमराजे निंबाळकर यांना शरण येण्यास भाग पाडण्यात आले, असा थेट दावा संजय राऊत यांनी केला आहे. मात्र, या दाव्यानंतर सामान्य जनतेतून एकच सवाल उपस्थित केला जात आहे की, जर तुम्ही खरे मर्द मावळे होता, तर इतक्या लवकर तुम्ही गनिमांसमोर आपले हत्यार कसे काय टाकले?
​वास्तविक पाहता, ओमराजे निंबाळकर आणि ठाकरे कुटुंबाचे नाते हे केवळ राजकीय नव्हते, तर ते अत्यंत कौटुंबिक आणि भावनिक होते. २००६ मध्ये वडील पवनराजे निंबाळकर यांच्या क्रूर हत्येनंतर जेव्हा संपूर्ण निंबाळकर कुटुंब एका प्रचंड मोठ्या संकटात सापडले होते, जेव्हा त्यांच्या आयुष्यात संपूर्ण राजकीय अंधार दाटला होता, तेव्हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी त्यांना पितृतुल्य पाठबळ दिले होते. राजकारणाचा कोणताही प्रदीर्घ अनुभव पाठीशी नसताना, केवळ वडिलांच्या निधनामुळे खचलेल्या एका तरुणाला उद्धव ठाकरेंनी आधार दिला धीर दिला. ज्या व्यक्तीने आपल्या आयुष्यात साधी ग्रामपंचायतीची निवडणूक देखील लढवली नव्हती, त्या ओमराजे निंबाळकर यांना २००९ च्या विधानसभा निवडणुकीत मातोश्रीवरून पहिल्यांदा आमदारकीचे तिकीट देण्यात आले आणि सर्व शक्ती पणाला लावून त्यांना निवडून आणले गेले. मातोश्रीवर श्रीमती रश्मी ठाकरे यांनी त्यांना आपल्या मुलाप्रमाणे मायेने वाढवले होते आणि त्यांना मातोश्रीवर कधीही येण्याची आणि भेटण्याची पूर्ण मुभा होती. स्वतः उद्धव ठाकरे यांनी भरसभेत ओमराजेंच्या खांद्यावर हात ठेवून, ‘शिवसैनिकांनी निष्ठा शिकावी ती ओम राजेंकडून’, असे गौरवोद्गार काढले होते. शिर्डीचे वाकचवरे किंवा संजय दिना पाटील यांच्यासारखे नेते पक्ष सोडून गेले तेव्हा उद्धव ठाकरेंना जेवढे दुःख झाले नसेल, त्यापेक्षा हजार पटीने जास्त दुःख ओमराजे निंबाळकर यांच्या या दगाबाजीमुळे झाले आहे, कारण हा घाव थेट काळजावर बसला आहे.
​धाराशिव हा नेहमीच शिवसेनेचा आणि ठाकरे कुटुंबाचा सर्वात मजबूत बालेकिल्ला राहिला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात जेव्हा जेव्हा ठाकरे कुटुंबावर वाईट वेळ आली, तेव्हा तेव्हा धाराशिव आणि परभणीसह संपूर्ण मराठवाड्याच्या जनतेने ढाल बनून त्यांना साथ दिली. अगदी अलीकडेच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण राज्याची सत्ताधारी यंत्रणा, पैसा आणि ताकद विरोधात असताना देखील, केवळ उद्धव ठाकरेंचा चेहरा आणि हातातील शिवसेनेची मशाल पाहून धाराशिवच्या मतदारांनी आणि शिवसैनिकांनी रात्रीचा दिवस केला होता. आपल्या रक्ताचे पाणी करून, संपूर्ण भावनिक लाटेवर स्वार होत शिवसैनिकांनी ओमराजे निंबाळकर यांना तब्बल ४ लाखांहून अधिक मताधिक्याने विजयी करून संसदेत पाठवले होते. अर्ध्या रात्री देखील सर्वसामान्यांच्या हाकेला ओ देणारा आपला हक्काचा खासदार म्हणून लोकांनी त्यांच्यावर भरभरून प्रेम केले. मात्र, ज्या मतदारांनी आणि कार्यकर्त्यांनी आपल्याला डोक्यावर घेतले, त्यांनाच आज ओमराजेंनी सत्तेच्या तुकड्यासाठी वाऱ्यावर सोडले आहे. यामुळे आता धाराशिवच्या पवित्र भूमीवर गद्दारीचा कलंक लागला असून, संतापलेल्या शिवसैनिकांनी थेट त्यांच्या तोंडाला शेण फासण्याचा इशारा दिला आहे.
​सध्या ओमराजे निंबाळकर यांचे समर्थक असे लंगडे समर्थन करत आहेत की, मतदारसंघात मोठा निधी आणण्यासाठी आणि विकासकामे करण्यासाठी सत्तेच्या प्रवाहात सामील व्हावे लागते. परंतु, स्वाभिमानी धाराशिवकरांना अशा विकासाच्या मोबदल्यात गद्दारीचा कलंक अजिबात नको आहे. त्यांना विकासासोबतच आपला नेता निष्कलंक आणि स्वाभिमानी हवा आहे. सत्ता येत असते आणि जात असते, पैसा येतो तसाच तो जाण्याचे मार्गही ठरलेले असतात; परंतु स्वार्थासाठी आपल्या पोशिंद्याच्या पाठीत खंजीर खुपसून मिळवलेली सत्ता ही कधीही टिकत नसते, हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. इतिहास साक्षी आहे की, ज्यांनी ज्यांनी बाळासाहेबांच्या आणि उद्धव ठाकरेंच्या विचारांशी प्रतारणा केली, त्यांना महाराष्ट्राच्या मातीने कधीही क्षमा केलेली नाही. इतका प्रचंड गदारोळ होऊन देखील ओमराजे निंबाळकर यांच्याकडून अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण आलेले नाही, हीच सर्वात मोठी शोकांतिका आहे. त्यांनी उपकार विसरले असतील, पण ही स्वाभिमानी जनता आणि निष्ठावंत शिवसैनिक त्यांची ही गद्दारी कधीच विसरणार नाहीत, अशी धगधगती भावना सध्या संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे.

Share