
“दुसऱ्याचे पहावे वाकुन, आपले ठेवावे झाकून”.
संपादकीय/विश्वमंथन
भारताच्या राजकारणात आज ज्या प्रकारची भाषा, उच्चार आणि राजकीय संस्कृती पाहायला मिळत आहे, ती एका नव्या आणि गंभीर नैतिक संकटात सापडली असल्याचे दिसते. राजकारणात मतांचे राजकारण करताना विरोधकांवर टीका करणे नवीन नाही, परंतु जेव्हा देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्तीपासून ते अगदी तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंतची भाषा ढासळत जाते, तेव्हा संपूर्ण समाजासमोर एक मोठा प्रश्न उभा राहतो. अलीकडेच सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक विशेष रील जारी केली, ज्यामध्ये त्यांनी जंतरमंतरवर झालेल्या आंदोलनादरम्यान काही तरुणांकडून झालेल्या चुका आणि शिवीगाळीचा मुद्दा अत्यंत भावनिक रीतीने मांडला. लहान वयात चुका होतात, आपल्या मुलांकडून जर काही चुकीचे शब्द वापरले गेले तर त्यांना शिक्षा देण्यापेक्षा किंवा तुरुंगात धाडण्यापेक्षा त्यांना जवळ घेऊन योग्य मार्ग दाखवणे आपले कर्तव्य आहे, असे सांगत पंतप्रधानांनी सर्वांना माफ करण्याचे आवाहन केले. एकीकडे हे मोठे मन दाखवताना पंतप्रधानांनी प्रेमाची आणि क्षमेची भाषा वापरली खरी, परंतु याच मुद्द्यावरून राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून एक अत्यंत सणसणीत आणि आरसा दाखवणारा सवाल उपस्थित केला जात आहे की, दुसऱ्यांच्या चुकांवर पांघरूण घालताना किंवा माफ करताना स्वतःच्या आणि आपल्या पक्षाच्या लोकांनी आजवर वापरलेल्या भाषेचे काय? या संपूर्ण प्रकरणाची चिरफाड करताना मराठीत एक जुनी आणि अत्यंत समर्पक म्हण अगदी तंतोतंत लागू होते, ती म्हणजे “दुसऱ्याचे पहावे वाकुन, आपले ठेवावे झाकून”.
पंतप्रधानांनी आपल्या रील संदेशात अत्यंत काळजीपूर्वक आणि कमालीच्या संयमी सुरात असे म्हटले की, जंतरमंतरवर जे काही घडले ते अत्यंत वेदनादायक होते. देशात आणि जगात त्याबद्दल चर्चा झाली. काही मुले आणि विशेषतः काही मुलींनी ज्या भद्दी आणि अश्लील भाषेचा वापर केला, त्यामुळे संपूर्ण सभ्य समाज सुन्न झाला. स्वतः पंतप्रधान आणि त्यांच्या स्वर्गीय आईबद्दलही अत्यंत गलिच्छ शब्दांत शेरेबाजी करण्यात आली. हा एक सांस्कृतिक धक्का होता कारण आपल्याच देशातील तरुण मुली अशा प्रकारची भाषा बोलू शकतात, यावर विश्वास बसत नाही. परंतु, लहान मुले किंवा तरुण हे वयाने कच्चे असतात, त्यांच्याकडून चुका होऊ शकतात. त्यांना तुरुंगात पाठवून, त्यांच्यावर गुन्हे दाखल करून किंवा त्यांचे भविष्य उद्ध्वस्त करून परिस्थिती सुधारणार नाही. उलट, दाताखाली जीभ आली तरी आपण दात तोडून टाकत नाही कारण दोन्ही आपलेच आहेत, या न्यायाने आपण त्या मुलांना माफ करत आहोत आणि समाजानेही त्यांना माफ करून योग्य वाट दाखवली पाहिजे, असा भाव या संदेशातून मांडण्यात आला.
परंतु, प्रश्न असा निर्माण होतो की, जेव्हा देशाचा मुखिया किंवा सत्तेत बसलेले लोक अशा प्रकारे उदार अंतःकरणाने क्षमेची भूमिका घेतात, तेव्हा त्यांच्याच तोंडून भूतकाळात आणि वर्तमानात बाहेर पडलेल्या शब्दांचे काय? नरेंद्र मोदी आणि त्यांच्या पक्षातील प्रमुख नेत्यांच्या जुन्या भाषणांचे काय? राजकारणाच्या पटलावर विरोधकांवर निशाणा साधताना पंतप्रधानांनी स्वतः अनेकदा असे शब्द वापरले आहेत, जे कोणत्याही सभ्य राजकीय परंपरेत बसत नाहीत. जसे की, संसदेत किंवा सभांमध्ये बोलताना ‘काँग्रेसची विधवा’, ‘जर्सी गाय’, ‘हायब्रिड बछडा’, शशी थरूर यांच्या पत्नीबद्दल स्वतः नरेंद्र मोदी यांनी ‘५० कोटींची गर्लफ्रेंड’ किंवा ‘मुजरा’ यांसारखे अत्यंत आक्षेपार्ह, तुच्छतादर्शक आणि वैयक्तिक पातळीवर घसरणारे शब्द वापरले गेले. जेव्हा देशाचे सर्वोच्च नेतृत्व अशा प्रकारची भाषा वापरते, तेव्हा त्याचा काय संदेश जातो? जर सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्तीने किंवा त्यांच्या पक्षाच्या मंत्र्यांनी आणि नेत्यांनी आजवर जाहीर सभांमध्ये, संसदेत किंवा टीव्ही चॅनेलवर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन विरोधकांच्या माता-भगिनींवर किंवा वैयक्तिक आयुष्यावर शेरेबाजी केली असेल, तर मग सर्वसामान्य तरुण किंवा जनता त्यांच्याकडून काय शिकणार?
या देशात मुलांवर किंवा तरुणांवर जेव्हा गुन्हे दाखल होतात, तेव्हा कायद्याचा बडगा उगारून त्यांना तुरुंगात टाकले जाते. पण जेव्हा भाजपच्याच गोटातून किंवा त्यांच्या आयटी सेलच्या माध्यमातून महिलांवर, पत्रकारांवर किंवा विरोधकांवर रोज अत्यंत गलिच्छ आणि अश्लील भाषेत हल्ले केले जातात, तेव्हा त्यावर कसलीही कारवाई होत नाही का? असा अत्यंत जळजळीत सवाल उपस्थित केला जात आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ असोत, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह असोत किंवा भाजपच्याच तिकीटावर संसदेत पोहोचलेल्या अभिनेत्री खासदार कंगना रणौत असोत, यांनी वेळोवेळी वापरलेली भाषा ही कधी आंदोलक तरुणांना ‘गटर’ म्हणणारी राहिली, तर कधी पत्रकारांना किंवा न्यायव्यवस्था व संविधानिक पदांवर बसलेल्या व्यक्तींना अपमानास्पद बोलणारी राहिली. कंगना रणौत यांनी आंदोलक शेतकऱ्यांना किंवा तरुणांना ज्या प्रकारे हिणवले, त्यावर पक्षातून कोणतीही कठोर कारवाई झाली नाही. उलट, अशा नेत्यांना पाठीशी घालण्याचे काम केले गेले.
आज जेव्हा तरुण वर्ग रस्त्यावर उतरून आपल्या हक्कांसाठी, बेरोजगारीसाठी किंवा पेपरफुटीच्या भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवतो, तेव्हा त्यांच्यावर पोलिसी बडगा उगारला जातो. आंदोलनात सहभागी झालेल्या लहान मुलींना, विद्यार्थिनींना त्यांच्यावर मानसिक आणि शारीरिक अत्याचार केले जातात, त्यांच्या खासगी आयुष्याचे आणि प्रतिमेचे खच्चीकरण केले जाते. एका बाजूला पोलिसांच्या माध्यमातून लाठ्या चालवायच्या, कपडे फाडायचे, अंगावर गुन्हे दाखल करून तुरुंगात डांबायचे आणि दुसऱ्या बाजूला मात्र कॅमेऱ्यासमोर येऊन अत्यंत मायेने “मी माझ्या मुलांना माफ केले” असा आव आणायचा, हा निव्वळ दांभिकपणा आणि ढोंग असल्याचा आरोप या संपूर्ण घडामोडींवरून केला जात आहे. हे अगदी तसेच आहे की, स्वतः हजारो गुन्हे करायचे, शिवीगाळ करायची, इतरांच्या चारित्र्याची विटंबना करायची आणि जेव्हा समोरची पिढी किंवा विरोधक त्याच भाषेत प्रत्युत्तर देऊ लागतात, तेव्हा अचानक नैतिकतेचा बुरखा पांघरून स्वतःला महान दाखवण्याचा प्रयत्न करायचा.
राजकारणात आज ज्या प्रकारची भाषा वापरली जात आहे, त्यामुळे देशाची युवा पिढी उद्ध्वस्त होत आहे. कारण मुले आपल्या नेत्यांनाच आपला आदर्श मानतात. जर देशाचा नेता किंवा पक्षाचे मोठे नेते संसदेत किंवा सभेत अत्यंत गलिच्छ शब्दांत एकमेकांना हिणवत असतील, तर तरुण पिढीकडून वेगळ्या संस्कारांची अपेक्षा कशी केली जाणार? आज आयटी सेलच्या माध्यमातून रोज सकाळी उठून विरोधकांच्या माता-भगिनींच्या नावाने ज्या प्रकारची घाण पसरवली जाते, ती या देशातील संस्कृती कधीही मानत नाही. पण जेव्हा तीच घण प्रकरणाच्या स्वरूपात स्वतःच्या अंगाशी येते किंवा तरुण त्याविरुद्ध पेटून उठतात, तेव्हा मात्र लगेचच प्रेमाचे आणि क्षमेचे तुणतुणे वाजवले जाते.
दुसऱ्यांच्या घरातील कचरा मोठ्या डोळ्यांनी पाहणारे आणि त्यावर ताशेरे ओढणारे लोक जेव्हा स्वतःच्या घरात साचलेला डोंगर झाकून ठेवण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा त्यालाच मराठीत “दुसरे पाहतात वाकून, आपले ठेवतात झाकून” असे म्हणतात. पंतप्रधानांची ही माफीनामा देणारी रील असो किंवा त्यांचे ते गोड शब्द असोत, जनतेला आता सर्वकाही स्पष्टपणे समजत आहे. केवळ कॅमेऱ्यासमोर येऊन माफी मागितल्याने किंवा मुलांना आपले मानल्याचे नाटक केल्याने भूतकाळात घडलेले पाप धुऊन जात नाही. जर खरोखरच देशात सुसंस्कृत राजकारण आणायचे असेल आणि तरुणांना योग्य दिशा द्यायची असेल, तर सर्वात आधी राजकीय नेत्यांनी स्वतःच्या जिभेवर आणि विचारसरणीवर ताबा मिळवला पाहिजे. स्वतःच्या घरातील लोकांना, खासदारांना आणि मंत्र्यांना तमीज शिकवली पाहिजे. जोपर्यंत नेते स्वतः सुधरत नाहीत, तोपर्यंत त्यांनी जनतेला किंवा तरुणांना उपदेश करण्याचे कोणतेही नैतिक अधिकार उरलेले नाहीत. हीच आजच्या काळाची सर्वात मोठी आणि कठोर सत्य परिस्थिती आहे, जी देशाच्या सुज्ञ जनतेने ओळखली पाहिजे.






