
बुलढाण्यात थरारक व संतापजनक घटना: शेतवस्तीवर पतीला विळ्याने ओलीस ठेवून विवाहितेवर सामूहिक अत्याचार; मलकापूर तालुक्यातील घटना
विशेष प्रतिनिधी/विश्वमंथन
महाराष्ट्राला हादरवणारी आणि मानुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक आणि क्रूर घटना बुलढाणा जिल्ह्यातून पुढे आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यात मध्यरात्री दोन नराधमांनी एका शेतातील वस्तीवर घुसून पती-पत्नींना शस्त्राचा धाक दाखवला. एवढेच नाही तर पतीच्या गळ्याला धारदार विळा लावून त्याला जागेवरच ओलीस ठेवत दोन अज्ञात नराधमांनी त्याच्या डोळ्यांदेखत त्याच्या विवाहित पत्नीवर आळीपाळीने सामूहिक अत्याचार केला. या अंगावर आणणाऱ्या घटनेने संपूर्ण परिसरामध्ये अतिशय संतापाचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत १७ जुलै रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ही भयानक घटना घडली. पीडित महिला आणि तिचे पती नेहमीप्रमाणे दिवसभराच्या शेतातील कष्टानंतर शिवारातील आपल्या घरात झोपलेले होते. संपूर्ण परिसरात रात्रीची शांतता होती. मात्र, या शांततेचा आणि अंधाराचा फायदा घेऊन दोन अज्ञात नराधम हातात धारदार चाकू आणि विळा घेऊन शेतवस्तीवर पोहोचले. त्यांनी या गरीब दांपत्याच्या घराचा दरवाजा जबरदस्तीने तोडला आणि थेट घरात प्रवेश केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे पती-पत्नी प्रचंड घाबरले. घरात घुसताच दोन्ही आरोपींनी शस्त्राचा धाक दाखवून दांपत्याला आरडाओरडा न करण्यासाठी धमकावले आणि त्याचबरोबर जागेवरच जिवे मारण्याची धमकी दिली.
नराधमांनी आधी पतीच्या खिशातील अवघे ५०० रुपये आणि त्यांचा मोबाईल फोन बळजोरीने हिसकावून घेतला. एवढ्यावरच न थांबता त्यांनी घरात सोन्या-चांदीचे दागिने कुठे आहेत, याची विचारणा देखील केली. दांपत्याने हात जोडून घरात कोणतेही दागिने नसल्याचे सांगितले. मात्र, दागिने न मिळाल्याने या नराधमांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी क्रूरतेची सीमा गाठली. दागिने मिळाले नाहीत म्हणून संतप्त झालेल्या या नराधमांनी पती-पत्नीला घरातून जबरदस्तीने बाहेर ओढत नेत जवळच असलेल्या अंधाराच्या शेतात नेले. तिथे एका नराधमाने पतीला जमिनीवर पाडले आणि त्याच्या गळ्याला थेट धारदार विळा लावला. थोडी जरी हालचाल केली किंवा ओरडण्याचा प्रयत्न केला, तर गळा चिरून टाकेल, अशी धमकी या नराधमांनी दिली.
आपल्या पतीला मृत्यूच्या दाढेत पाहून पीडित महिला पूर्णपणे हतबल झाली. पतीने आपल्या डोळ्यांदेखत मरणयातना सहन केल्या आणि त्याच वेळी दुसऱ्या नराधमाने विवाहितेवर बळजोरीने अत्याचार केला. त्यानंतर दोन्ही आरोपींनी या महिलेवर आळीपाळीने बलात्कार केला. हे घृणास्पद कृत्य केल्यानंतर दोन्ही आरोपी अंधाराचा फायदा घेत मोटरसायकलवरून पसार झाले. या भयंकर आणि जीवघेण्या प्रसंगानंतरही पीडित महिला आणि तिच्या पतीने जराही धीर सोडला नाही. त्यांनी मध्यरात्रीच मलकापूर ग्रामीण पोलीस ठाणे गाठले आणि घडलेला संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनामध्ये प्रचंड खळबळ उडाली. पोलिसांनी तात्काळ सामूहिक बलात्कार, दरोडा आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपींच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलिसांची पथके आता रवाना झाली आहेत. त्यामुळे आता या संपूर्ण परिसरामध्ये अतिशय संतापाचे वातावरण निर्माण झालेले आहे. आजूबाजूच्या परिसरामध्ये पोलिसांनी नाकाबंदी देखील सुरू केली आहे.
या अमानुष घटनेने पुन्हा एकदा ग्रामीण भागातील, विशेषतः शेतातील वस्त्यांवर राहणाऱ्या नागरिकांच्या आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. पतीला ओलीस ठेवून अशा पद्धतीचे विकृत कृत्य करणाऱ्या या नराधमांना पोलीस कधी बेड्या ठोकतात आणि त्यांच्यावर नेमकी काय कठोर कारवाई होते, हे पाहणे आता अत्यंत महत्त्वाचे असणार आहे.
https://vishwamanthan.com/









