बुलढाणा|विश्वमंथन विशेष प्रतिनिधी
ऐतिहासिक संदर्भांची मोडतोड आणि महापुरुषांबद्दलची चुकीची विधाने महाराष्ट्रात पुन्हा एकदा वादाचा विषय ठरत आहेत. नागपूर येथे एका मंदिराच्या उद्घाटन निमित्त आयोजित कार्यक्रमात प्रसिद्ध कथावाचक बागेश्वर बाबा यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या नात्याबद्दल केलेल्या एका विधानाने नव्या वादाला तोंड फुटले असून, शिवप्रेमी आणि इतिहासकारांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
​नेमकी काय आहे घटना?
​नागपूरच्या मंचावरून बोलताना बागेश्वर बाबा यांनी शिवरायांच्या आयुष्यातील एक कथित प्रसंग सांगितला. ते म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करून थकले होते. ते रामदास स्वामींकडे गेले आणि म्हणाले की, मी आता थकलो आहे, हे राज्य तुम्हीच सांभाळा. त्यांनी आपला जिरेटोप खाली ठेवला. त्यावर रामदास स्वामींनी विचारले की, मी तुमचा कोण आहे? महाराजांनी उत्तर दिले की, तुम्ही माझे गुरु आहात. तुम्ही माझे कोण छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले शिष्य, गुरु या नात्याने सांगतो हे राज्य माझे आहे तेव्हा स्वामींनी त्यांना तो टोप पुन्हा डोक्यावर ठेवायला सांगितला आणि ‘हे राज्य माझे आहे, तुम्ही फक्त त्याचे संचालन करा’ असे आदेश दिले.”छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र पराक्रमी छत्रपती संभाजी महाराज असताना आणि त्यांच्या घरातील स्त्रिया लढाऊ (पराक्रमी)असताना ते रामदास स्वामींना असे का म्हणतील
​बागेश्वर बाबांच्या या कथनामुळे इतिहास प्रेमींनी आक्षेप घेतला आहे. अभ्यासकांच्या मते, अशा प्रकारच्या कथा शिवरायांचे कर्तृत्व कमी करणाऱ्या आणि इतिहासाचे विकृतीकरण करणाऱ्या आहेत.
इतिहासाचा आधार काय सांगतो?
​इतिहासकारांच्या मते, छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी हे ‘गुरु-शिष्य’ असल्याचा कोणताही ठोस ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नाही. शिवकाळातील समकालीन ग्रंथ, कागदपत्रे किंवा बखरींमध्ये अशा प्रकारच्या कोणत्याही भेटीचा किंवा गुरु-शिष्य नात्याचा उल्लेख आढळत नाही.
​सर्वात महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला जात आहे तो शिवराज्यभिषेकाचा. १६७४ मध्ये जेव्हा महाराजांचा राज्याभिषेक झाला, तो सोहळा 18 पगड जातीच्या स्वराज्याची अधिकृत घोषणा होती. जर रामदास स्वामी खरोखरच महाराजांचे गुरु असते, तर या ऐतिहासिक आणि भव्य सोहळ्यात त्यांची उपस्थिती अनिवार्य असायला हवी होती. परंतु, राज्याभिषेकाच्या कोणत्याही अधिकृत नोंदीत त्यांचा उल्लेख आढळत नाही. यावरूनच हे स्पष्ट होते की, महाराज आणि स्वामींचे कार्यक्षेत्र पूर्णपणे भिन्न होते आणि त्यांच्यात गुरु-शिष्याचे नाते नव्हते.
राजकीय आणि सामाजिक उमटलेले पडसाद
​या विधानानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “इतिहासामध्ये अशा प्रकारच्या विधानांना कोणताही ऐतिहासिक आधार किंवा पुरावे नाहीत,” असे स्पष्ट करत त्यांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
​मात्र, जनतेमध्ये यावरून वेगळीच चर्चा सुरू आहे. ज्या मंचावर हे विधान केले गेले, तिथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांची उपस्थिती होती. “ज्याप्रमाणे फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली, तशीच स्पष्ट भूमिका किंवा ट्विट मोहन भागवत यांनी देखील करायला हवे होते,” अशी मागणी सामान्य जनतेतून होत आहे. महापुरुषांचे नाव चुकीच्या पद्धतीने घेतले जात असताना जबाबदार पदांवरील व्यक्तींनी गप्प राहणे चुकीचे असल्याच्या भावना व्यक्त होत आहेत.
जनतेचा सवाल: शिक्षण महत्त्वाची की मंदिरे महत्त्वाचे
​या कार्यक्रमाच्या निमित्ताने देशातील शिक्षण व्यवस्थेवरही मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. आज भारतामध्ये हजारो शाळा बंद केल्या जात आहेत. “शाळा चालवणे परवडत नाही” किंवा “२० पेक्षा कमी पटसंख्या आहे” अशी कारणे देऊन गरीबांच्या मुलांचे शिक्षण थांबवले जात आहे. एकीकडे ‘विद्येची मंदिरे’ बंद होत असताना, दुसरीकडे मंदिरांच्या बांधकामावर आणि अशा भव्य सोहळ्यांवर कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत.
​मंदिर हे श्रद्धेचे स्थान आहे आणि प्रत्येक माणसाची देवावर अढळ श्रद्धा असते. परंतु, या श्रद्धेचा वापर करून काही विशिष्ट समाजाला रोजगार निर्माण करून देण्यासाठीच ही मंदिरे उभारली जात आहेत का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. हजारो मुलांचे भविष्य अंधारात टाकून केवळ धार्मिक अवडंबर माजवणे हे प्रगत समाजाचे लक्षण नाही. अशी चर्चा होत आहे
विकृत इतिहासाचा धोका आणि कारवाईची मागणी.      आजवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात बोलणाऱ्यांमध्ये बहुतांश वेळा विशिष्ट समाजाचे लोकच का असतात? “ब्राह्मणांना शिवाजी महाराज का नडतात?” अशी चर्चा आता उघडपणे लोकांमध्ये सुरू झाली आहे. इतिहासाची मोडतोड करून काय परिणाम होतात, याची उदाहरणे आपण भूतकाळात पाहिली आहेत. पुराव्याशिवाय बोलणे हे समाजातील शांतता बिघडवण्याचे काम करते. असे लोकांचे म्हणणे आहे

नागरिकांची संतप्त प्रतिक्रिया:
“बागेश्वर बाबांना जर इतिहासाची जाण नसेल, तर त्यांनी शिवरायांवर बोलू नये. महाराज हे लाखो लोकांचे श्रद्धास्थान आहेत. बाबांनी फक्त त्यांच्या कहाण्या सांगाव्यात, इतिहासाची विकृती करू नये,” अशी भावना शिवप्रेमींनी व्यक्त केली आहे. याप्रकरणी बागेश्वर बाबांवर कडक कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी आता जोर धरत आहे.
थोडक्यात सांगायचे तर:
छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य हे रयतेचे राज्य स्थापन करण्याचे होते, तर रामदास स्वामींचे कार्य धार्मिक-सामाजिक प्रबोधनाचे होते. या दोन भिन्न प्रवाहांना विनाकारण एकत्र जोडून इतिहासाचे भगवेकरण किंवा चुकीचे सादरीकरण करणे हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला घातक आहे. पुराव्याशिवाय बोलणे थांबवून इतिहासाचा आदर राखला जावा, हीच आज सर्वसामान्यांची भावना आहे.

Share