बुलढाणा( विश्वमंथन प्रतिनिधी):
जिल्ह्यात सध्या घरगुती गॅस सिलिंडर मिळवण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या कसरतीचा सामना करावा लागत आहे. स्थानिक गॅस एजन्सीसमोर पावती फाडण्यासाठी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, प्रशासकीय नियोजनाच्या अभावामुळे नागरिक हैराण झाले आहेत. विशेष म्हणजे, केवळ गॅसची पावती फाडण्यासाठी सोबत ‘रिकामी हंडी’ (सिलिंडर) आणण्याची सक्ती केली जात असल्याने ग्राहकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे

.नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा येथील एचपी गॅस एजन्सीवर पावती फाडण्यासाठी पहाटेपासूनच नागरिकांनी गर्दी केली होती. मात्र, यावेळी गॅस एजन्सीने एक अजब नियम लावला. ज्या ग्राहकांनी स्वतःसोबत रिकामी हंडी आणली नाही, त्यांना रांगेतून बाहेर काढण्यात आले. यामुळे रांगेत उभे असलेल्या लोकांमध्ये आणि कर्मचाऱ्यांमध्ये मोठी खडाजंगी उडाली. “केवळ पावती फाडण्यासाठी अवजड सिलिंडर सोबत आणण्याची गरज काय?” असा रोकडा सवाल संतप्त नागरिकांनी उपस्थित केला.
दोन रांगा आणि गोंधळाचे वातावरण
नागरिकांचा वाढता विरोध पाहून अखेर पोलिसांनी मध्यस्थी केली. ज्यांच्याकडे हंडी आहे त्यांची एक रांग आणि ज्यांच्याकडे हंडी नाही अशा ग्राहकांसाठी दुसरी रांग लावण्याचे निर्देश देण्यात आले. मात्र, यामध्येही हंडी वाल्यांच्या १० पावत्या फाडल्यानंतर विना-हंडी असलेल्या एका व्यक्तीचा क्रमांक लावला जाईल, असे सांगण्यात आले. या पक्षपाती व्यवहारामुळे सर्वसामान्य ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे. अनेक ग्राहक दुचाकीवर किंवा पायथ्या चालत पावती फाडण्यासाठी येतात, अशा वेळी रिकामी हंडी सोबत वाहून आणणे अत्यंत त्रासदायक ठरत आहे.
ग्राहकांचे सवाल आणि सुरक्षा चिंता
गेल्या गेल्या दहा दिवसापासून गॅस सिलेंडर उपलब्ध होत नसल्याची तक्रार अनेक नागरिकांनी केली आहे. “आमच्याकडे गॅस एजन्सीचे अधिकृत पुस्तक असताना केवळ पावतीसाठी सिलिंडरची सक्ती का?” असा प्रश्न विचारला जात आहे. तसेच, रांगेत उभे असताना किंवा गर्दीच्या ठिकाणी उघड्यावर ठेवलेली गॅस हंडी चोरीला गेली, तर त्याला जबाबदार कोण? असा कायदेशीर प्रश्नही काही सुजाण नागरिकांनी उपस्थित केला आहे. भर उन्हात तासनतास उभे राहूनही हक्काचा गॅस मिळत नसल्याने गृहिणींचेही हाल होत आहेत.
प्रशासनाकडे मागणी
गॅस पुरवठा सुरळीत करावा आणि पावती फाडण्याची प्रक्रिया सुटसुटीत करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. केवळ हंडी असल्यावरच पावती फाडली जाईल, हा नियम अन्यायकारक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. गॅस एजन्सीने तंत्रज्ञानाचा वापर करून किंवा टोकन पद्धत राबवून ही गर्दी कमी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तोपर्यंत या रांगा आणि वादावादीचे सत्र थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत.

