
दिल्लीत ऐतिहासिक विजय! शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, CJP च्या आंदोलनापुढं सरकार झुकले; विद्यार्थ्यांच्या विजयाचा एल्गार!
नवी दिल्ली/विश्वमंथन
देशाच्या राजकारणात आणि शिक्षण क्षेत्रात आज एक अत्यंत मोठी आणि महत्त्वाची खळबळ उडाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीच्या जंतरमंतरवर सुरू असलेल्या तीव्र आंदोलनामुळे केंद्र सरकारला अखेर गुडघे टेकणे भाग पडले आहे. नीट (NEET) परीक्षांमधील प्रचंड गैरव्यवहार, अनागोंदी कारभार आणि विद्यार्थ्यांच्या झालेल्या छळाची नैतिक जबाबदारी स्वीकारत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. हा केवळ एका मंत्र्याचा राजीनामा नसून, देशातील लाखोसामान्य विद्यार्थ्यांच्या संघर्षाचा, संविधानाचा आणि हुकूमशाहीविरोधातील लोकशाहीचा मोठा विजय मानला जात आहे.
मागील ३६ ते ३७ दिवसांपासून कडक उन्हाची पर्वा न करता, ४५ अंश सेल्सिअस तापमानात, पावसात आणि अंगाची लाही लाही करणाऱ्या उष्णतेत विद्यार्थी व CJP चे कार्यकर्ते जंतरमंतरवर धरणे धरून बसले होते. प्रशासनाने आंदोलन मोडून काढण्यासाठी विद्यार्थ्यांचे पाणी तोडले, जेवणावर बंधने आणली, अंगावर पोलिसांकडून लाठ्या चालवल्या आणि रस्त्यावर फरफटत नेले; परंतु या सर्व अमानुष अत्याचारासमोरही विद्यार्थ्यांची जिद्द आणि हिंमत लेमात्रही ढळली नाही. आज या संघर्षाचे फळ मिळाले असून, या आंदोलनाचा पहिला मोठा विकेट म्हणून शिक्षणमंत्र्यांना आपला राजीनामा द्यावा लागला आहे.
या संपूर्ण घडामोडीदरम्यान CJP चे प्रवक्ते आशुतोष राकार, सौरभ दास आणि अभिजीत दीपके यांनी स्पष्ट शब्दांत बजावले होते की, जोपर्यंत विद्यार्थ्यांच्या मागण्यांची पूर्तता होत नाही आणि सरकारकडून लिखित स्वरूपात आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत हे आंदोलन कोणत्याही परिस्थितीत मागे घेतले जाणार नाही. अमेरिकेतून भारतात परत आल्यावर अभिजीत दीपके यांच्या हातात बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान होते, आणि आजचा हा विजय म्हणजे थेट संविधानाचा विजय असल्याचा नारा उपस्थितांनी दिला. “या सरकारने चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता,” अशा शब्दांत सरकारला थेट इशारा देण्यात आला.
धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या राजीनामा पात्रात नमूद केले आहे की, नीट परीक्षेतील अनियमितता समोर आल्यापासून त्यांनी याची संपूर्ण जवाबदारी स्वतःवर घेतली आणि ते कधीही मागे हटले नाहीत. गरीब आणि सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देणे हाच त्यांचा मुख्य संकल्प होता. मात्र, उच्च पदावर बसलेल्या व्यक्तींकडून विद्यार्थ्यांवर झालेल्या अन्यायामुळे ते अत्यंत व्यथित झाले होते. मागील १० दिवसांमधील घडामोडींमुळे त्यांचे मन अतिशय दुखी झाले होते. हा विषय त्यांच्या वैयक्तिक प्रतिष्ठेचा नसून देशाच्या युवा शक्तीचा आणि त्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे, असे त्यांनी आपल्या पत्रात स्पष्ट केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला आहे.
आंदोलनाच्या ठिकाणाहून मिळालेल्या माहितीनुसार, CJP कडून सरकारसमोर तीन अत्यंत महत्त्वाच्या मागण्या ठेवण्यात आल्या आहेत. पहिली मागणी म्हणजे नीट परीक्षा प्रक्रियेत आणि या संपूर्ण प्रकरणात जीव गमावलेल्या किंवा आत्महत्या केलेल्या मुलांच्या कुटुंबियांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची भरीव आर्थिक मदत तातडीने देण्यात यावी. दुसरी मागणी म्हणजे, आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर अमानुष गुंडगिरी करणाऱ्या आणि लाठीमार करणाऱ्या दोषी पोलिसांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तिसरी मागणी शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची होती, जी आता पूर्ण झाली आहे. उर्वरित मागण्यांवर लिखित स्वरूपात निर्णय घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, अशी ठाम भूमिका नेत्यांनी घेतली आहे.
आज संध्याकाळी संपूर्ण देशभरात एक मोठा कॅण्डल मार्च काढण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नीट परीक्षेच्या व्यवस्थेत भरडले गेलेले, पोलिसांच्या लाठ्या खाल्लेले आणि न्याय मागताना त्रास सहन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या स्मरणार्थ हा शांततापूर्ण कॅण्डल मार्च संध्याकाळी सहा वाजता देशभरात काढला जाईल. हा लढा केवळ एका परीक्षेपुरता मर्यादित नसून देशाची संपूर्ण शिक्षण व्यवस्था पारदर्शक आणि भक्कम करण्यासाठीचा आहे, असा स्पष्ट संदेश या आंदोलनातून देण्यात आला आहे.
हा लढा म्हणजे देशातील सामान्य जनतेची आणि भावी पिढीची ऐतिहासिक जीत आहे. आज हे सिद्ध झाले आहे की हा देश कोणत्याही एका व्यक्तीच्या मर्जीने चालणार नाही, तर तो केवळ आणि केवळ देशाच्या संविधानानुसारच चालणार आहे. ही बातमी कायदेशीर चौकटीत राहून आणि सर्व बाजू तपासून अत्यंत जबाबदारीने प्रसिद्ध करण्यात येत असून, यावर पुढील काय अपडेट्स येतात, याकडे संपूर्ण देशाचे डोळे लागले आहेत.








