
महाराष्ट्रात संतापाची लाट! वंचित बहुजन आघाडीकडून सायन-पनवेल महामार्ग रोखून धरत सरकारविरोधात आक्रमक आंदोलन; विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावर तीव्र निषेध
मुंबई/विश्वमंथन
राजधानी मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले. दिल्लीतील जंतरमंतर येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या अमानुष लाठीचार्जचा आणि दडपशाहीचा तीव्र निषेध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज ‘महाराष्ट्र बंद’ची हाक देण्यात आली होती. या बंदला राज्यभरातून संमिश्र प्रतिसाद मिळत असतानाच, मुंबईला जोडणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या आणि व्यस्त अशा सायन-पनवेल महामार्गावर वंचितच्या आक्रमक कार्यकर्त्यांनी अभूतपूर्व ठिया आंदोलन करत रस्ता पूर्णपणे रोखून धरला. केंद्र सरकार आणि संबंधित मंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, सकाळीच वंचित बहुजन आघाडीचे शेकडो कार्यकर्ते सायन-पनवेल महामार्गावर एकत्र आले. मुंबईच्या दिशेने जाणारी आणि पनवेलच्या दिशेने येणारी महत्त्वाची वाहतूक या आंदोलनामुळे अचानक पूर्णपणे ठप्प झाली. हा महामार्ग अत्यंत वर्दळीचा असून येथून दररोज हजारो नागरिक, नोकरदार वर्ग आणि कामगार ये-जा करतात. तसेच, येथून जवळच बीकेसीचा मार्ग असल्याने प्रशासनाचीही मोठी दमछाक उडाली. मात्र, आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी आणि त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराविरोधात आम्हाला हा रस्ता रोखावाच लागला, अशी स्पष्ट भूमिका यावेळी कार्यकर्त्यांनी घेतली.
दिल्लीतील आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर आणि विशेषतः महिला आंदोलकांवर झालेल्या पोलिसांच्या लाठीचार्जमुळे संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली आहे. याच मुद्यावरून आक्रमक झालेल्या महिला भगिनींनी देखील मोठ्या संख्येने या रस्त्यावरील आंदोलनात सहभाग घेतला होता. “आमच्या मुलांच्या भविष्यासाठी आणि त्यांच्यावरील अन्यायाविरोधात आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत,” अशी भावना यावेळी उपस्थित महिलांनी व्यक्त केली. केंद्रातील सत्ताधाऱ्यांचा कारभार आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर दाखवली जाणारी उदासीनता सहन केली जाणार नाही, असा संताप महिला वर्गाकडून व्यक्त करण्यात आला.
या संपूर्ण आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने केंद्र सरकारवर अत्यंत कठोर शब्दांत ताशेरे ओढण्यात आले. आंदोलकांनी थेट शब्दांत केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या तातडीच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर अत्यंत असंवेदनशील भूमिका घेतली जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. प्रकाश आंबेडकर यांनी देखील काही वेळापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत कोणत्याही परिस्थितीत संबंधित मंत्र्यांचा राजीनामा झालाच पाहिजे, अशी ठाम भूमिका मांडली होती, ज्याचा पुनरुच्चार रस्त्यावर उतरलेल्या कार्यकर्त्यांनी केला.
महामार्ग रोखल्यामुळे काही काळासाठी वाहनचालक आणि सर्वसामान्य नागरिकांची मोठी गैरसोय झाली. वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. मात्र, आंदोलकांनी याबाबत स्पष्ट केले की, हा लढा केवळ राजकीय नसून तो प्रत्येक नागरिकाच्या आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आहे. जनतेने देखील अशा अन्यायाविरोधात मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून या बंदमध्ये सहभाग नोंदवणे गरजेचे आहे, अशी साद यावेळी घालण्यात आली.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत स्थानिक पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी आंदोलकांना समजावून सांगण्याचा आणि वाहतूक सुरळीत करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, आंदोलक आपले आंदोलन मागे घेण्यासाठी तयार नव्हते. सरकारविरोधी घोषणाबाजी सुरूच ठेवल्यामुळे अखेर पोलिसांनी कठोर भूमिका घेत सायन-पनवेल महामार्ग मोकळा करण्यासाठी आंदोलकांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली.
पोलिसांनी धडक कारवाई करत स्वप्नील जवळकर यांच्यासह अनेक प्रमुख कार्यकर्त्यांना आणि शेकडो आंदोलकांना ताब्यात घेतले. कार्यकर्त्यांना बळाने बाजूला सारत पोलिसांनी हायवेवरील वाहतूक पुन्हा एकदा सुरळीत केली. मात्र, पोलिसांच्या या कारवाईवर देखील आंदोलकांनी तीव्र आक्षेप घेतला. पोलीस प्रशासनाने सरकारची गुलामी न करता जनतेच्या बाजूने उभे राहायला हवे, असा आरोप आंदोलकांकडून करण्यात आला.
सकाळी सुरू झालेला हा हायहोल्टेज ड्रामा आणि रस्ता रोको काही वेळानंतर पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे जरी संपवण्यात आला असला, तरी या आंदोलनामुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ पुकारण्यात आलेल्या या महाराष्ट्र बंदची आणि सायन-पनवेल महामार्गावर झालेल्या या धडक आंदोलनाची चर्चा संपूर्ण राज्यभरात रंगली असून, आगामी काळात या मुद्यावरून राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसत आहेत.








