बुलढाणा
बुलढाणा शहरासह संपूर्ण जिल्ह्यात काल इंधनाचा तीव्र तुटवडा जाणवला. शहरातील अनेक पेट्रोल पंपांवर काल अचानक पेट्रोल संपल्याचे चित्र पाहायला मिळाले. मुख्य करून जयस्तंभ चौकातील प्रसिद्ध हिरोळे पेट्रोल पंपावर काल प्रचंड शांतता पसरली होती. ज्या पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी नेहमी वाहनांच्या लांबच लांब रांगा आणि गर्दी असायची, तिथे काल नागरिकांना ‘पेट्रोल उपलब्ध नाही’ असे फलक पाहायला मिळाले. एकापाठोपाठ एक अशा अनेक पेट्रोल पंपांवर काल पेट्रोल संपल्यामुळे वाहनधारकांची मोठी धावपळ उडाली. काल अचानक निर्माण झालेली ही परिस्थिती केवळ तात्पुरती अडचण नसून, आगामी काळात येणाऱ्या मोठ्या इंधन आणि आर्थिक संकटाची स्पष्ट सुरुवात मानली जात आहे. काही दिवसांपूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना संबोधित करताना इंधनाचा वापर अत्यंत जपून करण्याचे आवाहन केले होते. पंतप्रधानांनी दिलेला तो इशारा आणि काल बुलढाण्यात प्रत्यक्ष निर्माण झालेली परिस्थिती पाहता, देशासमोरील आव्हाने आता सर्वसामान्यांच्या उंबरठ्यापर्यंत येऊन पोहोचली आहेत.
सध्या देशाची आर्थिक परिस्थिती एका अत्यंत नाजूक वळणावर उभी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामोडींमुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. इंधनाचे दर गगनाला भिडल्यामुळे त्याचा थेट परिणाम भारतीय लोकांच्या जीवनावर झाला असून, दुसरे संकट म्हणजे डॉलरच्या तुलनेत रुपया सातत्याने घसरत आहे. या आर्थिक अनिश्चिततेमुळे अनेक परदेशी कंपन्यांनी भारतातून आपला व्यवसाय आणि गुंतवणूक काढून घेण्यास सुरुवात केली आहे. कंपन्या बाहेर गेल्यामुळे देशात बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. आज हजारो तरुणांच्या हाताला काम नाही, बाजारपेठेतील व्यापार मंदावला आहे आणि लोकांचे रोजगार हिरावले जात आहेत. पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा संपूर्ण देशात निर्माण झाला, तर ती भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी खूप मोठी धोक्याची घंटा ठरेल.
कोणत्याही देशाचा विकास आणि लोकांचे दैनंदिन व्यवहार हे प्रामुषाने वाहतूक व्यवस्थेवर चालतात. देशातील प्रत्येक लहान-मोठ्या उद्योगाला चालवण्यासाठी आणि मालाची वाहतूक करण्यासाठी इंधन हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. जर इंधनाचा तुटवडा असाच वाढत गेला, तर संपूर्ण वाहतूक व्यवस्था ठप्प होईल. वाहतूक खर्च वाढल्यास किंवा गाड्या बंद पडल्यास बाजारात येणारा अन्नधान्य, भाज्या आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा थांबेल. वस्तूंची टंचाई निर्माण झाली की महागाई प्रचंड वाढेल. आपल्या देशाचा विचार केला तर येथील जवळपास ६० टक्के जनता ही अत्यंत गरिबीत किंवा मध्यम वर्गात जगते, ज्यांचे महिन्याचे उत्पन्न अवघे दहा हजार रुपये किंवा त्यापेक्षा कमी आहे. आधीच मर्यादित पैसे कमावणाऱ्या या वर्गाला सध्याच्या महागाईने हैराण केले आहे. त्यात जर इंधन संकटामुळे दैनंदिन वस्तू आणखी महागल्या, तर या गरीब कुटुंबांना आपले घर चालवणे पूर्णपणे अशक्य होऊन बसेल. मुलांची शाळा, औषधोपचार आणि दोन वेळचे जेवण मिळवणे ही सर्वसामान्यांसाठी मोठी लढाई ठरेल.
अशा राष्ट्रीय आणि स्थानिक संकट काळात देशाला एका खऱ्या, प्रामाणिक आणि ठोस निर्णय घेणाऱ्या नेतृत्वाची गरज असते. परंतु, आजच्या राजकीय परिस्थितीमध्ये जनतेला वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे. देशातील अनेक नेते इंधन बचतीचा संदेश देण्यासाठी लोकांसमोर एसटी बस किंवा सार्वजनिक वाहनाने प्रवास करण्याचा दिखावा करतात. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एसटीने प्रवास केल्याचे समोर आले, पण त्याच वेळी त्यांच्या सुरक्षेसाठी आणि प्रवासासाठी मागे वाहनांचा मोठा ताफा धावत असल्याच्या चर्चा असतात. एकीकडे इंधन वाचवण्याचा सल्ला द्यायचा आणि दुसरीकडे स्वतःच्या दौऱ्यासाठी अनेक गाड्यांचे इंधन फुंकायचे, ही केवळ जनतेची दिशाभूल करणारी राजकीय स्टंटबाजी आहे का, असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत. ज्या लोकप्रतिनिधींना जनतेने आपले सेवक म्हणून निवडले आहे, त्यांनी संकटाच्या काळात अशा प्रकारे वागणे कितपत योग्य आहे? नेत्यांनी इंधन बचतीच्या नावाखाली चालवलेली ही स्टंटबाजी थांबवून प्रत्यक्ष जमिनीवर काम करण्याची गरज निर्माण झाली आहे.
भारताच्या आर्थिक इतिहासाचा अभ्यास केला तर यापूर्वीही देशावर अशी मोठी आर्थिक संकटे आली होती. माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात जेव्हा जगात मोठी आर्थिक मंदी आली होती आणि भारताची आर्थिक घडी विस्कटली होती, तेव्हा त्यांनी आपल्या प्रदीर्घ अनुभवाच्या आणि अचूक आर्थिक धोरणांच्या जोरावर भारताला अतिशय कौशल्याने सावरले होते. त्या कठीण काळात त्यांनी देशाची अर्थव्यवस्था कोलमडू दिली नाही आणि सर्वसामान्य नागरिकांना संकटाची झळ बसू दिली नव्हती. आज पुन्हा एकदा देश तशाच प्रकारच्या किंवा त्याहूनही गंभीर आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर उभा आहे. अशा वेळी वर्तमान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाला या इंधन आणि आर्थिक चक्रातून यशस्वीपणे बाहेर काढू शकतील का, हा देशातील प्रत्येक सामान्य नागरिकाच्या मनातील सर्वात मोठा प्रश्न आहे.
काल बुलढाण्यातील अनेक पेट्रोल पंपांवर पेट्रोल नसणे आणि लागलेले ते रिकामे फलक केवळ इंधनाच्या तुटवड्याचे लक्षण नाही, तर ते सामान्य जनतेच्या भविष्यातील कठीण दिवसांचे संकेत आहेत. कायद्याच्या चौकटीत राहून आणि पत्रकारितेच्या पवित्र कर्तव्याचे पालन करून हा प्रश्न मांडताना, प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. जर वेळेत योग्य उपाययोजना केल्या नाहीत, तर महागाई, बेरोजगारी आणि इंधनाचा तुटवडा यांमुळे देशातील सर्वसामान्य नागरिकांचे जगणे असह्य होईल. त्यामुळे शासनाने आणि राजकीय नेत्यांनी आपली स्टंटबाजी बाजूला ठेवून सर्वसामान्यांच्या हितासाठी तात्काळ ठोस पावले उचलणे हीच काळाची गरज आहे.

