रोहित पवार

शेगाव/बुलढाणा: विशेष प्रतिनिधी
​राज्यातील महिला आणि चिमुरड्या मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला असून, “लेकी-बाळी सुरक्षित राहू देत,” असे आर्त साकडं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी श्री संत गजानन महाराजांच्या चरणी घातले आहे. शेगाव येथे दर्शनासाठी आले असता त्यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या ढासळत्या स्थितीवर भाष्य करताना काही अत्यंत धक्कादायक आकडेवारी मांडली. गेल्या एका वर्षात महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली असून, सद्यस्थितीत राज्यात दर तासाला एका महिलेवर बलात्कार होत असल्याची माहिती त्यांनी दिली. २०२५ या वर्षात महिलांविरोधातील विनयभंग आणि बलात्काराचे एकूण गुन्हे ५० हजारांच्या पार गेले असून, चिमुरड्या मुलींवरील अत्याचाराच्या (पॉक्सो) साधारण १३ हजार केसेस नोंदवल्या गेल्या आहेत. पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्रासाठी ही आकडेवारी अत्यंत चिंताजनक असून, रोहित पवारांनी मांडलेली ही भीषण वास्तवता ऐकल्यानंतर आता जनसामान्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
​या पार्श्वभूमीवर, राज्यातील जनतेमध्ये आता एकच चर्चा रंगली आहे की, जे राज्यकर्ते दररोज छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सत्तेचा उपभोग घेतात, ते महाराजांसारखा कायद्याचा दरारा निर्माण करण्यात का अपयशी ठरत आहेत? स्वराज्यात महिलांच्या सुरक्षिततेसाठी कायदे अत्यंत सक्तीचे होते आणि गुन्हेगाराला तात्काळ कठोर शासन केले जाई. आज संविधानामध्ये कडक कायद्यांची तरतूद असूनही, सत्तेत बसलेले लोक या कायद्यांची सक्तीने अंमलबजावणी का करत नाहीत, असा रोकठोक सवाल लोकांकडून विचारला जात आहे. महाराजांच्या नावाने मते मागणाऱ्यांनी त्यांच्यासारखाच कायद्याचा वचक का निर्माण केला नाही, अशी चर्चा आता सार्वजनिक ठिकाणी आणि सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे.
​रोहित पवार यांनी मांडलेला आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राज्यातून बेपत्ता होणाऱ्या महिलांची संख्या. गेल्या वर्षभरात महाराष्ट्रातून सुमारे १ लाख ३० हजार ते १ लाख ४० हजार महिला आणि मुली गायब झाल्या असून, त्यातील ३० ते ३५ हजार महिलांचा अद्याप शोध लागलेला नाही. विशेषतः बुलढाणा जिल्ह्यामध्ये ही परिस्थिती अधिक भीषण असून तिथे दररोज सरासरी ५ ते ६ विवाहित महिला किंवा तरुणी बेपत्ता होत आहेत. या सर्व बाबींमुळे सर्वसामान्य पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलीस प्रशासन यावर ठोस भूमिका का घेत नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
​महिलांवर अन्याय करणाऱ्यांच्या मनात कायद्याची एवढी भीती असावी की, असा विचार करण्यापूर्वीच त्यांचा थरकाप उडाला पाहिजे, अशी भावना रोहित पवार यांनी व्यक्त केली. शेगाव येथील दर्शन आटोपून ते अकोला जिल्ह्यातील पातूर येथे पीडित चिमुरडीच्या कुटुंबाला भेट देण्यासाठी रवाना झाले. मात्र, या सर्व घडामोडींनंतर आता जनतेचा संयम सुटत चालला असून, केवळ आश्वासने देण्यापेक्षा सरकारने स्वराज्यासारखा कडक कायदा आणून त्याची सक्तीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. राज्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार केवळ भाषणापुरते मर्यादित न ठेवता ते प्रत्यक्षात आणावेत, अशी अपेक्षा आता सामान्य नागरिक व्यक्त करत आहेत.

Share