विशेष प्रतिनिधी, मुंबई
सोशल मीडियाच्या वेगवान प्रवाहाने ऐतिहासिक सत्यांची कशी मोडतोड होऊ शकते आणि त्यातून राजकीय नेत्यांच्या अभ्यासूपणावर कसे प्रश्नचिन्ह निर्माण होते, याचा प्रत्यय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या एका व्हायरल व्हिडिओमुळे येत आहे. या व्हिडिओत त्यांनी केलेल्या ऐतिहासिक विधानातील गल्लतीमुळे सध्या बौद्धिक आणि राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटत असून, ज्या नेत्यांना इतिहासाचे साधे भान नाही, ते देशाला महासत्तेकडे कसे नेणार, असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे.
सदर व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी “तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा” हा ऐतिहासिक नारा स्वामी विवेकानंद यांनी दिला असल्याचे विधान केले आहे. वास्तवात, भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात हा नारा नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेच्या बांधणीसाठी दिला होता. स्वामी विवेकानंद हे महान आध्यात्मिक क्रांतीचे प्रणेते होते, मात्र त्यांच्या तोंडी आझाद हिंद सेनेचा नारा घालणे ही केवळ शाब्दिक चूक नसून ऐतिहासिक अज्ञान असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
या संपूर्ण प्रकरणातील सर्वात चिंताजनक बाब म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या चुकीच्या विधानानंतर उपस्थितांनी केलेला टाळ्यांचा कडकडाट. लोकप्रतिनिधीने केलेल्या विधानाची शहानिशा न करता त्याला दाद देणारी जनसमुदायाची ही मानसिकता सामाजिक अज्ञानाचे लक्षण असल्याचे मानले जात आहे. इतिहासाची पुनर्रचना करू पाहणाऱ्या नेत्यांच्या चुकीच्या विधानांनाही सत्य मानून टाळ्या पिटणाऱ्या समाजामुळेच लोकप्रतिनिधींना जाब विचारण्याची परंपरा संपत चालली आहे का, असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
सोशल मीडियावरील या चर्चेने देशातील शिक्षण व्यवस्थेच्या स्थितीवरही बोट ठेवले आहे. एकीकडे सरकारी शाळा पटसंख्येच्या अभावाचे कारण सांगून बंद केल्या जात आहेत, तर दुसरीकडे सामान्य जनतेची मुले दर्जेदार शिक्षणापासून वंचित राहून केवळ अज्ञान बनत असल्याची टीका होत आहे. राजकारण्यांची स्वतःची मुले परदेशात उच्च शिक्षण घेतात, मात्र जनतेच्या मुलांच्या वाट्याला मोडकळीस आलेली शिक्षण व्यवस्था येते. नेत्यांचे अज्ञान आणि जनतेची डोळेझाक हे दोन्ही घटक राष्ट्राच्या प्रगतीला घातक असल्याचे यातून अधोरेखित होत आहे.
भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र आणि महासत्ता बनवण्याचे स्वप्न दाखवले जात असताना, राज्यांचे आणि देशाचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्तींना जर स्वतःचा गौरवशाली इतिहास अचूक माहिती नसेल, तर हे लक्ष्य गाठणे अशक्य असल्याचे बोलले जात आहे. “ज्यांना इतिहासाची जाण नाही, ते भविष्य काय घडवणार?” असा परखड प्रश्न आता विचारला जात आहे.
केवळ भावनात्मक राजकारणात गुरफटलेला समाज आणि वाचनाचा अभाव असलेल्या नेतृत्वामुळे देशाचा वैचारिक स्तर खालावत चालला आहे. जोपर्यंत सामान्य नागरिक आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि सत्याच्या रक्षणासाठी लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारण्याचे धाडस दाखवत नाही, तोपर्यंत अशी ऐतिहासिक असत्ये टाळ्यांच्या कडकडाटात स्वीकारली जात राहतील, ही वस्तुस्थिती दुर्लक्षित करून चालणार नाही.

