जामनेर:प्रतिनिधी विश्वमंथन
लोकप्रतिनिधी जेव्हा मोठे पद मिळवतात, तेव्हा त्यांच्याकडून मतदारसंघातील जनतेच्या अपेक्षाही वाढतात. मात्र, जामनेर तालुक्यात सध्या उलटे चित्र पाहायला मिळत आहे. राज्याच्या राजकारणात वजनदार मानले जाणारे आणि महत्त्वाचे कॅबिनेट मंत्रीपद भूषवणारे गिरीश महाजन यांच्या स्वतःच्या मतदारसंघातच नागरिक पाण्यासाठी टाहो फोडत आहेत. तालुक्यातील वाकोद हे गाव १५ ते २० हजार लोकसंख्या असलेले एक मोठे बाजारपेठेचे गाव आहे, पण दुर्दैवाने या गावाला आजही पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.
वाकोद गावाचे महत्त्व या भागातील एक मोठी बाजारपेठ म्हणून आहे. आसपासची अनेक छोटी गावे आपल्या गरजांसाठी याच गावावर अवलंबून असतात. एवढी मोठी लोकसंख्या असलेल्या गावात उन्हाळा सुरू झाला की पाण्याचा प्रश्न इतका गंभीर होतो की, लोकांना रात्रीचा दिवस करून पाण्यासाठी पायपीट करावी लागते. ज्यांची ऐपत नसताना सुद्धा त्यांना खाजगी टँकरकडून महागड्या दराने पाणी विकत घ्यावे लागत आहे.
या सर्व परिस्थितीमुळे आता वाकोदच्या जनतेमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे. लोकांमध्ये अशी चर्चा सुरू झाली आहे की, आमदार गिरीश महाजन हे राज्याचे मोठे मंत्री आहेत, त्यांच्याकडे अनेक जिल्ह्यांची जबाबदारी आहे, पण त्यांना स्वतःच्या मतदारसंघातील या महत्त्वाच्या गावाकडे लक्ष द्यायला वेळ नाही का? जो नेता आपल्या मतदारसंघातील गावाचा पाण्याचा प्रश्न सोडवू शकत नाही, ज्यांना आपल्या लोकांच्या मूलभूत गरजांची माहिती नाही, ते संपूर्ण महाराष्ट्राचे प्रश्न कसे हाताळणार? असा थेट आणि रोखठोक प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक विचारू लागले आहेत.
वाकोद गाव हे वाघूर नदीच्या जवळ असूनही या गावाचे नशीब कोरडेच राहिले आहे. येथील पाणीपुरवठा योजना कित्येक वर्षांपासून रखडलेली आहे. जुन्या पाइपलाईन्स खराब झाल्या आहेत आणि नवीन कामांचे कोणतेही नियोजन दिसत नाही. स्थानिक ग्रामपंचायत आणि प्रशासन पाण्यासाठी कोणतेही ठोस पाऊल उचलत नसल्याचे चित्र आहे. १५-२० हजार लोकसंख्येच्या गावात पाण्याचे नियोजन करण्यात आलेले अपयश हे केवळ प्रशासकीय नसून राजकीय उदासीनतेचे लक्षण मानले जात आहे.
जेव्हा एखादा लोकप्रतिनिधी कॅबिनेट मंत्री बनतो, तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी त्यांच्यावर असते, हे खरे आहे. पण ज्या मतदारसंघातील लोकांनी त्यांना निवडून देऊन इथपर्यंत पोहोचवले, त्या जनतेलाच जर पाण्यासाठी वन-वन फिरावे लागत असेल, तर त्या विकासाचा काय उपयोग? “मतदारसंघातील गावे तहानलेली आणि मंत्री महोदय महाराष्ट्राच्या दौऱ्यावर” अशीच काहीशी परिस्थिती सध्या पाहायला मिळत आहे.
वाकोदकरांच्या या समस्येकडे जर तातडीने लक्ष दिले नाही, तर आगामी काळात जनतेचा हा रोष वाढण्याची शक्यता आहे. केवळ आश्वासनांनी लोकांची तहान भागणार नाही, तर प्रत्यक्षात नळाला पाणी येणे गरजेचे आहे. आता तरी मंत्री महोदय आणि संबंधित प्रशासन झोपेतून जागे होऊन वाकोदच्या पाणी प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढणार का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. गावातील गरीब आणि सामान्य माणसाला आता फक्त आणि फक्त पाण्याचा हक्क हवा आहे, तो त्यांना कधी मिळणार हाच खरा मोठा प्रश्न आहे.

