आजच्या काळात आपण खूप प्रगती केली आहे, असे आपल्याला वाटते. आपण चंद्रावर गेलो, इंटरनेट आले, मोठी शहरे उभी राहिली. पण आजही समाजात वावरताना मन सुन्न करणारी एक गोष्ट वारंवार अनुभवायला मिळते. जेव्हा कोणी सन्मानाने ‘जय भीम’ म्हणतो, तेव्हा आजही काही लोक नाक मुरडतात. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव असे बदलतात की जणू काहीतरी चुकीचे घडले आहे. काही लोकांचे तर असे म्हणणे असते की, “त्यांनी आमच्यासाठी काय केले? त्यांनी जे काही केले ते फक्त एकाच जातीसाठी केले.” हा विचार ऐकला की मनात कालवाकालव होते. ज्या महापुरुषाने आपल्या रक्ताचे पाणी करून हा देश आणि इथला प्रत्येक नागरिक उभा केला, त्यांना एका जातीच्या चौकटीत बंदिस्त करणे ही खरंच खूप मोठी शोकांतिका आहे.
ज्यांना आजही हा प्रश्न पडतो की बाबासाहेबांनी “आमच्यासाठी” काय केले, त्यांनी फक्त एकदा शांत डोक्याने आपल्या घरातील लेकी-बाळींकडे पाहावे. आज तुमच्या घरातील मुलगी दप्तर खांद्यावर अडकवून शाळेत जातेय, कॉलेजची पायरी चढतेय आणि मुलांच्या खांद्याला खांदा लावून नोकरी-व्यवसाय करतेय, हे स्वातंत्र्य तिला कोणामुळे मिळाले? जर बाबासाहेब नसते, तर आज आपल्या घरातील स्त्रियांची अवस्था काय असती, याचा विचारही करवत नाही. बाबासाहेबांनी स्त्रियांना गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी ‘हिंदू कोड बिल’ आणले. हे बिल म्हणजे केवळ कागदाचा तुकडा नव्हता, तर तो महिलांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारा मंत्र होता.
हे हिंदू कोड बिल सुरुवातीला संसदेत पास होत नव्हते. खूप विरोध झाला. पण बाबासाहेब आपल्या विचारांवर ठाम होते. जेव्हा त्यांना दिसले की महिलांच्या हक्काचे हे बिल मंजूर होत नाहीये, तेव्हा त्यांनी क्षणाचाही विचार न करता आपल्या ‘कायदा मंत्री’ पदाचा राजीनामा दिला. मंत्रीपदाचा स्वतःहून राजीनामा देणारे पहिले आणि आखरी कोणी जर असतील तर ते बाबासाहेब आंबेडकर आहेत. आजपर्यंत कोणीही स्वतःहून राजीनामा दिलेला नाही.विचार करा, एखादा माणूस केवळ तुमच्या घरातील स्त्रियांना हक्क मिळावेत म्हणून स्वतःच्या एवढ्या मोठ्या पदाचा त्याग करतो, तो माणूस केवळ एका जातीचा कसा असू शकतो? बाबासाहेबांच्या या त्यागामुळे आणि त्यांनी आणलेल्या कायद्यामुळेच आज मुलीला वडिलांच्या इस्टेटमध्ये (मालमत्तेत) समान अधिकार मिळाला आहे. आज जर एखाद्या महिलेचा घटस्फोट झाला, तर ती लावारिस राहत नाही, तर सन्मानाने जगण्याचा तिला कायदेशीर हक्क आहे. मुलीला मुल दत्तक घेण्याचा अधिकार मिळाला, स्वतःच्या पसंतीने आंतरजातीय विवाह (कास्ट मॅरेज) करण्याचा हक्क मिळाला. पूर्वी स्त्रियांवर होणारी मनमानी निमूटपणे सहन करावी लागायची, पण हिंदू कोड बिलामुळेच आज प्रत्येक महिलेला कोर्टात आपली बाजू मांडता येते. हे सर्व अधिकार कोणत्या एका जातीच्या महिलेसाठी नाहीत, तर या देशातील प्रत्येक महिलेसाठी बाबासाहेबांनी मिळवून दिले आहेत.
बाबासाहेबांचे उपकार फक्त स्त्रियांवरच आहेत असे नाही, तर प्रत्येक कामगारावर आहेत. आज आपण जो आठ तासांचा कामाचा वेळ पाहतो, तो पूर्वी १२ ते १४ तासांचा होता. माणसाला कोलूच्या बैलासारखे राबवून घेतले जायचे. हे कामाचे तास आठ घंटे करण्याचे काम बाबासाहेबांनी केले. पूर्वी महिला नोकरीवर असताना जर गरोदर (प्रेग्नंट) राहिली, तर तिला नोकरीवरून काढून टाकले जायचे. पण बाबासाहेबांनी कायदा केला की, प्रेग्नेंसीच्या काळात महिलेला सुट्टी मिळालीच पाहिजे आणि तिचा पगारही कापला जाता कामा नये. आज जी प्रसूतीची सुट्टी (मॅटर्निटी बेनिफिट) महिलांना मिळते, ती केवळ बाबासाहेबांमुळे मिळते. त्यांनी जेव्हा आपला राजकीय पक्ष काढला, कोणत्याही जातीच्या नावाने काढला नाही त्याचे नाव ‘इंडिपेंडंट लेबर पार्टी’ असे ठेवले. त्यांनी कोणत्याही जातीचे नाव लावून पक्ष काढला नाही, कारण त्यांचा लढा हा सर्व जातीच्या कष्टकऱ्यांसाठी आणि कामगारांसाठी होता.
देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दल बोलायचे झाले तर, ब्रिटिश सरकार भारतावर खूप खर्च करत होते, पण तो खर्च नेमका कोणासाठी होता? बाबासाहेबांनी अर्थशास्त्राचा सखोल अभ्यास केला. त्यांनी ‘प्रॉब्लेम ऑफ रुपीज ‘ (रुपयाची समस्या) नावाचे पुस्तक लिहिले. सरकारने जनतेच्या पैशाचा खर्च कसा करावा आणि तो कोणाच्या कल्याणासाठी असावा, हे त्यांनी जगाला पटवून दिले. त्यांच्या याच अभ्यासातून आणि विचारातून आजची ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’ (RBI) जन्माला आली. आज तुमच्या-आमच्या खिशात जो ‘रुपया’ नावाचा पैसा आहे, तो स्थिर राहण्यास आणि देशाची अर्थव्यवस्था टिकून राहण्यास बाबासाहेबांच्या धोरणांची मोठी मदत झाली आहे.
बाबासाहेबांनी या देशाला ‘संविधान’ दिले. या संविधानामुळेच आज आपण सर्वजण सन्मानाने श्वास घेऊ शकत आहोत. संविधानाने आपल्याला मतदानाचा अधिकार दिला, शिक्षणाचा अधिकार दिला आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला. त्यांनी संविधानात कुठेही एका जातीचा विचार केला नाही, तर “आम्ही भारताचे लोक” असे म्हणून सर्वांना एका धाग्यात गुंफले.
अनेकांना वाटते की ‘जय भीम’ म्हणणे म्हणजे एका विशिष्ट जातीचा जयघोष करणे. पण तसे नाही. जेव्हा आपण ‘जय भीम’ म्हणतो, तेव्हा आपण त्या महापुरुषाचे आभार मानत असतो ज्याने आपल्याला अंधारातून उजेडात आणले. ज्याने आपल्याला सांगितले की “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा.” जर बाबासाहेबांनी केवळ एका जातीचा विचार केला असता, तर त्यांनी फक्त त्या जातीपुरते कायदे केले असते. पण त्यांनी जे काही केले, ते या मातीतल्या प्रत्येक माणसासाठी केले.
म्हणूनच, जेव्हा लोक बाबासाहेबांच्या कार्यावर शंका घेतात किंवा त्यांना जातीच्या चौकटीत अडकवतात, तेव्हा खूप वाईट वाटते. त्यांनी आयुष्यभर अपमान सोसले, पण कधीही कोणाबद्दल सूडभावना ठेवली नाही. त्यांनी उलट देशाला असे कायदे दिले ज्यामुळे सर्वांचे कल्याण होईल. ज्या माणसाने आपला राजीनामा स्त्रियांच्या हक्कासाठी दिला, ज्याने आपला अभ्यास देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी दिला आणि ज्याने आपले संपूर्ण आयुष्य या देशाच्या संविधानासाठी वेचले, त्या माणसाला आपण कोणत्या तोंडाने म्हणू शकतो की त्यांनी एका जातीसाठी काम केले?
माझ्यासाठी ‘जय भीम’ म्हणणे हा केवळ एक शब्द नाही, तर तो एक अभिमान आहे. कारण माझ्या बाबासाहेबांनी मला ताठ मानेने जगायला शिकवले. त्यांनी माझ्या घरातील स्त्रियांना सन्मान दिला, माझ्या कामगार भावांना हक्क दिले आणि माझ्या देशाला एक मजबूत अर्थव्यवस्था दिली. त्यांनी एका जातीसाठी नाही, तर सर्व जातींमधील शेवटच्या माणसासाठी काम केले आहे.
शेवटी इतकेच सांगेन, सूर्याला कोणत्याही जातीचे कुंपण नसते, तो सर्वांना सारखाच प्रकाश देतो. बाबासाहेब हे सुद्धा असेच ज्ञानसूर्य होते. ज्यांच्या प्रकाशात आज आपण प्रगती करत आहोत. त्यामुळे यापुढे जेव्हा कोणी ‘जय भीम’ म्हणेल, तेव्हा नाक मुरडण्याऐवजी एकदा आठवण करा त्या हक्कांची जे तुम्हाला आज मिळत आहेत. कारण ते हक्क तुम्हाला केवळ आणि केवळ बाबासाहेबांमुळेच मिळाले आहेत. बाबासाहेबांचे कार्य हे अथांग सागरासारखे आहे, ज्यात सर्वांचे कल्याण सामावलेले आहे. म्हणूनच, मला ‘जय भीम’ म्हणायला सार्थ अभिमान वाटतो आणि तो नेहमीच वाटत राहील.

