वार्ताहर बुलढाणा:
कॉ. गोविंदराव पानसरे यांनी लिहिलेल्या पुस्तकावरून सध्या जो वाद सुरू आहे, तो पूर्णपणे निरर्थक असल्याची स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली आहे. आमदार संजय गायकवाड यांनी या पुस्तकावर घेतलेले आक्षेप आणि त्यानंतर सुरू झालेला राजकीय कलगीतुरा यावर मुख्यमंत्र्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्री म्हणाले की, ज्यांनी या पुस्तकावर आक्षेप घेतले आहेत, त्यांनी खरोखर ते पुस्तक वाचले आहे का, हाच मोठा प्रश्न आहे. हे पुस्तक लिहून आता खूप काळ उलटून गेला आहे, तरीही इतक्या वर्षांनंतर त्यावर वाद उकरून काढणे हे पूर्णपणे चुकीचे आणि असंविधानिक आहे.
त्या काळामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांनी या पुस्तकाची खूप तारीफ केली होती. न्यायमूर्ती सावंत यांनी स्वतः गोविंदराव पानसरे यांना पत्र पाठवून या पुस्तकाचे कौतुक केले होते आणि समाजामध्ये अशा पुस्तकाची मोठी गरज आहे, असेही म्हटले होते. एका बाजूला कायदेतज्ज्ञ आणि विचारवंत पुस्तकाचे स्वागत करत असताना, दुसऱ्या बाजूला केवळ राजकीय विरोधासाठी त्यावर टीका करणे योग्य नाही, अशी लोकांमध्ये चर्चा आहे
या वादाचे रूपांतर आता रस्त्यावरील लढाईत झाले आहे. आमदार संजय गायकवाड यांनी या संदर्भात शिवीगाळ केल्याचा आरोप करत कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने त्यांच्या घरासमोर मोर्चा काढण्यात आला होता. या आंदोलनामुळे परिसरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी खबरदारी म्हणून प्रशांत आंबी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना चिखली गावामध्येच रोखले आणि नंतर त्यांना ताब्यात घेतले. यावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आंदोलन करणाऱ्यांना नेमके आपण कशासाठी आंदोलन करत आहोत हे तरी माहित आहे की नाही, याची मला शंका आहे. विनाकारण हा वाद निर्माण करण्यात आला असून त्याला कोणताही ठोस आधार नाही.
दुसरीकडे, आमदार संजय गायकवाड यांच्या भूमिकेवरही टीका होत आहे. त्यांनी या प्रकरणात अद्याप स्पष्टपणे माफी मागण्याचे धाडस दाखवलेले नाही. त्यांनी केवळ वरवरची दिलगिरी व्यक्त केली आहे, परंतु त्यांची बोलण्यातील मगरुरी अजूनही गेलेली नाही, असे प्रशांत अंबे यांनी म्हटले अशी भावना आंदोलकांमध्ये आणि सर्वसामान्य जनतेमध्ये पाहायला मिळत आहे. लोकशाहीमध्ये आपले मत मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, पण दुसऱ्याचा अपमान करणे किंवा शिवीगाळ करणे हे लोकशाहीच्या तत्वात बसत नाही.
एकूणच, हे प्रकरण आता कायदेशीर आणि राजकीय वळणावर येऊन ठेपले आहे. गोविंदराव पानसरे यांच्या लेखणीचा सन्मान राखला जावा आणि अशा निरर्थक वादांमुळे समाजात तेढ निर्माण होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पोलीस सध्या या प्रकरणावर लक्ष ठेवून असून, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे आता हा वाद शांत होतो की नवीन वळण घेतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. लोकशाहीत संवाद महत्त्वाचा असतो, पण तो संविधानाच्या चौकटीत राहूनच व्हायला हवा, हाच संदेश या संपूर्ण घटनेतून मिळतो.

