
सोनम वांगचूक यांच्या समर्थनार्थ धाराशिवमध्ये तरुण आक्रमक; केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी!
धाराशिव/विश्वमंथन
पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला आणि दिल्लीतील त्यांच्या समर्थनाला पाठिंबा देण्यासाठी आता धाराशिवमधील तरुण व युवक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आहेत. परीक्षा व्यवस्थेमधील सततचे गैरव्यवहार, पेपरफुटीचे सत्र आणि सोनम वांगचूक यांच्यावर प्रशासनाकडून होत असलेल्या दडपशाहीविरोधात या मोर्च्याच्या माध्यमातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. कृषी उद्योजक रविराज साबळे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या आंदोलनातून केंद्र व राज्य सरकारच्या कारभारावर कडाडून हल्लाबोल करण्यात आला.
पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचूक यांना प्रशासनाकडून नजरकैदेत ठेवून एका रुग्णालयात बंदिस्त करण्यात आल्याचा गंभीर मुद्दा या वेळी उपस्थित करण्यात आला. सोनम वांगचूक शांततेच्या आणि लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करत असताना, त्यांना भेटण्याची साधी परवानगीही दिली जात नाही आणि त्यांना डांबून ठेवले गेले आहे. लोकशाही देशात शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला असताना अशा प्रकारे बळजोरी करणे अत्यंत चुकीचे आहे. त्यामुळे नजरकैदेत ठेवलेल्या सोनम वांगचूक यांना तात्काळ विनाअट सोडून द्यावे आणि त्यांना लोकशाही मार्गाने आपले आंदोलन करू द्यावे, अशी ठाम मागणी या मोर्च्यात करण्यात आली.
या आंदोलनाचे नेतृत्व करणारे रविराज साबळे यांनी केंद्र सरकारच्या शिक्षण विभागावर ताशेरे ओढत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली. देशात वारंवार होणाऱ्या पेपरफुटीमुळे लाखो होतकरू विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात येत आहे. मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनावर कोणताही ठोस तोडगा काढण्याऐवजी आंदोलकांवर अश्रुधुराचा मारा करून आंदोलन दाबण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे. त्यामुळे नैतिकतेच्या मुद्यावर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी स्वतःहून राजीनामा द्यावा आणि देशातील ढासळलेली शिक्षण व्यवस्था तातडीने सुधारावी, अशी आक्रमक भूमिका मांडण्यात आली.
केवळ केंद्र सरकारच नव्हे, तर राज्य सरकारच्या शिक्षण विभागाचा कारभारही तितकाच गलथान असल्याचा घणाघात या वेळी करण्यात आला. महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये टीईटी म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षेचे पेपरफुटीचे प्रकार सातत्याने समोर येत आहेत, परंतु त्यावर कोणतीही ठोस आणि कठोर कारवाई केली जात नाही. खुद्द राज्याचे विद्यमान शिक्षण मंत्री दादा भुसे यांना टीईटी परीक्षा म्हणजे नेमके काय, याची साधी माहिती किंवा प्राथमिक ज्ञानही नाही, हे अत्यंत दुर्दैवी आहे. ज्या मंत्र्याला आपल्या खात्यातील अत्यंत महत्त्वाच्या परीक्षांची साधी माहिती नाही, त्या मंत्र्याला पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यामुळे राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी देखील तात्काळ आपला राजीनामा दिला पाहिजे, अशी जोरदार मागणी करण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या परीक्षा पद्धतीबाबत बोलताना MPSC परीक्षेचा मुद्दा प्रकर्षाने मांडण्यात आला. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळत MPSC ची परीक्षा अचानक एक वर्षासाठी ऑनलाईन पुढे ढकलली गेली आहे. या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करत, ही परीक्षा कायमस्वरूपी ऑफलाईन पद्धतीनेच घेतली पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका घेण्यात आली. जे तरुण आणि विद्यार्थी वर्षानुवर्षे ऑफलाईन पद्धतीने अभ्यास करतात, त्यांच्यावर अचानक लादलेली ऑनलाईन परीक्षा पद्धती पूर्णपणे अन्यायकारक आहे. विद्यार्थी पारंपरिक आणि ऑफलाईन पद्धतीनेच परीक्षा देण्यास अनुकूल असून सरकारने यात कोणताही बदल करू नये, अशी मागणी जोर धरत आहे.
विद्यार्थ्यांच्या हितासाठी आणि त्यांच्या भविष्यासाठी कोणत्याही पदाची किंवा नावाच्या प्रसिद्धीची अपेक्षा न करता हा लढा उभारण्यात आला आहे. राजकारणात नाव कमावण्यासाठी अनेकजण येतात, परंतु विद्यार्थ्यांचे हित आणि त्यांचे भविष्य हेच आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. जर येत्या काळात केंद्र आणि राज्य सरकारने या सर्व गंभीर मागण्यांची दखल घेतली नाही आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला नाही, तर हा लढा आणखी तीव्र केला जाईल. केवळ धाराशिवपुरता हा विषय मर्यादित राहणार नसून, संपूर्ण राज्यभरातून विद्यार्थ्यांचे एक महाआंदोलन उभे केले जाईल. प्रशासनाच्या आणि सरकारच्या या मनमानी कारभाराविरुद्ध एल्गार पुकारत थेट मंत्रालयापर्यंत धडक मारण्यास तरुण मागेपुढे पाहणार नाहीत, असा सज्जड दम या वेळी देण्यात आला.
https://vishwamanthan.com/









