साखळी बुद्रुक बुलढाणा/

येळगावधरण साखळीपासून तीन किलोमीटर अंतरावर असतानाही साखळी बुद्रुक गाव तेराची ग्रामपंचायत बॉडी सहा हजारापर्यंत लोकसंख्या असलेले गाव सध्या भीषण पाणीटंचाईच्या विळख्यात अडकले असून, गावातील महिला, पुरुष आणि युवकांनी आपल्या हक्काच्या पाण्यासाठी एकत्र येऊन ग्रामपंचायत कार्यालयावर भव्य ‘घागर मोर्चा’ काढला. आज २८ मे २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास, गावकऱ्यांनी प्रथम महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आणि विनम्र अभिवादन करून या आंदोलनाची सुरुवात केली. गजानन महाराज मंदिर परिसर ते ग्रामपंचायत कार्यालय असा हा मोर्चा निघाल्यानंतर साखळी बुद्रुकचा जनसागर पाण्यासाठी रस्त्यावर उतरल्याचे चित्र पाहायला मिळाले.

विजया अनिल कोळसे यांच्या खंबीर नेतृत्वाखाली निघालेल्या या आंदोलनाने स्थानिक प्रशासनाच्या पाणी नियोजनाचे धिंडवडे काढले आहेत. पाणी हे मानवी जीवनाचा आधार आहे, मात्र प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे साखळी बुद्रुकमधील नागरिकांना पाण्यासाठी जी वणवण करावी लागत आहे, ती अत्यंत वेदनादायी आणि चीड आणणारी आहे. साखळी गावाला १९९५ सालची आठवण करून देणारा हा मोर्चा पुन्हा एकदा पाणी प्रश्नावर पेटून उठला आहे. त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते सदाशिव हिवाळे यांनी पाणी हक्कासाठी असाच तीव्र लढा उभारला होता, आणि आज ३१ वर्षांनंतरही साखळीची तहान तशीच कायम आहे, हे येथील ग्रामपंचायतीच्या अपयशाचे सर्वात मोठे उदाहरण आहे.

साखळी बुद्रुकपासून अवघ्या ३ किलोमीटर अंतरावर येळगावचे धरण डबडब भरलेले असतानाही, गावकऱ्यांना मात्र १७ ते १८ दिवस पाणीपुरवठ्याची वाट पाहावी लागत आहे. ही परिस्थिती केवळ दुर्देवी नाही, तर प्रशासकीय अनास्थेचा कळस आहे. विशेष म्हणजे, साखळीपासून १० ते १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या बुलढाणा शहराला सुद्धा याच येळगाव धरणातून पाणीपुरवठा केला जातो, जिथे दर ६ ते ७ दिवसांनी पाणी येते, मग त्याच धरणाचे पाणी साखळीला १८ दिवसांनी का मिळते? साखळीच्या वाट्याचे पाणी नक्की जाते कुठे आणि कोणाच्या फायद्यासाठी या पाण्याचे नियोजन बिघडवले जात आहे, हा प्रश्न आता प्रत्येक गावकऱ्याच्या मनात घर करून बसला आहे.

आजूबाजूच्या गावांमध्ये पाण्याची मुबलकता असताना केवळ साखळीमध्येच पाणीटंचाई का, याचे उत्तर ग्रामपंचायतीला द्यावेच लागेल. अनेकांना असे वाटते की जंगलतोड किंवा पावसाच्या कमतरतेमुळे पाणी पातळी खालावली आहे, पण साखळीची परिस्थिती तशी अजिबात नाही. इथे खरा प्रश्न हा केवळ पाणी व्यवस्थापनाचा आणि नियोजनाचा आहे. ग्रामपंचायतीच्या हलगर्जीपणामुळे हे मानवनिर्मित संकट साखळीवर ओढवले आहे, अशी उघड चर्चा आता गावाच्या प्रत्येक कोपऱ्यात होत आहे. झाडे ही पाणी जमिनीत जिरवण्यासाठी महत्त्वाची आहेत हे मान्य असले, तरी साखळीच्या पाणीटंचाईला फक्त पर्यावरणाचे कारण देऊन प्रशासन आपल्या जबाबदारीतून सुटू शकत नाही. उपलब्ध पाण्याचे योग्य वाटप करणे, हे ग्रामपंचायतीचे प्राथमिक कर्तव्य आहे, ज्यामध्ये प्रशासन पूर्णपणे नापास झाले आहे.

महागाईने आधीच सामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. इंधन दरवाढ आणि पेट्रोल-डिझेलच्या तुटवड्यामुळे नागरिक त्रस्त असताना, पाण्याचा तुटवडा हा त्यांच्या जीवनावर घाला घालणारा ठरत आहे. पेट्रोल-डिझेल नसेल तर माणूस काही काळासाठी जगू शकेल, पण पाण्याशिवाय जीवनच अशक्य आहे. पृथ्वीवरील एकूण पाणीसाठ्यापैकी केवळ ३ टक्के पाणी पिण्यायोग्य आहे आणि त्यातीलही केवळ १ टक्का पाणी मानवासाठी सहज उपलब्ध आहे, तर २ टक्के पाणी हे बर्फाच्या स्वरूपात साठलेले आहे. पाणी कोणत्याही फॅक्टरी तयार होत नाही. अशा वेळी उपलब्ध पाण्याचे थेंब न थेंब नियोजनबद्ध वापरणे ही काळाची गरज असताना, स्थानिक पातळीवर असा निष्काळजीपणा करणे अत्यंत घातक आहे.

या घागर मोर्चात सहभागी झालेल्या महिलांच्या हातातील रिकाम्या घागरी प्रशासनाच्या निष्क्रियतेचा आरसा आहेत. जनसमुदायाचा आक्रोश हा प्रशासनाला आता जागे करण्यासाठी पुरेसा आहे. ग्रामपंचायत कार्यालयातील खुर्चीत बसलेल्या पदाधिकाऱ्यांना या गावकऱ्यांची तहान का दिसत नाही? हा संताप आज रस्त्यावर उतरला आहे. शासन आणि प्रशासन यांनी आता तरी डोळ्यावरची पट्टी काढून येळगाव धरणातून साखळी गावाला हक्काचे पाणी त्वरित मिळवून द्यावे, ही गावकऱ्यांची एकमुखी मागणी आहे.

पाणी हा कोणाची खाजगी मालमत्ता नसून तो प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे, त्यामुळे पाण्याचे राजकारण थांबवून गावकऱ्यांना न्याय द्यावा. जर येत्या काही दिवसांत पाणी प्रश्न मार्गी लागला नाही आणि पाणीपुरवठा नियमित झाला नाही, तर हे आंदोलन अधिक तीव्र होईल आणि त्याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन असेल. साखळीकर आता शांत बसणार नाहीत, त्यांनी आता आपल्या हक्कासाठी उग्र आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे, हे प्रशासनाने लक्षात ठेवावे. आता वेळ केवळ आश्वासनांची नसून कृतीची आहे, कारण साखळी बुद्रुकला आता फक्त पाणी हवे आहे आणि ते त्यांच्या हक्काचे आहे. ही लढाई आता साखळीच्या प्रत्येक घरात पोहोचली असून, जोपर्यंत पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटत नाही, तोपर्यंत साखळी बुद्रुकची जनता गप्प बसणार नाही.

प्रशासनाने जर गावकऱ्यांच्या भावनांची वेळीच दखल घेतली नाही, तर भविष्यात होणाऱ्या तीव्र परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवावी लागेल. गावातील ज्येष्ठ नागरिकांपासून ते लहान मुलांपर्यंत सर्वांनाच पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे, हे अत्यंत गंभीर आहे. लोकप्रतिनिधींनी निवडणुकीच्या वेळी दिलेली आश्वासने हवेत विरली असून, आज प्रत्यक्षात मात्र जनता तहानेने व्याकुळ झाली आहे. पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले असून, ते सुरळीत करण्याची साधी जबाबदारीही ग्रामपंचायत पार पाडू शकत नसेल, तर गावाला वेगळा पर्याय शोधावा लागेल, असा इशाराही आता काही युवकांनी दिला आहे. साखळी गावच्या विकासासाठी पाणी हे सर्वात महत्त्वाचे साधन आहे, आणि त्यावरच घाला घातला जात असेल, तर त्याला गप्प बसून सहन करणे आता अशक्य झाले आहे. गावकऱ्यांनी दाखवलेली ही एकजूट येणाऱ्या काळात इतर गावांनाही प्रेरणा देणारी ठरेल, कारण पाण्याचा प्रश्न हा केवळ एका गावापुरता मर्यादित नसून तो संपूर्ण मानवजातीचा आहे. आता प्रशासनाने तातडीने यावर पावले उचलून साखळी बुद्रुकवासियांना दिलासा द्यावा, हीच जनभावना आहे. सर्व साखळीकर आता आपल्या हक्काच्या पाण्यासाठी एकवटले असून, न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहणार आहे.

Share