बुलढाणा (विशेष प्रतिनिधी):

राज्यात उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत असून, भारतीय हवामान खात्याने (IMD) महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये पुढील काही दिवसांत ‘उष्णतेची तीव्र लाट’ येण्याचा इशारा दिला आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ नये, यासाठी राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

विभागीय अंदाज आणि कालावधी

​हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्याच्या वेगवेगळ्या भागात पुढीलप्रमाणे उष्णतेचा प्रभाव जाणवेल:

  • मध्य महाराष्ट्र: १५ ते १८ एप्रिल दरम्यान तापमानात लक्षणीय वाढ होईल.
  • मराठवाडा: १६ ते १८ एप्रिल या कालावधीत उष्णतेची लाट सक्रिय राहील.
  • विदर्भ: १५ ते १९ एप्रिल या प्रदीर्घ कालावधीत सूर्य आग ओकण्याची शक्यता आहे.
  • कोकण किनारपट्टी: १५ ते १७ एप्रिल दरम्यान हवामान अत्यंत उष्ण आणि दमट कर राहील.

नागरिकांसाठी आरोग्यविषयक मार्गदर्शक सूचना

​उष्णतेच्या लाटेपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी प्रशासनाने खालील उपाययोजना सुचवल्या आहेत:

  1. जलाहार वाढवा: तहान नसली तरीही भरपूर पाणी प्यावे. शरीरातील क्षारांचे प्रमाण टिकवण्यासाठी ओआरएस (ORS), लिंबू सरबत किंवा ताकाचा वापर करावा.
  2. पोशाख: उन्हात बाहेर पडताना हलके, सैल आणि पांढऱ्या रंगाचे सुती कपडे वापरावेत. डोळ्यांच्या संरक्षणासाठी गॉगल, डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर अनिवार्य करावा.
  3. वेळेचे बंधन: दुपारी १२ ते ४ या वेळेत उन्हाची तीव्रता सर्वाधिक असते, त्यामुळे या काळात कष्टाची कामे करणे आणि घराबाहेर पडणे टाळावे.
  4. वर्ज्य गोष्टी: मद्यपान, चहा, कॉफी आणि जास्त साखर असलेली पेये टाळावीत, कारण यामुळे शरीरातील पाणी लवकर कमी होते.
  5. मुले व वृद्धांची काळजी: लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि पाळीव प्राणी यांना बंद असलेल्या किंवा पार्क केलेल्या वाहनात सोडू नये.

प्रशासकीय तयारी: ‘हीट ॲक्शन प्लॅन’ कार्यान्वित

​वाढत्या उष्म्याचा सामना करण्यासाठी राज्य शासनाने जिल्हा स्तरावर ‘हीट ॲक्शन प्लॅन’ लागू केला आहे. सार्वजनिक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय (पाणपोई) उपलब्ध करून देणे, आरोग्य केंद्रांमध्ये उष्माघाताच्या रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष तयार करणे आणि आवश्यक औषधांचा पुरवठा सुनिश्चित करण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत.

Share