(विशेष प्रतिनिधी)बुलढाणा:
नेपाळचे नवनियुक्त पंतप्रधान बालन शाह यांनी सत्तेची सूत्रे हातात घेताच देशातील भ्रष्ट व्यवस्थेला असा काही धक्का दिला आहे की, संपूर्ण दक्षिण आशियात त्याची चर्चा सुरू झाली आहे. एक इंजिनिअर जेव्हा देशाचा पंतप्रधान होतो, तेव्हा तो राजकारणापेक्षा कामाच्या गुणवत्तेला जास्त महत्त्व देतो, हे बालन शाह यांनी आपल्या धाडसी निर्णयांतून सिद्ध केले आहे.
शिक्षण आणि आरोग्यात क्रांती
पंतप्रधान बालन शाह यांनी देशातील शिक्षण व्यवस्थेत मोठा बदल केला आहे. आता नेपाळमध्ये पंतप्रधान, सर्व मंत्री आणि सरकारी अधिकाऱ्यांची मुले केवळ सरकारी शाळांमध्येच शिकणार आहेत. खाजगी शाळांचे वाढते प्रस्थ कमी करून सरकारी शाळांना बळकटी देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आरोग्य क्षेत्रातही त्यांनी मोठा बदल घडवून आणला असून, खाजगी असो वा सरकारी, प्रत्येक रुग्णालयात १० टक्के खाटा गरिबांसाठी राखीव ठेवणे अनिवार्य केले आहे. तिथे शंभर टक्के मोफत उपचार न मिळाल्यास संबंधित रुग्णालयाचा परवाना थेट रद्द करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
व्हीआयपी संस्कृतीला पूर्णविराम
देशातील ‘व्हीआयपी कल्चर’ संपवण्यासाठी बालन शाह यांनी कठोर पावले उचलली आहेत. मंत्र्यांच्या मागे फिरणारे गाड्यांचे मोठे ताफे आणि अनावश्यक सुरक्षा व्यवस्था त्यांनी पूर्णपणे हटवली आहे. ट्रॅफिक पोलिसांना स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत की, रस्त्यावर पंतप्रधान असो वा सामान्य नागरिक, नियम सर्वांसाठी सारखेच असतील. जर मंत्र्यांच्या गाडीने नियम मोडला किंवा गाडी थांबवली नाही, तर त्यांच्यावर मोठा दंड आणि कायदेशीर कारवाई केली जात आहे.
भ्रष्टाचाराचा नायनाट आणि बड्या नेत्यांना जेल
पंतप्रधान बालन शाह यांचा सर्वात मोठा प्रहार भ्रष्टाचारावर झाला आहे. १९९० ते २०२६ या प्रदीर्घ कालखंडात ज्या ज्या नेत्यांनी आणि अधिकाऱ्यांनी सरकारी तिजोरीवर डल्ला मारला आहे, त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेत कोणाचीही गय केली जात नसून, नेपाळचे माजी पंतप्रधान के. पी. ओली शर्मा यांच्यासह अनेक बड्या नेत्यांना अटक करण्यात आली आहे. भ्रष्ट अधिकाऱ्यांना थेट जेलमध्ये धाडले जात असून, कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्वरित निलंबित केले जात आहे.
भारतात हा बदल शक्य आहे का?
नेपाळमध्ये बालन शाह यांनी जे काही महिन्यांत करून दाखवले, ते भारतात शक्य आहे का, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. भारतात आजही भ्रष्टाचार आणि व्हीआयपी संस्कृती पाहायला मिळते. नेपाळमध्ये ज्याप्रमाणे तरुणांनी एकत्र येऊन भ्रष्ट नेत्यांना सळो की पळो करून सोडले, तशीच परिस्थिती भारतात निर्माण होईल का, असा विचार सर्वसामान येत आहे. बालन शाह यांनी हे दाखवून दिले आहे की, जर नेतृत्वाकडे योग्य अनुभव आणि प्रामाणिक इच्छाशक्ती असेल, तर कोणतीही व्यवस्था सुधारणे अशक्य नाही.
​देशातील भ्रष्टाचार संपवण्यासाठी बालन शाह यांनी ‘प्रतिपक्ष पोर्टल’ सुरू केले असून, त्याद्वारे थेट जनतेच्या तक्रारींचे निवारण केले जात आहे. नेपाळमधील हा नवा शासन कारभार आता जगासाठी एक उदाहरण ठरत असून, भ्रष्टाचाराने पोखरलेल्या इतर देशांसाठी हा एक मोठा धडा आहे.

Share