​[विशेष प्रतिनिधी], बुलढाणा
​महाराष्ट्र शासनाने २०२६ सालासाठी प्रसिद्ध केलेल्या महापुरुषांच्या अधिकृत जयंतीच्या यादीतून जगाचे ‘जगतगुरु संत तुकाराम महाराज’ यांचे नाव वगळण्यात आले आहे. ज्या महापुरुषाला अवघ्या जगाने वंदनीय मानले, त्यांची जयंती त्यांच्याच महाराष्ट्रात सरकारने नाकारल्याने संतापाची लाट उसळली आहे. “तुकोबांच्या विचारांचा खून शासन अजून किती वेळा करणार?” असा जळजळीत सवाल आता जनतेतून विचारला जात आहे.

​इतिहासाची पाने साक्ष देतात की, छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्यावर जगतगुरु तुकोबांच्या विचारांचा मोठा पगडा होता. शिवराय ज्यांना आपले ‘खरे गुरु’ मानत, ज्यांच्या कीर्तनाला ते स्वतः उपस्थित राहत आणि ज्यांच्या मार्गदर्शनातून स्वराज्याला नैतिक अधिष्ठान मिळाले, त्या वारकरी संप्रदायाच्या आद्यगुरुंना शासन विसरले आहे. ही केवळ प्रशासकीय चूक नसून शिवरायांच्या वैचारिक वारशा

ची ही एक प्रकारे विटंबनाच आहे.
​संत तुकाराम महाराज हे इतर ‘पोटभरू’ महाराजांसारखे नव्हते. त्यांनी कधीही समाजाच्या जीवावर आपले पोट भरले नाही. आपल्या शेतात स्वतः घाम गाळून, कष्ट करून त्यांनी आपला उदरनिर्वाह केला. अशा या मातीच्या कष्टकरी पुत्राला आणि विद्रोही संताला शासकीय सन्मानापासून दूर ठेवणे, हा शुद्ध जातिवाद आणि अन्याय नाही का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
​ज्यांच्या ‘गाथे’चा आणि विचारांचा गौरव आज जागतिक स्तरावर होतो, ज्यांना जग ‘जगतगुरु’ म्हणून संबोधित करते, त्यांचा जन्म ज्या देहूच्या मातीत झाला, त्याच महाराष्ट्र राज्याचे सरकार त्यांची जयंती शासकीय स्तरावर साजरी करण्यास नकार देते, ही अत्यंत खेदजनक बाब आहे. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी आयुष्य वेचणाऱ्या या महापुरुषाच्या नावाला यादीत स्थान न मिळणे, हे महाराष्ट्राच्या पुरोगामी प्रतिमेला काळिमा फासणारे आहे.
शासनाने या जीआरचा त्वरित फेरविचार करावा आणि जगतगुरु संत तुकाराम महाराजांच्या कार्याचा सन्मान राखत त्यांची जयंती शासकीय स्तरावर घोषित करावी, हीच आता महाराष्ट्राची मागणी आहे.

Share

Get 30% off your first purchase

X